अकोला : अमरावती ते अकोलादरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील लोणी ते मूर्तिजापूरपर्यंत ४०.२०० कि.मी. रस्त्यावर डांबरीकरणाचा थर टाकण्याचा विश्वविक्रम राजपथ इन्फ्रा. कंपनीने ७ जूनला रचला खरा, पण या कामाला १५ दिवस उलटत नाही तोच या विश्वविक्रमी रस्त्याला तडे गेल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे रस्ता कामाच्या सुमार दर्जाचे पितळ उघडे पडले असून गुणवत्ता तपासणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झालीच कशी, असा प्रश्न वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील अमरावती ते चिखली (नांदुरा अगोदरचे गाव) १९४ कि.मी. चौपदरीकरणाला २०१३ मध्ये मंजुरी मिळाली होती. गेल्या नऊ वर्षांपासून विविध कारणांमुळे या मार्गाचे काम अडचणीत सापडले. २०२१ मध्ये तिसऱ्यांदा चार टप्प्यातील काम तीन कंत्राटदार कंपन्यांना देण्यात आले. तरीही बडनेरा ते अकोल्यापर्यंतच्या कामाची संथगती कायमच राहिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्वतः या कामावरून दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. अशातच, राजपथ इन्फ्रा. या कंत्राटदार कंपनीकडून अचानक विश्वविक्रमी कामाचे नियोजन करण्यात आले. यात ५ दिवसांत ४० कि.मी. रस्त्यावर डांबरीकरणाचा थर टाकण्याचा समावेश होता, पूर्ण मुळापासून रस्ता निर्मितीचे काम नव्हते. कारण, त्या रस्त्याचा मुळापासूनचा पाया अगोदरच तयार होता. फक्त ४० कि.मी.च्या रस्त्यावर ते पण एकाच बाजूने डांबरीकरणाचा थर टाकण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताचे गोंडस नाव देऊन ७५ कि.मी. रस्ता निर्मितीची घोषणा करण्यात आली होती. एकाच बाजूने डांबरीकरण थराचे दुपदरी मिळून हे लक्ष्य गाठण्यात आले. ३ जूनला सकाळी सुरू झालेले हे काम ७ जूनला सायंकाळी संपले. त्यात राजपथने १०९.८८ तासांत ८४.४०० कि.मी. दुपदरी रस्त्यावर डांबरीकरणाचा थर टाकला. विश्वविक्रम म्हणून त्याची नोंद झाली.
विश्वविक्रमी रस्त्याच्या कामाच्या दर्जावरून सुरुवातीपासूनच प्रश्न उपस्थित केले जात होते. १५ दिवसांतच या रस्त्याच्या कामाचा निकृष्टपणा उघड झाला. डांबरीकरण केेलेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी तडे पडले आहेत. मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम कुरुमसमोर तीन कि.मी. अंतरावर अमरावती मार्गावरील एका पुलाजवळ रस्त्याला तडे गेले आहेत. माना गावाजवळदेखील रस्त्याला तडे गेले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साचत आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे यावरून स्पष्ट होते.
‘त्या’ ठिकाणी ‘स्लॅब’
रस्त्यावर पूल असलेल्या ठिकाणी काही प्रमाणात डांबरीकरणाला तडे गेले आहेत. त्या पुलावर घर्षण स्लॅबसाठी टाकलेले डांबरीकरण काढावेच लागते. ही नियमित प्रक्रिया आहे. त्या सर्व ठिकाणी घर्षण स्लॅब टाकण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली.