केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज (शुक्रवार) पत्रकारपरिषदेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी शिवाजीपार्कवरील दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेल्या ४० आमदारांवर निशाणा साधला. त्यांच्या या भाषणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना आज नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नारायण राणे म्हणाले, “२०१९ मध्ये ५६ आमदार मोदींचं नाव सांगून भाजपा-शिवसेना युतीमध्ये निवडून आणले. त्यानंतर युती असूनही भाजपासोबत आले नाही. मग ते का गेले काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत? केवळ मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी हिंदुत्वाचा त्याग केला, बेईमानी केली, गद्दारी केली. उद्धव ठाकरे फार खोटं बोलतात म्हणून मी त्यांचं लबाड लांडगा असं नाव ठेवलं आहे. ते सगळं काही खोटं बोलतात. एकनाथ शिंदेच्या मेळाव्यातील कालची भाषणं तुम्ही ऐकली असतील. खासदार शेवाळे काय म्हणाले? मनोहर जोशींना शिवाजीपार्कवर मंचावर बसवलं, त्याच मनोहर जोशींच्या घरावर सदा सरवणकरला हल्ला करायला याच खोटारड्या माणसाने सांगितलं होतं.”

तुम्ही कधी कुटुंब, मातोश्री सोडून गेलात का? –

याशिवाय “माझ्यासमोर उभा राहून दाखवा, आम्हाला बाळासाहेबांनी घडवलं आहे. आमच्या रक्तात स्वाभिमान भरलेला आहे. तुमच्या सुपाऱ्या देखील काही काम करू शकल्या नाहीत. नारायण राणेला मारण्यासाठी शकील, छोटा राजन यांना सुपारी दिली होती. काय झालं मारलं का कोणी? मी जिवंत आहे. मी तुम्हाला पुरून उरेन. आता तुम्ही एकनाथ शिंदेवर बोलताय, काय तर म्हणे पदं दिली. उपकार नाही केले. ही शिवसेना वाढवली कोणी, टिकवली कोणी, सत्तेपर्यंत आणली कोणी? केवळ शिवसैनिकांनीच. त्या शिवसैनिकांमध्ये एकनाथ शिंदे आणि ते ४० आमदार आहेत. ज्यांनी शिवसेना वाढण्यासाठी स्वत:वर गुन्हे दाखल करून घेतले, दिवसरात्र एक केला, कुटुंब स्वत:पासून दूर ठेवलं आणि पक्षाला वाहून घेतलं. तुम्ही कधी कुटुंब, मातोश्री सोडून गेलात का? अंगावर घेतली का एकतरी केस? एखाद्या विरोधकांच्या कानशीलात तरी लगावली का? यांचं योगदान तरी काय आहे? महाराष्ट्रात दंगली झाल्या तेव्हा हे कुठं होते? पुरस्थितीत कोणाचा जीव वाचवला नाही, कोणाला धान्य दिलं नाही की दंगलीत कोणाचा जीव वाचवला नाही. नुसत्या बढाया मारतात.” असं नारायण राणेंनी यावेळी म्हटलं.

आई-वडिलांनी घेतली नाही तेवढी काळजी आमची बाळासाहेबांनी घेतली –

तर “जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असतील तर त्यांना अधिकार आहे, हक्क आहे. त्यांचे कष्ट आहे. पक्षवाढीसाठी योगदान आहे. शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचली ती एकनाथ शिंदे, नारायण राणे या सगळ्यांमुळेच पोहचली आहे. तुम्ही आयत्या बिळावर नागोबा आहात. तुम्ही काहीच कामाचे नाहीत. माझं घर कोकणात जाळलं, तेव्हा मुंबईतून शिवसैनिक निघाले होते. तेव्हा याच माणासाने फोन करून महाडवरून त्यांना परत बोलावलं होतं. ते फार कपटी वृत्तीचे आहेत, तुम्हाला बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. बाळासाहेब असे कधीच नव्हते, त्यांनी शिवसैनिकांवर प्रेम केलं आणि विश्वासही ठेवला. आमच्या आई-वडिलांनी जेवढी काळजी घेतली नाही तेवढी काळजी बाळासाहेबांनी घेतली. तुम्ही कधी कोणाची काळजी घेतली का?” असा सवालही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You paid shakil chhota rajan to kill me but i am alive narayan rane criticizes uddhav thackeray msr
First published on: 07-10-2022 at 16:17 IST