‘‘तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा, नाही तर मसणात जा’’, असे बेताल विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून केले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वक्तव्यावरुन वाद सुरु असतानाच आता काँग्रेसच्या नेत्या तसेच ठाकरे सरकारमधील महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी चंद्रकांत पाटलांना खडेबोल सुनावले आहेत. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावरुन निशाणा साधताना यशोमती ठाकूर यांनी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा संदर्भ दिलाय.

नक्की वाचा >> …म्हणून अमृता फडणवीसांनी लावली ‘कान्स फिल्म फेस्टीव्हल’ला हजेरी; रेड कार्पेटवरील फोटोंसहीत समोर आलं उपस्थितीमागील कारण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी संपर्क केला पण त्यांनी दिल्लीत जाऊन काय केले हे आम्हाला सांगितले नाही असे सुप्रिया सुळे म्हणाल्याचे पत्रकारांनी सांगितले. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक होत प्रतिक्रिया दिली. “तुम्ही राजकारणामध्ये कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच ‘‘तुम्हाला मसण माहिती आहे ना’’, अशी विचारणाही पाटील यांनी यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना केली.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?
‘‘दिल्लीत कोणाच्या बैठका झाल्यानंतर मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण देण्याबाबतचा निकाल लागला’’, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. तसेच दिल्लीत गेल्यावर केंद्र सरकारला याबाबत प्रश्न विचारणार असल्याचे सुळे यांनी म्हटले होते. “ओबीसी आरक्षणासंदर्भात आपण एकत्र लढायचे असे ठरले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले. दोन दिवसांत असं काय त्या सरकारने केले आणि दिल्लीत बैठक झाली आणि त्यांना न्याय मिळाला आणि आपल्यावर अन्याय झाला. याचं उत्तर मी केंद्र सरकारला विचारणार आहे. मध्य प्रदेश बाबत जो निर्णय दिला आहे तो अंतिम निर्णय नाही. त्यामुळे हे जे सांगत आहे की मध्य प्रदेशला जमले आणि तुम्हाला जमले नाही यातही खोटेपणा आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

महिला आणि बालविकास मंत्र्यांचा टोला
चंद्रकांत पाटलांच्या याच विधानासंदर्भातील ‘लोकसत्ता’च्या वृत्तांकनाचं कात्रण शेअर करत यशोमती ठाकूर यांनी ट्विटरवरुन चंद्रकांत पाटलांना टोला लागवलाय. “चंद्रकांत दादा, आता वेळ अशी आलीय की वहिनी कान्सला जातील आणि भाऊ-दादांना घरी स्वयंपाक करत बसावं लागेल. काळ बदललाय, महिलांना कमी लेखू नका. महिला तुमचं दुकान कधी उखडून टाकतील समजणार ही नाही,” असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय. अमृता फडणवीस या सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. त्याचाच संदर्भ ‘वहिनी कान्सला जातील’ असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी दिलाय.

सध्या या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचं चित्र दिसत असून यासंदर्भात अद्याप पवार कुटुंबाकडून कोणतीही प्रतिक्रिया नोंदवण्यात आलेली नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashomati thakur gives reference of amruta fadnavis cannes visit while slamming chandrakant patil over his comment on supriya sule scsg
First published on: 26-05-2022 at 11:20 IST