गरज नसताना माझं घर फोडलं, सहकारी फोडले. मी सहन केले. आता एक-दोन नव्हे तर राज्यातील १७ दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये घेऊन अख्खी राष्ट्रवादीच फोडली. शिवसंग्रामचे विनायक मेटे महायुतीतील सहावे घटक पक्ष झाले. जिल्हय़ातील अनेक नेते संपर्कात आहेत. मात्र, मीच आता त्यांना राष्ट्रवादीत राहूनच मदत करण्याचा सल्ला देत असल्याचे स्पष्टीकरण खासदार गोपीनाथ मुंडे यांनी दिले.
मेटे यांच्यासोबत पत्रकारांशी बोलताना मुंडे म्हणाले की, राज्यात महायुतीची हवा, तर देशात मोदींची लाट असल्याने विजय निश्चित आहे. महायुतीबरोबर पाच घटक पक्ष होते. आता मेटे आरक्षणाच्या मुद्यावर महायुतीत सामील झाल्यामुळे ते सहावा घटक पक्ष झाले आहेत. राज्यात मराठा समाजाचे मतपरिवर्तन होण्यास त्याचा फायदा होणार आहे. गरज नसताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझे घर फोडले. काही सहकारी फोडून घेतले. मी सहन केले. मात्र, आता एक-दोन नव्हे, तर राज्यातील राष्ट्रवादीचे तब्बल १७ दिग्गज नेते फोडून राष्ट्रवादीला जेरीस आणले आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार मेटे, माजी आमदार भीमराव धोंडे, साहेबराव दरेकर, प्रदेश सरचिटणीस फुलचंद कराड, तालुकाध्यक्ष बबन सिरसाट असे अनेक नेते आपल्याकडे आले आहेत.