scorecardresearch

रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात अमली पदार्थासह तरुणाला अटक

६१ हजार ४४० रुपयांचे ब्राऊन हिरोईन व १० हजार रुपयांचा गांजा असे एकूण ७१ हजार ४४० रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

arrest
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानकानजीक असलेल्या कोकण प्लाझासमोर ब्राऊन हिरोईन या अमली पदार्थासह गांजा विक्री करणाऱ्या साहिल हनिफ मेमन (वय २५ वर्षे, रा. झारणी रोड बाजारपेठ) याला शहर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार साहिलकडून सुमारे ६१ हजार ४४० रुपयांचे ब्राऊन हिरोईन व १० हजार रुपयांचा गांजा असे एकूण ७१ हजार ४४० रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्याला अटक करण्यात आली असून त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश येथील न्यायालयाने दिले आहेत.

पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांनी अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याची सूचना अंमलदारांना दिली आहे. त्यानुसार शहर पोलिसांचे गस्ती पथक तपासणी करत असताना गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्थानक परिसरात साहिल मेमन आपल्या दुचाकीला लावलेल्या पिशवीत सुमारे ११ ग्रॅम वजनाचे ६१ हजार ४४० रुपये किमतीचे ब्राऊन हिरोईन व ५१० ग्रॅम वजनाचा गांजा घेऊन विक्रीसाठी थांबला होता. त्याला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेऊन त्याच्याकडील ७१ हजार ४४० रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे. साहिल मेमेन याच्या विरोधात एनडीपीएस कलम ८ (क) २० (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने केले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 03:54 IST

संबंधित बातम्या