शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून पुन्हा नव्याने पक्षबांधणीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी ठाकरे गटाचे नेते महाराष्ट्रात विविध ठिकाणी दौरे करत आहेत. याच पार्श्वभूमीवर अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी मुंबईत लहुजी वस्ताद साळे यांच्या २२८ व्या जयंतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमातून त्यांनी महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याबाबत संकेत दिले होते. राज्यात पुन्हा आपलीच सत्ता आणायची आहे, असा इरादाही त्यांनी स्पष्ट केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याबाबत उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानावर भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी टोला लगावला आहे. मागील अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावर राहिल्यामुळे उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदाची हौस आता फिटली आहे. त्यामुळे महिलेनं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं, असं त्यांना वाटतंय. ही चांगली गोष्ट आहे, असा उपरोधिक टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

हेही वाचा- “शरद पवारांनी पोलिसांकडून मार खाल्लेला पुरावा…”, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून निलेश राणेंचा खोचक टोला

उद्धव ठाकरेंच्या विधानाबाबत विचारलं असता चित्रा वाघ म्हणाल्या, “उद्धव ठाकरेंचा निर्णय चांगला आहे. गेल्या अडीच वर्षात त्यांची मुख्यमंत्रीपदाची हौस फिटली आहे. त्यामुळे आता त्यांना महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री व्हावी, असं वाटतंय, ही चांगलीच गोष्ट आहे. मीही एक महिला आहे. महिला मुख्यमंत्री झाली तर मला आनंद का होणार नाही? पण महिला मुख्यमंत्री झाल्यास महिलांचे सर्व प्रश्न सुटतील, या विचारांची मी नाही.”

हेही वाचा- ‘अंगात भगवे वस्त्र आणि कपाळावर भस्म’, हिंदू संघटनेने छापलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर चर्चेत!

“आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आम्ही दिवसाची सुरुवात केली. आंबेडकरांनी संविधान लिहिलं आहे. त्यांनी संविधानात कुठेच स्त्री आणि पुरुष असा उल्लेख केला नाही. त्यांनी केवळ व्यक्ती असं म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेली व्यक्ती आमच्यासाठी महत्त्वाची आहे. मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष असो, याचा फार फरक पडत नाही. त्यांनी फक्त न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे, या मताची मी आहे,” असं चित्रा वाघ म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman will next cm of maharashtra uddhav thackeray statement bjp chitra wagh reaction rmm
First published on: 06-12-2022 at 21:28 IST