देवरे यांच्याशी चर्चा; आघाडी सरकारवर हल्लाबोल

पारनेर : महिला सक्षमीकरणाचा डांगोरा पिटणारे आपल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधीला जाब विचारणार का, तहसीलदार ज्योती देवरे प्रकरणात ते गप्प का, असा थेट सवाल भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. त्यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने देवरे यांच्या पाठीशी उभा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन चौकशीची मागणी केली आहे, असे श्रीमती वाघ म्हणाल्या.

महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचे सूतोवाच करणारी तहसीलदार देवरे यांची ध्वनिफीत समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फिरल्याने राज्यात खळबळ उडाली. भारतीय जनता पक्षाच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीची मागणी केली आहे. तसेच महाआघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या पाश्र्वाभूमीवर चित्रा वाघ यांनी आज (मंगळवार) सकाळी पारनेर तहसील कार्यालयात तहसीलदार ज्योती देवरे यांच्यांशी बंद दाराआड सुमारे एक तास चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सुजित झावरे, भानुदास बेरड, वसंत चेडे, अश्विनी थोरात, भैय्या गंधे, राहुल शिंदे, सुनील थोरात, अमोल मैड, सुभाष दुधाडे आदी उपस्थित होते.

श्रीमती वाघ म्हणाल्या की, एखाद्या महिलेला बदनाम करणे अतिशय सोपे असते. अनेक पुरुषांचे एकमेकांशी पटत नाही मात्र ज्या वेळी महिलेस घरी बसवण्याची वेळ येते, त्या वेळी सगळे एकत्र येतात. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. मात्र या प्रकरणाची कोणीही दखल घेतली नाही हे दुर्दैवी असल्याचे वाघ म्हणाल्या.

जोपर्यंत महिलेचा जीव जात नाही, ती आत्महत्या करीत नाही तोपर्यंत तिच्या म्हणण्याला या राज्यात काही किंमत राहिलेली नाही. हे वन अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात  राज्याने पाहिले आहे. टेबलाच्या खणात आत्महत्येचे पत्र ठेवून राज्यातील महिला अधिकारी काम करीत असतील, तर राज्यात काय परिस्थिती आहे याची कल्पना येऊ शकते, असे श्रीमती वाघ म्हणाल्या.

ध्वनिफितीच्या माध्यमातून देवरे यांनी मांडलेली व्यथा प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. त्यामुळे राज्यातील महिला तहसीलदारांच्या समस्यांना वाचा फुटली. अनेक महिला अधिकारी दबावाखाली काम करीत आहेत. या गंभीर प्रकरणाची महसूलमंत्री बाळासाहेब थोरात दखल घेतली नाही, साधी विचारपूस केली नाही याबाबत वाघ यांनी खेद व्यक्त केला.

राज्यातील महिला, महिला अधिकारी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची दखल घेण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला आयोग एक चांगली आणि सशक्त यंत्रणा आहे. मात्र या आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याची सरकार टाळाटाळ करीत आहे. आयोगावर सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. यावरून आघाडी सरकारची महिलांविषयीची मानसिकता दिसून येते. महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी आठ वेळा महिला आयोगाची फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली. त्यावर सही करण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. राज्यातील, मंत्रिमंडळातील महिलांचा आवाज असणाऱ्या ठाकूर यांच्या शब्दाला मुख्यमंत्र्यांकडे किंमत नाही.  – चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्षा, भारतीय जनता पक्ष.