पिकाला भाव नाही, त्यामुळे बँकांचे घेतलेले कर्ज फिटत नाही, भरपूर कष्ट केले पण निसर्ग साथ देत नाही. शेतीत परवडत नाही, म्हणून वित्तीय संस्थेत नोकरी केली. त्यांनीही फसविले, अशी कैफियत मांडत गळिनब (ता. श्रीरामपूर) येथील दत्तात्रय बाजीराव वडितके (वय ४५) या शेतकऱ्याने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली.
दत्तात्रय वडितके यांनी त्यांच्या गळिनब शिवारातील शेतात िलबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्यामागे वृध्द आई-वडिल, भाऊ, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. मुलीचे लग्न, आई-वडिल आजारी, नापिकीमुळे झालेले कर्ज, वित्त संस्थेने केलेली फसवणूक यामुळे त्यांनी आत्महत्या केली असून राज्य सरकारने लक्ष घालून न्याय देण्याची मागणी केली आहे.
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी म्हटले आहे की, शेतकरी आत्महत्या उगाच करीत नाही. उत्पन्न नसल्यावर घेतलेल्या पिकाला भाव नसल्यामुळे कर्ज झाल्यामुळे ते फेडायचे कधी, त्यात घरातील मुलांचे शिक्षण, आजार अशी अनेक कारणे आहे. माझ्याकडे सेंट्रल बँक, सेवा संस्था व आयसीआयसीआय बँकेचे कर्ज आहे. ते फेडण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, कष्ट केले. पण निसर्ग साथ देईना आता करायचे काय म्हणून पल्स कंपनीत एजंट म्हणून काम केले, ती बंद पडली. कंपनीने टीडीएस भरला नाही. त्यामुळे आम्हाला काहीच मिळाले नाही. नातेवाईकांची गुंतवणूक या कंपनीत होती. त्यांनी पैसे परत न केल्याने नातेवाईक शिव्या देत. भांडणे करत त्यामुळे आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग नव्हता. आता सरकारने तरी न्याय द्यावा अशी मागणी चिठ्ठीत दत्तात्रय वडितके यांनी आत्महत्या करण्यापूर्वी केली आहे. लोणी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला. आत्महत्या झाल्यानंतर पोलिसांनी दखल घेतली नाही. आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या पल्स कंपनीची साधी चौकशीही केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या निष्क्रियतेचा निषेध केला जात आहे.