रत्नागिरी – दक्षिण रत्नागिरीतील युवासेनेच्या गडाला मोठे भगदाड पडले असून, युवासेना जिल्हाप्रमुख केदार उर्फ मुन्ना मधुसूदन देसाई यांनी आपल्या पदाचा अधिकृत राजीनामा देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. देसाई यांनी जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला असला, तरी ‘वैयक्तिक अडचणी’ हे कारण केवळ औपचारिक असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

हा राजीनामा म्हणजे पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाला बसलेला थेट राजकीय धक्का असल्याचे बोलले जात आहे. माजी सभापती परशुराम कदम यांच्या बंडखोरीनंतर त्यांच्यावर पक्षाकडून करण्यात आलेल्या कारवाईविरोधातच मुन्ना देसाई यांनी बंडखोर भूमिका घेतल्याची दबक्या आवाजात चर्चा रंगू लागली आहे.

पक्षातील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागल्याचे स्पष्ट संकेत या राजीनाम्यातून मिळत आहेत. जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांना दिलेल्या पत्रात देसाई यांनी वैयक्तिक कारणांचा उल्लेख केला असला, तरी या राजीनाम्यामागे संघटनात्मक गोंधळ, अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वावरचा रोष असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

मुन्ना देसाई यांच्या राजीनाम्यानंतर युवासेनेच्या संघटनात्मक रचनेत मोठे फेरबदल अटळ मानले जात असून, रिक्त झालेल्या या महत्त्वाच्या पदावर कोणाची वर्णी लागते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर झालेला हा राजीनामा युवासेनेसाठी धोक्याची घंटा मानला जात असून, रत्नागिरीच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी ठरेल, असे संकेत मिळत आहेत. राजकीय वातावरण तापत असताना, हा राजीनामा पुढील काळात कोणते राजकीय वादळ उभे करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.