अतिवृष्टी, भूस्खलनात अडकलेल्या घरांनी घेतला मोकळा श्वास!

२२ जुलैच्या रात्री साताऱ्याच्या वाई, पाटण, महाबळेश्वार, जावळी तालुक्यात अतिवृष्टी भूस्खलनाने मोठे नुकसान झाले.

|| विश्वास पवार
‘कृष्णा नदी सेवाकार्य फाऊंडेशन’चे कार्य
वाई : अतिवृष्टी, भूस्खलन, ढगफुटीमुळे वाई तालुक्याच्या पश्चिाम भागातील देवरुखवाडी, जांभळी येथील दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले. देवरुखवाडी येथील सात घरे जमीनदोस्त झाली तर जांभळी पूल येथील घरांवर दरड कोसळून पूर्ण घरात माती, मलब्याचा ढीग साधारण तीन फूट साचला. ‘कृष्णा नदी सेवाकार्य फौंडेशन’च्या कार्यकर्त्यांनी नुकतेच एक दिवस सेवा कार्य करून या सर्व घरांमधील मलबा हटवून स्वच्छ करून दिला.

२२ जुलैच्या रात्री साताऱ्याच्या वाई, पाटण, महाबळेश्वार, जावळी तालुक्यात अतिवृष्टी भूस्खलनाने मोठे नुकसान झाले. देवरुखवाडी, जांभळी येथील दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले. देवरुखवाडी येथील सात घरे जमीनदोस्त झाली तर जांभळी पूल येथील घरांवर दरड कोसळून पूर्ण घरात माती, मलब्याचा ढीग साधारण तीन फूट साचला होता. रात्री दरड कोसळून परिसरातील घरात घुसली. त्यावेळी घराच्या मागील भिंत कोसळून पाण्याचा मोठा लोट घरात घुसला. त्यासोबत मातीगाळाचे ढिगही आले.

सर्व खोल्या या पाणी-चिखलाने भरून गेल्या. घरातील सर्व साहित्य वाहून गेले. रात्रभर ही कुटुंबे या अशाच गाळात उभी होती.

दुसऱ्या दिवशी जेव्हा याची माहिती कृष्णा नदी सेवाकार्य फौंडेशनला मिळाली तेव्हा फौंडेशनमार्फत तत्काळ जीवनावश्यक साहित्य, शंभर लोकांना तयार जेवणाचे डबे, कपडे, पाणी पुरवण्यात आले. या कार्यकर्त्यांनी बाधित कुटुंबांना धीर दिला. तुमच्या घरातील चिखल थोडा सुकू द्या आम्ही रविवारी सकाळी येऊन तुमचे सर्व घर साफ करून देतो असे सांगून परतले.

या संस्थेने रविवारी (दि. १) नुकतेच यासाठीचे सेवाकार्य केले. अध्यक्ष डॉ. नितीन कदम, सदस्य नगरसेवक भारतदादा खामकर, चरण गायकवाड, प्रदीप चोरगे, काशिनाथ शेलार, नरेश सुरसे, अमर आमले, कुमार पवार, गणेश खामकर, तुषार घाडगे, काका डाळवाले, सुर्वे, सचिन गायकवाड , देवानंद शेलार, सचिन गांधी आदी सर्व सेवेकरी; मानवता फौंडेशनचे स्वप्नील मांडरे, सचिन मानकुमरे व स्वयंसेवक; गंगापुरी येथील विजय ढेकाणे व त्यांचे काही सहकारी आणि खावली गावचे माजी सरपंच गेनूबा चौधरी असे जवळपास ४७ जणांनी या सेवाकार्यात सहभाग घेतला.

हे सर्वजण साहित्य घेऊन आले होते. गाणी म्हणत, घोषणा देत पावसात भिजत दुपारी चारपर्यंत सर्व खोल्यांतील चिखल माती काढून पूर्ण घराची साफसफाई केली.

स्वच्छतेचे कार्य

घराचे मालक बाबुराव चिकन यांना या कर्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे मोठे कौतुक आणि सर्वांचा अभिमानही वाटला. अस्मानी संकटात सापडलेल्या कुटुंबास अल्पशी मदत केल्याचे समाधान केल्याचे भाव सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते. कृष्णा नदी सेवाकार्य फौंडेशन हे वाईतील कृष्णा नदी पात्रातील घाटावर वर्षभर स्वच्छतेचे दर रविवारी सेवा कार्य करतात. प्रत्येक रविवारी अनेक कार्यकर्ते एका घाटावरील स्वच्छता करतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Work of krishna nadi sevakarya foundation heavy rain fall flood akp

ताज्या बातम्या