पुणे-बंगळूरू महार्गावर वहागाव (ता. कराड) येथे राजपारधी समाजातील काही लोक चंदनचोरीच्या उद्देशाने राहात असल्याच्या दूरध्वनीवरून पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनंतर पोलिसांच्या पथकाने या राजपारधी लोकांच्या चौकशीचा प्रयत्न केला असता, पोलिसांच्या भीतीने पळून जाताना, परवा शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास वहागावजवळ वाहनाने ठोकरल्याने उत्संगा जजसाब रजपूत-ठाकूर (वय ३०, रा. चित्रपूर, उत्तर प्रदेश) या महिलेसह ४ वष्रे, २ वष्रे व ६ महिन्यांची बालिका अशा तीन मुली जागीच ठार झाल्या होत्या.
या घटनेची नोंद तळबीड पोलिसात झाली असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम हे करीत आहेत. या घटनेबाबत माहिती देताना ते म्हणाले की अपघातातील मृतांची ओळख पटली असून, त्यांच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत. हे लोक शिकारीचा व्यवसाय करीत असून, ते याच उद्देशाने वहागाव परिसरात राहात असल्याची माहिती तपासात समोर येत आहे. दरम्यान, मृत महिला खंडाळा येथील पारधी समाजातील असावी, अशी माहिती काही जणांकडून पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी काल रात्री उशिरापर्यंत खंडाळा येथील पारधी कुटुंबापर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक  अमोल तांबे, उपअधीक्षक मितेश घट्टे यांनी भेट देऊन सखोल चौकशी करण्याच्या सूचना तळबीड पोलिसांना दिल्या आहेत.