येथील न्यायालयातील विशेष सरकारी अभियोक्ता कल्पना बाळासाहेब साळवे यांना एक हजार रुपयांची लाच घेताना नगर येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. बुधवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास न्यायालयाच्या इमारतीतच हा सापळा रचण्यात आला होता. या कारवाईने न्यायालयाच्या आवारात एकच खळबळ उडाली.
कल्पना साळवे (वय ३८, रा. मल्हारवाडी रोड, राहुरी) यांनी आज दुपारी न्यायालयात साक्ष नोंदवून घेण्यासाठी संबंधित तक्रारदाराकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी करून एक हजार रुपयात तडजोड केली. येथील न्यायालयाच्या इमारतीत सरकारी वकिलांच्या कक्षातच त्यांनी तक्रारदाराकडून एक हजार रुपये स्वीकारले. त्याच वेळी त्यांना रंगेहाथ  पकडण्यात आले. लाचलुचपत विभागाचे नगर येथील उपाधीक्षक अशोक देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक चंद्रशेखर सावंत, विजय मुर्तडक, पोलिस शिपाई रवींद्र पांडे, प्रमोद जरे, राजेंद्र सावंत, वसंत वावळ, नितीन दराडे, सुनील पवार, अंबादास हुलगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. न्यायालयाच्या इमारतीतच हा प्रकार घडल्याने उपस्थित वकील व नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.