यवतमाळमधील हिंसक आंदोलनानंतर अखेर किशोर दर्डा यांना अटक

सोमवारी पहाटे किशोर दर्डा यांना नागपूरमधून अटक करण्यात आली

yavatmal public school, kishor darda
किशोर दर्डा यांच्या अटकेच्या मागणीसाठी गेलो काही दिवस यवतमाळ शहरात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केले. या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळणही लागले.

जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीच्या यवतमाळ पब्लिक स्कूल (वायपीएस) या शाळेतील विद्यार्थिनींच्या लैंगिक छळप्रकरणी सोमवारी पहाटे शाळेच्या व्यवस्थापन समितीचे प्रमुख आणि सोसायटीचे सचिव किशोर दर्डा यांना पोलिसांनी अटक केली. किशोर दर्डा यांच्या अटकेच्या मागणीसाठी गेलो काही दिवस यवतमाळ शहरात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केले. या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळणही लागले.
दर्डा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा आणि किशोर दर्डा यांच्या अटकेच्या मागणीसाठी रविवारी संतप्त जनतेचा पुन्हा उद्रेक झाला होता. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी महिलांवर दगडफेक केल्याचा आरोप होत असून नागरिकांवर लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या तसेच हवेत बंदुकीच्या सात फैरी झाडल्याने जमाव भडकला होता. किशोर दर्डा घरी नसल्याचे कळल्यावर त्यांच्या अटकेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलीस दलाला त्यांचा शोध घेणे आणि त्यांच्या भ्रमणध्वनीचे लोकेशन शोधून काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सोमवारी पहाटे किशोर दर्डा यांना नागपूरमधून अटक करण्यात आली. त्यांना सोमवारीच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
खासदार निधीतून विजय दर्डा यांनी यवतमाळमध्ये उभारलेल्या कामांचे जेथे जेथे फलक आहेत ते सर्व उखडून फेकण्याचा सपाटा संतप्त जमावाने लावला होता. संतप्त जमावाने ‘दर्डा नाका’ चौकाला ‘दारव्हा नाका’ असे नाव दिले. त्यामुळे या परिसराला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले. लोहाऱ्याजवळील दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयावरही दगडफेक करण्यात आली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ शहरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Yavatmal public school kishor darda arrested

ताज्या बातम्या