महिलांच्या सुरक्षेची भाषा काँग्रेस देशभर करीत असली, तरी तंदूर ते लातूर प्रकरणापर्यंत देशभर महिलांवर अत्याचार होत असल्यामुळे ही भाषा काँग्रेसच्या तोंडी शोभत नाही, असा सणसणीत टोला भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी लगावला.
लातूर मतदारसंघातील भाजप उमेदवार सुनील गायकवाड यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मोदी बोलत होते. भाजप नेते गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विनोद तावडे आदी उपस्थित होते. मोदी हे रागाचे राजकारण करीत असल्याचा आरोप काँग्रेसची मंडळी करीत आहेत. मात्र, या वेळी देशातील १२५ कोटी जनता सरकारच्या आतापर्यंतच्या कारभारावर रागावली असल्यामुळे ती मतदानातून आपला राग व्यक्त करणार आहे, अशी खिल्लीही मोदींनी या वेळी उडविली.
सभेच्या प्रारंभीच लातुरातील बहुचर्चित कल्पना गिरी प्रकरणाचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, महिलांवर अत्याचार करण्याचा काँग्रेसचा जुना इतिहास आहे. पूर्वी एका काँग्रेस नेत्याने आपल्या पत्नीची हत्या करून तिला तंदूर भट्टीत जाळले होते. आता लातूरमध्ये काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांने काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याची हत्या केली. आपल्या मुलीच्या हत्येनंतर तिच्या आई-वडिलांना न्यायासाठी दारोदार भटकावे लागत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या तोंडी महिला सुरक्षेची भाषा शोभत नाही.
दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर महिलांचा सन्मान राखला जावा, या साठी एक हजार कोटींची विशेष तरतूद करण्यात आली. मात्र, गेल्या वर्षभरात यातील एक रुपयाही खर्च झाला नाही. आता पुन्हा नव्याने निर्लज्जपणे एक हजार कोटींची तरतूद केली! अशाने महिलांना न्याय कसा मिळणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
भर पावसात प्रचंड गर्दी
सभा सुरू होण्यापूर्वी, दुपारी चारपासूनच पावसाने हजेरी लावली. मदान खचाखच भरले होते. आजूबाजूच्या इमारती व झाडांवरही लोकांनी जागा बळकावल्या होत्या.