scorecardresearch

आगीचा भडका उडाल्याने तरुण प्राध्यापकाचा मृत्यू

भाडे देऊन राहत असलेल्या भावाकडे मुक्कामास आलेल्या प्राध्यापक तरुणाचा आगीत मृत्यू झाल्याची घटना शहरातील वसमत रस्त्यावरील येलदरकर कॉलनीनजीक आनंदनगर येथे रविवारी सकाळी १०च्या सुमारास घडली.

आगीचा भडका उडाल्याने तरुण प्राध्यापकाचा मृत्यू

भाडे देऊन राहत असलेल्या भावाकडे मुक्कामास आलेल्या प्राध्यापक तरुणाचा आगीत मृत्यू झाल्याची घटना शहरातील वसमत रस्त्यावरील येलदरकर कॉलनीनजीक आनंदनगर येथे रविवारी सकाळी १०च्या सुमारास घडली. घटनास्थळी पेट्रोलचे कॅन पोलिसांना आढळून आले. शहरात मात्र स्फोटात एक जण ठार झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. मृत प्रा. अतुल भगवान वाघमारे (वय २९) हा अंबाजोगाईच्या योगेश्वर तंत्रनिकेतनमध्ये कार्यरत होता. हा स्फोट नसून त्याने जाळून घेतले असावे अशी शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली आहे.
 शहरातील वसमत रस्त्यावरील येलदरकर कॉलनीच्या बाजूस असलेल्या आनंदनगरात प्रा. एल. एम. करंजकर यांच्या घरी वरच्या मजल्यावर वरपुडकर पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये प्राध्यापक पदावर कार्यरत अमोल वाघमारे हे त्यांच्या तीन भावंडांसह भाडे देऊन राहतात. तर जुळा असलेला भाऊ अतुल वाघमारे हा अंबाजोगाई येथील योगेश्वरी तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्राध्यापक पदावर कार्यरत होता. प्रा. अतुल वाघमारे हे शनिवार ३१ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास अंबाजोगाईहून परभणी येथील आपल्या भावाकडे मुक्कामास आला होता. रविवारी सकाळी १० च्या सुमारास अमोल व त्यांचे भाऊ चहा व नाश्त्यासाठी बाहेर गेले होते. तर प्रा. अतुल वाघमारे हे एकटेच घरात होते. परंतु काही वेळानंतर या खोलीत अचानक आगीचा भडका उडाला. मोठा आवाज झाल्याने तो नेमका कशाचा, हे  शेजाऱ्यांनी पाहिले असता अतुल हा जागीच ठार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ चहा घेण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रा. अमोल व त्यांच्या इतर भावंडांना फोनवरून कळविले. ते घटनास्थळी धावत आले. मात्र तोपर्यंत अतुल हा जळून खाक झाला होता. या आगीत त्याच्या देहाचा अक्षरश कोळसा झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अनंत रोकडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नियती ठाकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणय अशोक, सपोनि गुलाब राठोड घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बॉम्ब शोधक व नाशक पथकही पाचारण करण्यात आले होते. िभतीवर जळालेली काजळी आणि इतस्तत: जळून पडलेली कागदपत्रे होती. छताला हादरे बसल्यामुळे काही ठिकाणी छिद्रेसुद्धा पडली होती. घराच्या बाहेर पेट्रोलने भरलेले एक कॅन पोलिसांना सापडले. घरामध्ये पोलिसांना कोणतीही स्फोटके किंवा रसायने आढळून आलेली नाहीत. त्यामुळे ही जळिताची घटना नेमकी कशाची हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. सायंकाळी उशिरापर्यंत नवा मोंढा पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2015 at 01:20 IST

संबंधित बातम्या