आदिवासी शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे ही अविरत प्रक्रिया आहे. विद्यापीठाने वाई हे आदिवासी गाव दत्तक घेऊन दीड वर्षांत आदिवासी उपयोजनेतंर्गत शेतीउत्पादन वाढीसाठी अनेक कार्यक्रम घेतले. त्यास आदिवासी शेतकऱ्यांनीही मोठा प्रतिसाद दिला. या पुढेही विविध उपक्रमांमधून आदिवासी शेतकऱ्यांसाठी विद्यापीठ कार्य करील, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित सिंचन पाणी व्यवस्थापन संशोधन प्रकल्पाच्या वतीने िहगोली जिल्ह्य़ातील आदिवासीबहुल वाई या गावात आदिवासी उपयोजना राबविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत आदिवासी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू म्हणाले, की वाई गावात विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली पुढील वर्षी ग्रामबीजोत्पादन घेण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक जोडधंद्याविषयी तांत्रिक माहिती विद्यापीठ पुरवील. आज पाणीप्रश्न अत्यंत गंभीर झाला असून आदिवासी शेतकऱ्यांनीही आपल्या शिवारातील भूजल पातळी वाढण्यासाठी प्रयत्न करावेत. विद्यापीठ वाई गावात प्रात्यक्षिक स्वरूपात विहीर व कूपनलिकेचे पुनर्भरण करून देईल. आदिवासी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करूनच पीक नियोजन करावे, या साठी विद्यापीठातर्फे फिरत्या माती प्रयोगशाळेची सेवा देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मेळाव्यात वाई गावातील निवडक आदिवासी शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठ विकसित सोयाबीन बियाणे व कृषी दैनंदिनीचे वाटप झाले. सोयाबीन लागवड तंत्रज्ञानावर डॉ. एस. पी. म्हेत्रे, तण व्यवस्थापनावर डॉ. अशोक जाधव, तर सोयाबीन पिकातील कीड व्यवस्थापन यावर डॉ. दयानंद मोरे यांनी मार्गदर्शन केले. विद्यापीठ कार्यकारी परिषदचे सदस्य रवींद्र पतंगे, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुलसचिव डॉ. दिनकर जाधव, वाई गावच्या सरपंच कविताताई दुधाळकर, मुख्य शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडाळे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. गजानन गडदे यांनी केले.