सोलापूर : भाजीभाकरी मागण्यासाठी आलेल्या चार महिलांनी घरातील महिलांना बोलण्यात गुंतवत रोख रक्कम आणि दागिने असा दीड लाख रुपयांचा ऐवज हातोहात लांबविला. अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील नीलमनगरात हा प्रकार घडला. या संदर्भात मोहन लक्ष्मीनारायण येलगट्टी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

येलगट्टी हे गारमेंट कपड्याचे व्यावसायिक आहेत. दुपारी त्यांच्या घरी चार अनोळखी महिला आल्या. मोहन येलगट्टी यांची बहीण वैष्णवी घरात असताना आलेल्या त्या अनोळखी महिलांनी, आम्हांला भूक लागली आहे. भाकरी, भाजी, पाणी द्या’ म्हणून याचना केली. चारपैकी दोघा महिलांनी वैष्णवी यांना बोलण्यात गुंतवले आणि अन्य दोन महिलांनी त्यांची नजर चुकवून घरातील कपाट उघडले.

त्यातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने अलगदपणे लांबविले. काही वेळानंतर हा प्रकार वैष्णवी यांच्या लक्षात आला. भरदिवसा चार महिला भीक मागण्याचे निमित्त करून घरात येतात आणि घरातील व्यक्तींची नजर चुकवून घरातील कपाट उघडून ऐवज चोरून पळून गेल्याच्या या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. संबंधित चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत.