सांगली : मिरज शहरातील नागरी प्रश्‍नासह विविध प्रश्‍नाकडे पालकमंत्री सुरेश खाडे यांचे दुर्लक्ष झाले असून यावेळी हा मतदार संघ शिवसेना लढविण्यास तयार आहे असे मत सांगली जिल्हा युवा शिवसेना प्रमुख सचिन कांबळे यांनी गुरूवारी पत्रकार बैठकीत सांगितले.

ते म्हणाले, मतदार संघ  राखीव होण्यापुर्वी हा मतदार संघ शिवसेनेने  लढविला होता. यामुळे या मतदार संघावर शिवसेनेचा आणि शिवसेना प्रमुख बाळाासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पगडा आहे. यावेळी शिवसेना मोठ्या ताकदीने विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत असून लवकरच पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेउन महायुतीमध्ये मिरज मतदार संघासाठी हक्क सांगण्याबाबत चर्चा करणार आहेत.

हेही वाचा >>>“शरद पवारांपासून तर ममता बॅनर्जींपर्यंत सगळे आमच्या पंगतीत जेवून गेले, त्यांना वाढायला मीच होतो”; रावसाहेब दानवेंचं विधान चर्चेत!

मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे पालकमंत्री खाडे यांनी शहराच्या विकासाकडे फारशा गांभीर्याने पाहिले नाही. यामुळे प्रस्थापिताविरूध्द तीव्र असंतोष मतदार संघामध्ये दिसत आहे. ज्या प्रमाणे लोकसभेवेळी ज्या प्रमाणे भाजप उमेदवाराविरूध्द असलेला असंतोष मताच्या स्वरूपात पुढे येउन पराभव पत्करावा लागला तशीच वेळ विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीची होउ शकते. यामुळे यावेळी हा मतदार संघ शिवसेनेला मिळावा अशी आमची मागणी आहे. जर पक्षाने आदेश दिला तर मी निवडणूक लढविण्यास तयार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख रावसाहेब घेवारे, महिला आघाडीच्या माजी जिल्हा प्रमुख सुनिता मोरे, नाना शिंदे आदी उपस्थित होते.