सांगली : सांगलीतील शंभर फुटी रस्त्यावर गुरुवारी सकाळी हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एका भाजी विक्रेत्या तरुणाचा खून झाला असून, हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचा पोलिसांचा कयास आहे. शंभर फुटी रस्त्यावर गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास महेश प्रकाश कांबळे (वय ३७, रा. इंदिरानगर) याच्यावर दगड व हत्याराने वार करण्यात आले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. शंभर फुटी रस्त्यावर ठोक भाजीपाला विक्री होत असते. या वेळी मृत कांबळे हा भाजी खरेदीसाठी आला असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला.
मृत कांबळे यांच्यावर २०२१ मध्ये फिरोज उर्फ बडे शेरअली शेख याचा खून केल्याचा आरोप असून, सध्या तो जामिनावर कारागृहाबाहेर आहे. जामिनावर आल्यापासून तो भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. शेख याचा खून आर्थिक कारणातून झाला होता. याच कारणातून कांबळेचा खून झाला असावा, असा पोलिसांचा होरा असून, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. हल्लेखोर हाती आल्यानंतर खूनामागील कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.