कर्जतमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर काल, शनिवारी अखेर महिलांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्या वाहनांचा ताफा अडवत, त्यांना जाब विचारला व पाणीप्रश्नात लक्ष घालण्याची मागणी केली. कर्जत शहरासाठी नियोजित ३८ कोटी रुपये खर्चाची योजना मार्गी लावण्याचे आश्वासन शिंदे यांनी या वेळी दिले.
कर्जत शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळावाटे पाणी मिळत नसल्याने नागरिकांना रोज पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाचवीलाच पूजलेल्या पाणीटंचाईमुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. महिलांना या टंचाईचा त्रास जास्त होत आहे. रोज प्रत्येक कुटुंबाला किमाना १०० रुपयांचे पाणी खासगी विक्रेत्यांकडून विकत घ्यावे लागते. तेही सहजासहजी उपलब्ध होत नाही. कर्जत ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाल,े मात्र त्याचा काहीच फायदा नागरिकांना झालेला नाही. शहरासाठी १० टँकर मंजूर झाले, मात्र टँकर भरण्यास उद्भव नसल्याने पुरेशा खेपा होत नाहीत, त्यामुळे नागरिकांची असून अडचण व नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.
पालकमंत्री शिंदे शनिवारी कर्जतमध्ये आले असता, काही महिलांनी त्यांच्या वाहनांचा ताफा अडवला. शिंदे वाहनातून खाली उतरले व त्यांनी महिलांची कैफियत ऐकून घेतली. या वेळी महिलांनी त्यांना पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते, याची आठवण करून दिली. शिंदे यांनी कर्जत शहरासाठी १० टँकर मंजूर केले आहेत, मीच पालकमंत्री आहे, त्यामुळे टँकर देण्यात अडचण येणार नाही, माझे लक्ष आहे. शहरासाठी ३८ कोटी रुपयांची पाणी योजना मार्गी लावणार आहे, त्यानंतर कोणतीच अडचण राहणार नाही, असे आश्वासन दिले.