मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात सोलापूर येथील तरुणाने बुधवारी विधानभवनाबाहेरील परिसरात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे यावेळी मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी या तरुणाला तत्काळ ताब्यात घेतले.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी दादासाहेब बबन कलसैत (३८) हे बुधवारी सकाळी विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले. त्यानंतर सोबत आणलेल्या डब्यातील रॉकेल स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. ते पेटवून घेण्याच्या तयारीत असतानाच तैनात पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी तातडीने धाव घेत त्यांच्या हातातील काडीपेटी हिसकावून घेतली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र अचानक घडलेल्या प्रकारामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण होते.

घटनेनंतर पोलिसांनी कलसैत यांना ताब्यात घेतले. मरिन ड्राईव्ह पोलिसांनी केलेल्या चौकशीत जमिनीवर उभारलेला विश्वकर्माचा पुतळा नगरपंचायतीने अलीकडेच हटवला होता. यामुळे संतप्त झाल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. या प्रकरणी कलसैत यांच्याविरोधात कलम २२६ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दिली.