Yugendra Pawar On Ajit Pawar Death : अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी बारामतीमध्ये विमान दुर्घटनेत निधन झालं. मात्र, आता अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अजित पवारांच्या मृत्यूनंतर रोहित पवारांनी १० फेब्रुवारी आणि १८ फेब्रुवारी अशा दोन दिवशी पत्रकार परिषद घेऊन अनेक सवाल उपस्थित केले. तसंच अनेक प्रश्न उपस्थित करणारे सादरीकरणही त्यांनी केलं होतं.
दरम्यान, अजित पवारांचा घातपात की अपघात? याबाबत आता युग्रेंद्र पवारांनाही शंका असून याबाबत युग्रेंद्र पवारांनीही या दुर्घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. याबाबत आज माध्यमांशी बोलताना युग्रेंद्र पवारांनी मोठं भाष्य केलं.
अजित पवारांचा घातपात की अपघात? याबाबत पत्रकारांनी युग्रेंद्र पवारांना प्रश्न विचारला असता युगेंद्र पवारांनी म्हटलं की, ‘अजित पवारांच्या विमान अपघाताची लवकरात लवकर चौकशी करावी, चौकशीनंतरच अजित पवारांचा घातपात की अपघात? हे स्पष्ट होईल.’
युगेंद्र पवार काय म्हणाले?
“अजित पवारांच्या अपघाताची सखोल आणि लवकरात लवकर चौकशी झालीच पाहिजे. घातपाताबाबतचे आरोप केले जात आहेत, याबाबत आधी चौकशी झाली पाहिजे. या घटनेची चौकशी सीबीआयकडे देण्यात आलेली आहे. तसेच डीजीसीआयचं पहिलं ऑडिट कालच झालेलं आहे. व्हीएसर कंपनीची ४ विमाने ग्राउंड करण्याचा डीजीसीएने निर्णय दिला आहे. याबाबत मी आणखी एक इच्छा व्यक्त करतो की व्हीएसर कंपनीची ४ विमाने नाही तर सर्वच विमाने ग्राउंड केले पाहिजेत”, अशी मागणी युगेंद्र पवार यांनी केली.
“अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी जेव्हा लवकरात लवकर होईल, तेव्हा जनतेला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, तेव्हा आपल्याला कळेल की अजित पवारांचा नेमकं घातपात झाला की अपघात”, असंही युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.
आज पोलीस ठाण्यात काय घडलं? रोहित पवारांनी सांगितला घटनाक्रम
डीजीसीएने व्हिसीआर या कंपनीविरोधात कारवाई करत त्यांचे चार विमाने ग्राऊंड केली. डीजीसीएचा याबाबतीत अहवाल आल्यानंतर अनेकांविरोधात गुन्हा दाखल कऱण्याकरता आज रोहित पवार मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांची तक्रार पोलिसांकडून ऐकून घेतली जात होती, त्यानुसार त्यांचं स्टेटमेंट लिहायला सुरुवात झाली. तेवढ्यात तिथे मोठे अधिकारी आले आणि त्यांनी एफआयआर दाखल करता येणार नाही असं सांगितलं. त्यामुळे रोहित पवारांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर येऊन माध्यमांसमोर संताप व्यक्त केला.
रोहित पवार म्हणाले, “डीजीसीएकडून सर्क्युलर काढण्यात आलं. त्यानुसार, व्हिएसआर कंपनीच्या पाच विमानांवर कारवाई करून ग्राऊंड केलं. त्या पत्रकानुसार व्हिएसआर कंपनी जबाबदार आहे, असं अप्रत्यक्षपणे समोर आलं. तसंच, डीजीसीएच्या अंतर्गत विमान एअरवर्दी आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी डीजीसीएची असते. त्यासंदर्भात केंद्र सराकरकडून पत्रक आल्यानतंर, त्याचा उपयोग करून आम्ही मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात येऊन एफआयआर करण्याचा प्रयत्न केला.”
“मग आम्ही आमच्या वकिलांमार्फत त्यांना कायद्यातील तरतूद सांगितली. त्यांनी एफआयआर दाखल करायला लॅपटॉप आणला होता, स्टेटमेंट टाइप करायला सुरुवात झाली. तेवढ्यात मोठे अधिकारी डीसीपी तिथे आले, त्यांनी तिथे येऊन सांगितलं की एफआयआर होऊ शकत नाही. कारण ते म्हणाले की तो त्यांचा अधिकार आहे. cognizable offence असेल तर एफआयआर होऊ शकत नाही, ते असं म्हणाले. तसंच ते असंही म्हणाले की तुम्हाला ज्यांना सांगायंचं आहे त्यांना सांगा”, असं म्हणत रोहित पवारांनी संताप व्यक्त केला आहे.

