राज्यात अलिकडच्या काळात लहान-मोठ्या दंगली घडत आहेत. गेल्या महिन्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये, अकोल्यात दंगली घडल्या. त्यापाठोपाठ या महिन्यात दोन दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये एका उरूसाच्या मिरवणुकीत काही तरुणांनी मुघल बादशाह औरंगजेबाचे पोस्टर्स हातात घेऊन नाच केला, तसेच घोषणाबाजी देखील केली. त्यापाठोपाठ कोल्हापुरातही असाच काहिसा प्रकार घडला. काही तरुणांनी औरंगजेबाचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटच्या स्टेटसवर ठेवले, तसेच औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारा मजकूरही शेअर केल्याने या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी हिंदुत्त्ववादी संघटनांनी केली. या मागणीसाठी बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली. कोल्हापुरात हिंदुत्त्ववादी संघटनांनी ठिय्या आंदोलनही केलं. परंतु काही ठिकाणी आंदोलन हिंसक झाल्याने पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या सर्व घटनांवरून राज्यातले सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी या दोन्ही घटनांवरून महाविकास आघाडीकडे बोट दाखवलं आहे. चित्रा वाघ यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, राज्यात अचानक औरंग्याच्या औलादी वाढू लागल्या आहेत. त्यांना जन्माला घालणाऱ्यांचा म्हणजेच महाविकास आघाडीचा आणि औरंगजेबाचा डीएनए एकच असावा. अन्यथा काही तरूणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याप्रकरणी राज्यातील सर्व परिस्थिती संवेदनशील असताना महाविकास आघाडीच्या वाचाळवीरांकडून दंगे भडकवण्याचं काम झालं नसतं.
हे ही वाचा >> “…मस्तवाल मुलाचा बाप”, केंद्रीय मंत्र्याच्या शरद पवारांवरील टीकेला रोहित पवारांचं उत्तर
यानंतर आता काँग्रेसने या घटनांसाठी भारतीय जनता पार्टीला जबाबदार धरलं आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. ठाकूर यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “जातीय – धार्मिक विद्वेष वाढणं हे मोदींचे अपयश! हिंदू धर्म खतरें में हैं (हिंदू धर्म धोक्यात आहे) ची भीती दाखवून २०२४ च्या निवडणुकांची तयारी सुरू आहे. जनसामान्यांनी या षडयंत्राला बळी पडू नये. महाराष्ट्राची औद्योगिक सुरक्षा धोक्यात आणली जात आहे.” दरम्यान आमदार ठाकूर यांनी राज्यातल्या जनतेला आवाहन केलं आहे की, “या षडयंत्रापासून लांब राहा, तुम्हाला छत्रपती शिवरायांची शपथ आहे.”