जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्ष, तसेच जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांचे सभापती-उपसभापती निवडीच्या तारखा जाहीर झाल्या असून जि.प. अध्यक्षांची निवड २१ सप्टेंबर, तर पंचायत समिती सभापतींची निवड १४ सप्टेंबरला होणार आहे.
जि.प.मध्ये राष्ट्रवादीला पूर्ण बहुमत नाही. शेतकरी कामगार पक्ष, भाजपचे सहकार्य घेऊन दोन्ही पक्षांना एकेक सभापतिपद देऊन राष्ट्रवादीने सत्ता काबीज केली होती. राज्यात आघाडी असूनही येथे मात्र काँग्रेस विरोधी पक्षात आहे. जि.प.चे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. नूतन अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी २१ सप्टेंबरला जि.प. सभागृहात विशेष सभा आयोजित केली आहे. जि.प. सदस्यांनी सकाळी ११ वाजता सभागृहात उपस्थित राहावे. प्रत्यक्ष निवडून आलेल्या सदस्यांनाच निवडणूक प्रक्रियेत भाग घेता येईल व मतदान करता येईल. पंचायत समिती सभापतींना निवडणूक प्रक्रियेवेळी उपस्थित राहता येईल, परंतु मतदान करता येणार नाही.
जिल्हय़ातील ९ पंचायत समित्यांचे सभापती-उपसभापतिपदांची निवड करण्यासाठी पंचायत समिती सभागृहात १४ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता विशेष सभा आयोजिण्यात आली आहे. गंगाखेड, पाथरी, पालममध्ये सर्वसाधारण प्रवर्ग, जिंतूर, मानवत व पूर्णा सर्वसाधारण (महिला), सेलू अनुसूचित जाती (महिला), परभणी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सोनपेठला नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सभापतिपद आरक्षित आहे.