Asaduddin Owaisi on MIM Victory : राज्यात झालेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपा किंवा इतर पक्षांची चर्चा होत असताना एआयएमआयएमने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. असदुद्दीन ओवैसींच्या या पक्षाने राज्यातील १३ महानगरपालिकांमध्ये तब्बल १२६ नगरसेवक जिंकून आणले आहेत. तर, छत्रपती संभाजीनगर आणि मालेगावसाख्या महापालिकांमध्ये जोरदार विजय मिळवला आहे. दरम्यान, हा विजय धर्माच्या चष्म्यातून न पाहण्याचं आवाहन असदुद्दीन ओवैसी यांनी केलं आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत एमआयएमने १२६ जागा जिंकल्या, याचं श्रेय कोणाला जातं? असा प्रश्न विचारला असता असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “आम्ही सर्वत्र सक्रिय होतो. जिथे आम्हाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत यश मिळालं नाही, त्या ठिकाणीही आम्ही कार्यरत राहिलो. सर्वांना भेटत राहिलो, त्यांच्या मुद्द्यांवर काम केलं, अनेकठिकाणी सार्वजनिक सभा आयोजित केल्या. आमचे नेते खूप प्रवास करत राहिले. आम्ही निवडणूक प्रचाराचा जोरदार कार्यक्रम राबवला. हैदराबादमधील आमचे आमदार महाराष्ट्रात आले, त्यांनी जाहीर सभा घेतल्या.”

एमआयएमचा विजय धर्माच्या नजरेतून पाहणं चुकीचं

मुस्लिम समाजातील मतदार धर्मनिरपेक्ष पक्षांना मते देण्यापेक्षा त्यांच्या समुदायातील पक्षांना मतदान करताना दिसत आहेत का? असं विचारल्यावर ओवैसी म्हणाले, “मालेगावमध्ये मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक आमचे आमदार आहेत. गोवंडीमध्ये आम्ही आठ जागा जिंकलो आहोत. औरंगाबादमध्ये आमचा हिंदू उमेदवार जिंकला आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे फक्त एकाच धर्माच्या नजरेतून पाहू शकत नाही. एमआयएमचा विजय धर्माच्या नजरेतून पाहणं चुकीचं आहे. मग तुम्ही भाजपाचा विजय काय म्हणाल?”

पुन्हा सुरुवात करावी लागेल

महापालिकांतील विजयामुळे एमआयएम आता राज्यस्तरीय राजकारणात मोठी भूमिका बजावेल का? असं विचारल्यावर असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “आता आम्ही जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी करत आहोत. आजच्या विजयावर आपण शांत बसू शकत नाही. सुनील गावस्कर एकदा म्हणाले होते की, शतक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला पुन्हा सुरुवात करावी लागते. आपल्याला पुन्हा सुरुवात करावी लागते, जमिनीवर काम करावे लागते आणि राज्यात पक्षाची उभारणी करण्यासाठी या गतीचा वापर करावा लागतो.”