दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसह २०१३ मधील भूसंपादन कायदा रद्द करावा, या मागणीसाठी प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. निवेदन देण्यापूर्वी आयुक्त कार्यालयात बैलगाडी घेऊन जाऊ द्यावी, या साठी कार्यकर्ते आग्रही होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अटकाव केला. प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

भूमी अधिग्रहण कायद्याविरोधात विभागीय पातळीवर मोर्चा काढण्याचे आदेश काँग्रेसने कार्यकर्त्यांना दिले होते. जेथे दुष्काळ आहे, तेथील मागण्यांचाही समावेश करावा, असे नमूद करण्यात आले होते. मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये व बागायतदारांना ५० हजार रुपयांची मदत करावी, शेतकऱ्यांना सलग १० तास वीजपुरवठा करावा आदी मागण्यांचे निवेदन कदम यांनी विभागीय आयुक्तांना सादर केले.
जाहीर केलेले पॅकेज व प्रत्यक्ष मदत यात तफावत असून सरकार दिशाभूल करीत असल्याचा आरोप कदम यांनी मोर्चानंतर केला. आघाडी सरकारच्या काळातील मदतीचे आकडे व आताचे आकडे सारखेच असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर ती मदत व ही मदत यात बराच काळ लोटला असल्याचे त्यांनी सांगितले. सुरज हेगडे, हिंमतसिंह, हरिकृष्ण, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, प्रभाकर मुठे पाटील, अब्दुल समीर अब्दुल सत्तार, जावेद पटेल, धीरज देशमुख, प्रभाकर पाटील आदींची उपस्थिती होती.