03 April 2020

News Flash

नाटय़ आणि संगीत!

बालगंधर्वकालीन पारंपरिक संगीत नाटकात ऑर्गन आणि तबला प्रत्यक्षात प्रेक्षकांच्या समोर वाजत असे.

‘नाटकाचं पाश्र्वसंगीत करताना सिनेमापेक्षा वेगळा विचार करावा लागतो का?’ हा मला नियमित हटकून विचारला जाणारा प्रश्न. श्रवणसंस्कार तर दोन्ही प्रेक्षकांवर एकसारखेच होतात. मग माध्यम बदललं तर पद्धत बदलते का? बदलत असेल तर का? आणि कशी?
नाटक हे जिवंत माध्यम आहे. रंगमंचावर प्रत्यक्ष गोष्टी घडत असताना प्रेक्षक त्याचा आस्वाद घेत असतात. चित्रपटात आधीच चित्रित करून त्यावर प्रक्रिया केलेले आणि नंतर छापलेले प्रसंग प्रेक्षक बघत असतात. दोन्ही माध्यमांना स्वत:ची बलस्थानं असली तरी त्यांच्यात बऱ्यापैकी फरक आहे. एकदा चित्रपटाची प्रिंट निघाली की तंत्रज्ञांचं काम संपतं. नाटकाचं तसं नसतं. प्रत्येक प्रयोगाला सेटवाले, लाइटवाले, साऊंडवाले, म्युझिकवाले काम करत असतात. पाश्र्वसंगीताची तत्त्वे दोन्ही माध्यमांमध्ये एकच असली तरी सिनेमाचं पाश्र्वसंगीत करण्यापेक्षा नाटकाला पाश्र्वसंगीत देणं आणि ते प्रत्यक्षात प्रत्येक प्रयोगात वाजवणं- या दोन्ही गोष्टी अधिक आव्हानात्मक असतात. कारण सिनेमात रिटेक करता येतात; नाटकात चुकीला क्षमा नसते.
बालगंधर्वकालीन पारंपरिक संगीत नाटकात ऑर्गन आणि तबला प्रत्यक्षात प्रेक्षकांच्या समोर वाजत असे. या नाटकांच्या रचनेत गद्य भाग कमी आणि पद्य भाग जास्त असायचा, हे आपल्याला ठाऊक आहेच. पुढे पुढे कथेला आणि संवादांना महत्त्व येऊ लागल्यानंतर नाटकातला पद्य भाग कमी झाला. १९६० च्या दशकात रंगमंदिरातल्या ध्वनियंत्रणेत सुधार होऊ लागले. आधुनिक माइक्स वापरात येऊ लागले, कारण नाटकातले संवाद स्पष्टपणे ऐकू येणं गरजेचं झालं. नाटकातल्या संगीताचाही वेगळा काळ सुरू झाला. पाश्र्वसंगीताचा उपयोग फक्त ब्लॅकआऊटचा वेळ भरून काढण्यापुरता होऊ लागला, तर नाटकातल्या गाण्यांमध्ये आधुनिक वाद्यांचा वापर होऊ लागला. आधुनिक संगीत असलेल्या नाटकांमध्ये प्रत्येक प्रयोगाला गिटार, ड्रम्स, फ्लूट वगैरे वाजवणारे वादक मिळणं अवघड झालं आणि काराओके ट्रॅकवर नाटकातली गाणी म्हणण्याचीही प्रथा सुरू झाली. पाश्र्वसंगीतही रेकॉर्ड करून स्पूल टेपवरून वाजवलं जाऊ लागलं. गद्य नाटक ‘स्थळ- दिवाणखाना’च्या पलीकडे गेल्यामुळे चित्रपटाप्रमाणे नाटकातही इतर ध्वनींचाही वापर होऊ लागला.
नाटक हे मुख्यत्वेकरून नटांचं आणि संवादाचं माध्यम असल्यामुळे त्यात तंत्रज्ञानाचा भडिमार करून चालत नाही. तरीदेखील प्रेक्षकांना सकस नाटय़ानुभव देण्याच्या दृष्टीने त्यात तंत्र न वापरलं गेलं तरच नवल. स्पूलची जागा सीडी प्लेअरनी घेतली आणि आता सीडी प्लेअरची जागा सॉफ्टवेअरनं. या तांत्रिक प्रगतीचा आढावा एवढय़ासाठीच, की बदलत्या तंत्राप्रमाणे नाटकामध्ये वापरल्या जाणाऱ्या संगीताचाही वेगळा विचार करणं प्राप्त होतं. केवळ ब्लॅकआऊट आणि अवकाश भरून काढणारं संगीत वापरण्याऐवजी संहितेला साजेसं संगीत देण्याची गरज निर्माण झाली. संगीतकाराला ‘नाटक’ हे माध्यम कळणं आवश्यक झालं.
