जागतिक नारळ दिन विशेष
कोकणात नारळाची लागवड मोठय़ा प्रमाणात होत असली, तरी त्यावर आधारीत प्रक्रीया उद्योग फारसे सुरु होऊ शकले नाही. त्यामुळे कोकणात नारळ प्रक्रीया उद्योगांना चालना देण्यासाठी व्यापक प्रयत्न होणे गरजेचे आहे. जागतिक नारळ दिनानिमित्त लोकसत्ताचे विशेष वृत्त
नारळाला कल्पवृक्ष असे संबोधले जाते. कारण नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागापासून उपयुक्त वस्तुंची निर्मिती होऊ शकते. पण कोकणात कल्पवृक्षाची संकल्पना कालबाह्य़ होत चालली आहे. शहाळी आणि नारळ विक्रीपलीकडे या पिकाचा फारसा वापर होताना दिसत नाही. कोकणात ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर नारळाचे उत्पादन घेतल जात. यातून उत्पादित होणाऱ्या ९० टक्के पिक हे नारळ आणि शहाळी म्हणून वापरली जातात. शहाळ्याची तसेच नारळाची चोड ही फेकून दिली जातात. नारळाच्या इतर भागांचा वापर करून वस्तुंची निर्मिती करण्याचे प्रमाण नगण्य आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोकणात नारळावर प्रक्रीया करणारा एकही मोठा उद्योग कोकणात सुरु होऊ शकलेला नाही नारळावर प्रक्रीया करून विविध प्रकारची उत्पादन घेतली जाऊ शकतात. प्रक्रीया करून टाकून देण्यात येणारया करवंटी आणि चोडांपासून दागिने, शर्टाची बटने, शोभेच्या वस्तू, चुल आणि तंदूरमध्ये जाळण्यासाठी जाळण्यासाठी कोकोनट चारकोलच्या वडय़ा तयार केल्या जाऊ शकतात. नर्सरी आणि गार्डिनग उद्योगासाठी कोकपिठ तयार केले जाऊ शकते. जे मातीतील ओलावा टिकवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. शहाळ्यातील नारळावर प्रक्रीया करून उच्च प्रतीचे तेल तयार केले जाऊ शकते. या तेलाला सौंदर्यप्रसाधन उद्योगात मोठी मागणी असते.
कोकणात नारळ प्रक्रीया उद्योगांना चालना देण्यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न सुरु आहेत. कोकण कृषी विद्यापिठाने यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला आहे. पण या प्रयत्नांना फारसे यश मिळताना दिसत नाही. विशेष बाब म्हणजे कोकणातील काही तरुणांनी याबाबतचे प्रशिक्षण सुरु केले असले तरी उद्योगांचे प्रशिक्षण घेतले असले तरी उद्योग सुरु होऊ शकलेले नाहीत.
बागांची निगा राखण्यात झालेल दुर्लक्षामुळे नारळाच्या उत्पादनात मोठी घट होताना दिसते आहे. अशातच इरीयोफाईडसारख्या रोगांच्या प्रादुर्भाव बागायत दारांसाठी डोकेदुखी ठरतो आहे. पाडेकरी मिळणे दुरापास्थ झाल्याने बागांची निगा राखण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक बागायतदार या पांरपरिक पिकापासून दुरावले जाऊ लागले आहेत.
नारळाचे उत्पादन वाढवणे गरजेच आहे. दुसरीकडे नारळापासून तेल, काथ्याउद्योग, जेली प्रोडक्ट सुरु केले जाऊ शकतात. याशिवाय काजू फेणी नारळ फेणी बनवून मद्यनिर्मिती केली जाऊ शकते. पण यासाठी गरज आहे ती सकारात्मक दृष्टीकोनाची. केरळच्या धर्तीवर नारळावर आधारीत प्रक्रीया उद्योग सुरु झाले. तर कोकणातील हे नारळ बागायतदारांना चांगले दिवस येऊ शकतील.
रायगड जिल्ह्य़ातील आक्षी येथे काही वर्षांपुर्वी काथ्यावर आधारीत एक छोटेखानी प्रक्रीया उद्योग सुरु करण्यात आला होता. मात्र त्यासाठी लागत असणाऱ्या काथ्या केरळमधून आणावा लागत होता. नारळाच्या चोडापासून काथ्या तयार करण्याचे तंत्रज्ञान कोकणात विकसित होऊ न शकल्याने हा उद्योग कालांतराने बंद पडला. अलिबाग तालुक्यातील यतिन घरत यांनी शहाळ्याच्या पाण्यापासून कोकोनट जेली तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. शहाळ्याच्या पाण्यावर प्रक्रीया करून त्यात नारळाचे तुकडे टाकून जेली तयार केली जात आहे. लहान मुले आणि पर्यटकांकडून या जेलीला चांगली मागणी मिळते. पण या प्रकल्पासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि मशिनरी त्यांना विदेशातून आयात करावे लागले आहे.
‘कोकणात नारळ प्रक्रीया उद्योगांना चालना देण्यासाठी व्यापक प्रयत्न होणे गरजेचे आहे. या उद्योगांसाठी लागणारे तंत्रज्ञान आणि मशिनरी सहज उपलब्ध होणे अपेक्षित आहे. शेतकरी आणि बागायतदारांना काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत शास्त्रशुद्ध मार्गदर्शन मिळत नाही. आणि बागायतदारांची नारळ आणि शाहळे यापलीकडे विचार करण्याची मानसिकता बदलत नाही तोवर यात फरक पडणार नाही.’ -यतिन घरत, कोकोनट जेली, उद्योजक