सांगली : येळवी (ता. जत) येथील औदुंबर विजय जगताप (वय २२) या तरुणाने समाज माध्यमावर स्वत:ला श्रद्धांजली वाहून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. अशा पद्धतीने आत्महत्या करण्याची जिल्ह्यातील एक महिन्यातील ही दुसरी घटना आहे.
शुक्रवारी दुपारी तीन वाजता तरुणाने भ्रमणध्वनीवरील व्हॉटसअॅपच्या स्टेटसला स्वत:चे छायाचित्र टाकून भावपूर्ण श्रद्धांजलीचा संदेश प्रसारित केला. यानंतर काही वेळाने त्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. त्याचे घर येळवी गावापासून काही अंतरावर आहे. यामुळे रात्री हा प्रकार उघडकीस आला.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून, आत्महत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत. वाळवा येथे दि. २१ मार्च रोजी योगेश सचिन फाळके (वय २३) या तरुणाने समाज माध्यमावर ‘आय मिस यू’ असा संदेश देत गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रकार घडला होता. यानंतर असाच प्रकार काल येळवी या गावी घडला.
