scorecardresearch

सातारा : काळूबाईच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात मांढरदेव येथील यात्रेला सुरवात

काळूबाईच्या नावाने चांगभलं’ च्या जयघोषात मांढरदेव येथील यात्रेला सुरवात झाली. कडाक्याच्या थंडीत मांढर गडावर मोठ्या संख्येने भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली आहे.

सातारा : काळूबाईच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात मांढरदेव येथील यात्रेला सुरवात
संग्रहित छायाचित्र

वाई : काळूबाईच्या नावाने चांगभलं’ च्या जयघोषात मांढरदेव येथील यात्रेला सुरवात झाली. कडाक्याच्या थंडीत मांढर गडावर मोठ्या संख्येने भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली आहे. देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाकडून देवीची सालंकृत पूजा करण्यात आली. देवीला यावेळी सोन्याच्या दागिन्यांनी मढविण्यात आले. मंदिर आणि परिसर आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजविण्यात आले आहे.

मांढरदेव येथील काळूबाई यात्रा दरवर्षी पौष पौर्णिमेला (शाकंभरी पौर्णिमेला) भरते. यात्रेनिमित्त प्रशासनाकडून आज जिल्हा न्यायाधीश तथा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा मंगला धोटे, जिल्हा सत्र न्यायाधीश शिवय्या नंदीमठ व वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रणजित भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शितल जानवे – खराडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे सर्व ट्रस्टी निवासी नायब तहसीलदार गितांजली गरड, वैशाली जायगुडे, स्वरुपाताई संग्राम थोपटे पहिले भाविक रोशनी व राहुल कदम, विंग सातारा आदींच्या उपस्थिती महापूजा करण्यात आली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – जळगावात आजपासून बालगंधर्व संगीत महोत्सव

यात्रेनिमित्त गुरुवारी गडावर देवीचा जागर, गोंधळ झाला. काळूबाई देवीची रात्री मांढरदेव गावातून ढोल ताशांच्या गजरात, गुलालाच्या उधळणीत छबिना मिरवणूक काढण्यात आली होती. छबिण्यानंतर पहाटे पालखी देवीच्या मंदिराजवळ आली. मंदिरालगतच्या पारावर पालखी आल्यानंतर भाविकांनी दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. मुखवटे घेतलेल्या असंख्य महिला भाविकांनी गर्दी केली होती. सातारा प्रशासनाकडून यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. खाजगी सुरक्षा रक्षक बंदोबस्त करण्यात आला आहे. वाईला कृष्णातीर गणपती घाट भाविकांनी फुलून गेला आहे. दोन वर्षांच्या करोनाकाळानंतर यात्रा भरत असल्याने मोठी गर्दी आहे.

प्रतिबंधात्मक बंदी आदेशानुसार मांढरदेव परिसरामध्ये यात्रा कालावधीमध्ये मांढरदेव मंदिर परिसरामध्ये नारळ फोडणे, तेल वाहण्यास पूर्ण बंदी करण्यात आलेली आहे. पशुहत्या करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोंबड्या, बकऱ्या, बोकड इत्यादी प्राण्यांचा बळी देण्यास, हत्या करण्यास तसेच वाहनातून यात्रेच्या ठिकाणी घेवून जाण्यास मनाई करण्याती आली आहे.

हेही वाचा – नाशिकमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर संजय राऊतांची खोचक टीका, म्हणाले “दोन-चार दलाल…”

मांढरदेव परिसरात वाद्य आणण्यास व वाजविण्यास, मांढरदेव परिसरात तसेच देवालयाच्या परिसरात असणाऱ्या झाडांवर खिळे ठोकण्यास, लिंबू टाकणे, काळ्या बाहुल्या, बिबे, भानामती करणे, करणी करण्यास प्रतिबंध करण्यास आले आहे. तसेच, परिसरात दारू, मद्य जवळ बाळगणे, वाहतूक करणे, विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. एकूणच मांढर गडावर भाविकांची मोठी गर्दी असून देवीचा जयजयकार सुरू आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-01-2023 at 13:20 IST

संबंधित बातम्या