Kalyan Station Video Viral मध्य रेल्वेची लोकल सेवा म्हणजे मुंबई आणि उपनगरातल्या लोकांसाठी महत्त्वाची लोकल सेवा. दरम्यान एक कल्याण स्टेशनवरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कल्याण रेल्वे स्थानकावरून बदलापूरकडे जाणाऱ्या लोकलमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. महिलांच्या डब्यात प्रवास करणाऱ्या एका तरुणीला काही महिला प्रवाशांनी बेदम मारहाण करत तिचे केस ओढून तिला जबरदस्तीने लोकलमधून खाली उतरवले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून संबंधित महिलांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.

नेमकी घटना काय घडली?

समोर आलेल्या माहितीनुसार कल्याणहून बदलापूरला जाणारी लोकल सुटत होती. त्यावेळी महिलांच्या डब्याजवळ गर्दी झाली होती. त्याचवेळी एका तरुणीचा तोल गेला आणि ती पडली. ज्या कारणावरुन काही महिला प्रवाशांनी संताप व्यक्त करत या तरुणीला शिवीगाळ केली आणि मग लाथा-बुक्क्यांनी मारलं आणि लोकलमधून ढकलून दिलं. ही घटना स्टेशनवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. महिलांची प्रचंड बाचाबाची, आरडाओरड सगळं यामध्ये ऐकू येतं आहे. या महिला सदर तरुणीला शिवीगाळही करत आहेत.

व्हायरल व्हिडीओत काय दिसतं आहे?

एका तरुणीशी बाचाबाची सुरु असते. दुसरी महिला येऊन त्या तरुणीला धक्काबुक्की करते आणि मारहाण करते. यानंतर ही तरुणी दुसऱ्या डब्यात जाण्याचा प्रयत्न करते. मात्र गर्दी खूप असल्याने तिला त्या डब्यात जाता येत नाही. ही तरुणी पुन्हा या डब्यात चढण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी तिला चढू देऊ नका असं खाली उभ्या असलेल्या बायका सांगतात. ही तरुणी कशीबशी गर्दीत दरवाजाला लटकून उभी राहते. तेवढ्यात शिव्या देणारी एक बाई तिचे केस ओढून तिला खाली खेचते. ज्यानंतर ही तरुणी चिडते. ती पुन्हा ट्रेन पकडायचा प्रयत्न करते. पण ट्रेन सुटते. खाली उभ्या असलेल्या महिला तिला शिवीगाळ करतात. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे

घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) आणि स्थानिक पोलिसांनी दखल घेत तपास सुरू केला आहे. व्हिडिओच्या आधारे आरोपी महिलांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, लवकरच त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या स्वतंत्र डब्यातच अशा प्रकारची हिंसक घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.