जागतिक महिलादिनाचे औचित्य साधत शहरातील विविध संस्था, संघटना, मंडळे व राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करत ‘स्त्रीशक्ती’चे दर्शन घडवले. जनजागृती तसेच प्रबोधनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. सावेडीतील प्रोफेसर कॉलनी ते दत्तमंदिर रस्त्यावर सकाळी ‘हॅपी वुमेन्स स्ट्रीट’ ही नावीन्यपूर्ण संकल्पना राबवण्यात आली.
आनंदी, निरामय, निरोगी आरोग्य ही संकल्पना घेऊन सकाळी ६.३० ते १० दरम्यान प्रोफेसर कॉलनी ते दत्तमंदिर रस्त्यावर हॅपी वुमेन्स स्ट्रीट ही संकल्पना महिलांनी एकत्र येत राबवली. कल्याणी फिरोदिया, डॉ. वैशाली किरण, अश्विनी गोरे, पूनम अग्रवाल, शीतल गांधी, पूजा कुमार, डॉ. प्रीती थोरात यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही याची काळजी घेत कार्यक्रम करण्यात आला. गणेशवंदनाने सुरुवात करण्यात आली. योगासने, झुंबा डान्स, सूर्यनमस्कार, विविध नृत्यप्रकार, एरोबिक्स, बॅडमिंटन याचा आनंद घेत महिलांची मोफत हिमोग्लोबिनची तपासणी, आरोग्य तपासणी तज्ज्ञांकडून करण्यात आली. भिंगार व रुपीबाई बोरा विद्यालयातील मुलींनी बँड व झांजपथकाचे सादरीकरण केले. सुमारे दीड  हजारावर महिलांनी याचा आनंद लुटला.
कायदेविषयक जनजागृती
राज्य महिला आयोग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व महिला वकिलांची न्यायाधिकार संघटना यांच्यावतीने जिल्हा कारागृहातील बंदिवान महिलांसाठी कायदेविषयक जनजागृतीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या न्यायाधार संस्थेच्या अध्यक्ष अ‍ॅड. निर्मला चौधरी व तुरुंगाधिकारी टी. के. धोत्रे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उदघाटन करण्यात आले. समुपदेशक शकुंतला लोखंडे, सुवर्णा कांबळे, सविता ठोंबे, संगीता मोरे, नंदिनी भोज, अ‍ॅड. नीलिमा भणगे, फैयाज शेख, पौर्णिमा हंडे, जयश्री पवार, रंजना गायकवाड, मनीषा मोरे आदी उपस्थित होत्या.
महिला पत्रकारांचा गौरव
शहर प्रेस क्लबच्या वतीने महिला पत्रकारांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार मीना मुनोत, मनीषा इंगळे, शलाका मुंगी, मंजू भागानगरे, स्नेहा जोशी आदींचा संघटनेचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री विजयसिंह होलम यांनी प्रास्ताविक केले. महेश देशपांडे यांनी कर्तृत्ववान बहिणीवर कविता सादर केली.
पुरुष हक्क समितीच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणा-या नीता देवराईकर, कांता बोठे, सुरेखा विद्ये, माया कोल्हे, गीतांजली काळे, नगरसेविका मनीषा बारस्कर, कल्पना गांधी, नीलम परदेशी, छाया रजपूत, जय गायकवाड, अर्चना देवळालीकर आदींचा समितीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी कराळे यांनी गौरव केला. समितीचे पदाधिकारी भास्कर पालवे, साबीर सय्यद, सचिन ठाणगे, रामदास मुळीक आदी उपस्थित होते.