जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेस प्रथमच एकत्र आल्याने निर्माण झालेल्या मोठय़ा बहुमताच्या पाश्र्वभूमीवर अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मंजूषा राजेंद्र गुंड (कर्जत) व उपाध्यक्षपदी आण्णासाहेब शेलार (श्रीगोंदे) यांची आज, रविवारी बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादीच्या बंडखोर कालिंदी माधवराव लामखडे व शिवसेनेच्या सुरेखा कैलास शेळके या दोघांनी अध्यक्षपदासाठी तसेच उपाध्यक्षपदासाठी भाजपचे अशोक आहुजा यांनी दाखल केलला अर्ज मागे घेतला.
जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी जि. प. सभागृहात निवड सभा झाली. अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव होते. सीईओ शैलेश नवाल, उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय बोरुडे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी प्रक्रियेसाठी सहाय्य केले. सकाळी ११ ते १ यावेळेत अर्ज दाखल केले.
पक्षश्रेष्ठींनी श्रीमती गुंड यांचे नाव निश्चित केल्याने माधवराव लामखडे यांनी राष्ट्रवादीमधील नाराजांची जमावाजमव सुरु केली होती. त्याला भाजप-सेना युतीची जोड मिळाली होती. काँग्रेसच्या गटाकडेही मदत मागितली गेली होती. परंतु अपेक्षित संख्याबळ उभे न राहिल्याने अखेर त्यांनी माघार घेतली. आघाडीच्या मोठय़ा बहुमतापुढे भाजप-शिवसेनेचा निभाव लागणे अशक्य होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन इतर उमेदवारांना माघार घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज शिल्लक राहिल्याने श्रीमती गुंड व शेलार यांची निवड बिनविरोध झाली.
उपाध्यक्षपदासाठी दाखल केलेले अर्ज मागे घेऊन श्रीमती प्रतिभा पाचपुते यांच्यासह भाजपचे गटनेते बाजीराव गवारे व सदस्य निवड जाहीर होण्यापुर्वीच सभागृहातून निघून गेले. श्रीमती बर्डे व सदाफुले सूचक होते तरी त्यांच्यासह हर्षदा काकडे, अंजली काकडे, मंदा गायकवाड, तसेच सेनेचे बाबासाहेब तांबे, शारदा भिंगारदिवे, मंदा भोसले असे आठ सदस्य सभेस अनुपस्थित राहिले.
सर्वात तरूण जि. प. अध्यक्ष
अध्यक्षपदी निवड झालेल्या श्रीमती मंजुषा गुंड या सर्वात तरुण अध्यक्ष ठरल्या आहेत. त्यांच्यामुळे कर्जतला दुसऱ्यांदा अध्यक्षपद मिळाले. त्या जि. प.च्या तिसऱ्या महिला अध्यक्ष आहेत. त्यांचे पती व सासरेही सदस्य होते. त्यांचे वडील जि. प.चे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. निवडीच्या वेळी मुलांसह त्यांचे कुटुंब उपस्थित होते.