scorecardresearch

राज्यातील ३६ टक्के क्षेत्रात जमिनीमध्ये जस्ताची कमतरता; दुय्यम अन्नद्रव्यांचे प्रमाणही कमीच

राज्यात नुकताच केलेल्या कृषी विभागाच्या सर्वेक्षण व माती परीक्षणानुसार सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता वाढत असल्याचे आढळून आले.

राज्यातील ३६ टक्के क्षेत्रात जमिनीमध्ये जस्ताची कमतरता; दुय्यम अन्नद्रव्यांचे प्रमाणही कमीच

अकोला : महाराष्ट्रातील ३६ टक्के क्षेत्रात जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये जस्ताची कमतरता दिसून आलेली आहे. लोह व ‘बोरॉन’ आणि दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये प्रामुख्याने गंधकाचीसुद्धा कमतरता काही प्रमाणात दिसून आलेली आहे. राज्यात नुकताच केलेल्या कृषी विभागाच्या सर्वेक्षण व माती परीक्षणानुसार सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता वाढत असल्याचे आढळून आले. पिकांच्या वाढीवर त्याचा दुष्परिणाम होण्याचा धोका आहे.

शेतात पेरणीपूर्वी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. माती परीक्षणाद्वारे मातीतील उपलब्ध अन्नद्रव्ये नत्र, स्फुरद, पालाश त्याचप्रमाणे सामू, विद्युत वाहकता, चुनखडीचे प्रमाण समोर येते. त्यावरून पिकासाठी रासायनिक खताच्या मात्रा ठरवता येतात. पिकांच्या वाढीसाठी नत्र, स्फुरद व पालाश अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. सोबतच सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांची गरज असते. सध्याच्या शेती पद्धतीमध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांच्या वाणांचा वाढता वापर, पीक फेरपालट न होणे, सेंद्रिय खतांच्या वापराचा अभाव, असंतुलित खत वापर आदींमुळे जमिनीत सूक्ष्म अन्न द्रव्यांची कमतरता दिसून येते. पिकांना संतुलित प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने सूक्ष्म व अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन महत्त्वाचे असून त्याच्या योग्य वापरातून पीक उत्पादनात वाढ होऊन दर्जा सुधारतो, अशी माहिती कृषी शास्त्रज्ञांनी दिली.

मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा आवश्यकतेनुसार वापर केल्यास पिकांच्या उत्पादनात अधिक वाढ दिसून येते. त्यामुळे मुख्य अन्नद्रव्यांचे पिकांद्वारे शोषण वाढून मुख्य अन्नद्रव्येयुक्त खतांची कार्यक्षमता वाढते. मात्र, महाराष्ट्रातील तब्बल ३६ टक्के जमिनीत जस्ताची कमतरता आढळून आली आहे. दुय्यम अन्नद्रव्यांचीसुद्धा कमी आहे. जस्ताच्या कमतरतेमुळे पाने लहान व अरूंद व निमुळती होतात. पाने लहान होऊन शिरांमधील भाग पिवळा होतो. पाने ठिकठिकाणी गळतात व पानगळ होते. पिकांची वाढ खुंटून पीक फुलावर येण्यास व परिपक्व होण्यास उशीर होतो. पीक वाढीसाठी प्रत्येक सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य ठरलेले असते. प्रकाश संश्लेषण आणि हरितद्रव्ये निर्मिती सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवरच अवलंबून असते. पीक पोषणासाठी एकूण १७ अन्नद्रव्यांची गरज असते. त्यातील जस्त व दुय्यम अन्नद्रव्याचे प्रमाण पीक वाढीसाठी धोकादायक ठरत आहे.

जमिनीमध्ये माती परीक्षणानंतर जस्ताची कमतरता आढळून आल्यास पेरणीच्या वेळी १७-१८ किलो ‘झिंक सल्फेट’ खताबरोबर पेरून द्यावे किंवा ०.५ टक्के ‘झिंक सल्फेट’च्या द्रावणाची दोन ते तीन वेळेस फवारणी करावी, असा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या गहू संशोधन विभागाचे डॉ. स्वाती भराड व डॉ. भरत गीते यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठ व अखिल भारतीय सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्पांतर्गत विविध पिकांच्या शिफारशी करण्यात आलेल्या आहेत. त्याचा शेतकऱ्यांनी अवलंब करून पिकांना संतुलित खते द्यावेत, असे देखील सुचवण्यात आले आहे.

गव्हाच्या सरासरी उत्पादनात महाराष्ट्र मागे

गहू उत्पादन करण्यात भारत देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये सुमारे १०९.५२ मिलीयन टन गहू उत्पादित होतो. देशाची गहू उत्पादकता ३४.२४ क्विंटल प्रतिहेक्टर आहे. महाराष्ट्र राज्यासह विदर्भ विभागाची सरासरी उत्पादकता ही देशाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. पेरणी पद्धतीनुसार योग्य वाणांचा, सुधारित लागवड व खत व्यवस्थापन तंत्राचा अवलंब केल्यास महाराष्ट्राची गहू उत्पादकता वाढवता येणे शक्य असल्याची माहिती संशोधकांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या