कॉलेजच्या दिवसांपासूनच मला रंगभूमीचं बाळकडू मिळाल्यामुळे नाटक हा माझा जिव्हाळ्याचा विषय. १९८६ सालच्या सई परांजपे लिखित-दिग्दर्शित ‘माझा खेळ मांडू दे’पासून सुरू झालेला माझा नाटय़प्रवास नुकत्याच प्रदर्शित झालेल्या महेश एलकुंचवार लिखित, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकापर्यंत चालू आहे. या तीस वर्षांत मला २०० हून अधिक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकं करायला मिळाली. प्रत्येक नाटय़ानुभवातून, प्रत्येक दिग्दर्शकाकडून, प्रत्येक नटाकडून मी शिकत गेलो. अनेक लेखकांच्या नवीन-जुन्या संहितांनी मला वेगळा विचार करायला भाग पाडलं. भास्कर चंदावरकर, आनंद मोडक, अशोक पत्की यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारांचं अनमोल मार्गदर्शन लाभलं. नाटकातली खूप मोठी गंमत ही आहे, की त्यात तुम्ही तुम्हाला हवे ते प्रयोग करू शकता. म्हणूनच आपल्याकडे नाटकाच्या प्रत्येक खेळाला ‘प्रयोग’ म्हणतात! कधी कधी बाहेरची नाटकं बघून अचंबित व्हायला होतं आणि आपण असं काही का करू शकत नाही याची खंतदेखील वाटते.
भारतातलंच उदाहरण द्यायचं झालं तर मणिपूरच्या रतन थिय्याम यांचे प्रयोग विलक्षण नाटय़ानुभव देणारे असतात. अप्रतिम लाइव्ह म्युझिक आणि भव्य, डोळ्यांचं पारणं फेडणारी दृश्यं बघून अवाक् व्हायला होतं. ह्य़ांच्या नाटकासारखी नाटकं आपण मराठीत का करू शकत नाही, याची कारणमीमांसा करताना माझ्या असं लक्षात आलं की, मणिपूरमध्ये रेपर्टरी किंवा नाटक कंपनीची संकल्पना रुळली आहे. सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ नाटकाची नोकरी करतात आणि एकत्र राहूनच नाटक करतात. आपल्याकडची नाटक कंपनीची परंपरा आपल्या संगीत नाटकांबरोबरच लोप पावली. लंडनमधलं वेस्ट एन्ड किंवा न्यूयॉर्कमधलं ब्रॉडवे म्युझिकल बघताना तर माझ्या डोळ्यातनं घळाघळा पाणी वाहत असतं. उत्कट अनुभव मिळाल्याची ती पोचपावती असते. (कदाचित आपण भारतात असं काही करू न शकल्याची थोडी खंतही त्यात असेल!) आपण आपल्याकडे इतकं भव्यदिव्य का करू शकत नाही, याचं मुख्य कारण आपण नोमॅडिक थिएटर- म्हणजेच फिरत्या संचातलं नाटक करतो. एकाच नाटकाचा प्रयोग रोज वेगवेगळ्या रंगमंदिरात करत फिरतो. वेस्ट एन्ड किंवा ब्रॉडवेला एक नाटक वर्षांनुवषर्ं एकाच थिएटरमध्ये चालू असतं. म्हणजे रोजच ‘हाच खेळ उद्या पुन्हा’! ‘माऊसट्रॅप’ हे लंडनच्या वेस्ट एन्डला सगळ्यात जास्त दिवस चाललेलं नाटक आहे. १९५२ साली शुभारंभ झालेल्या या नाटकाचे रोज प्रयोग असतात- जे आजही अव्याहत चालू आहेत. (आत्तापर्यंतची प्रयोगसंख्या साधारण २६०००!!) न्यूयॉर्कच्या ब्रॉडवेवर दि मॅजेस्टिक थिएटरमध्ये १९८८ पासून चालू असलेल्या ‘फॅन्टम ऑफ दी ऑपेरा’ या संगीत नाटकाने नुकताच १२००० प्रयोगांचा टप्पा पार केला. रोज एकाच थिएटरमध्ये प्रयोग असल्यामुळे सेट, लाइट, म्युझिक या सगळ्याला लागणाऱ्या तांत्रिक यंत्रणांची हलवाहलव करायला लागत नाही. त्यामुळे त्यातली भव्यता जपता येते. आपल्याकडे आधीचं नाटक संपून त्याचे सेट, लाइट्स काढून आपलं सामान लावून प्रयोग सुरू करण्यामध्ये कधी कधी दीड ते दोनच तासांचा अवधी मिळतो. नाटक सुरू करायच्या आधी अल्पावधीत अनेक गोष्टी करायच्या असल्यामुळे या सगळ्या बाबींचा विचार नाटक करतानाच करावा लागतो. अत्यंत कमी वेळात सेट आणि लाइट्सचं काम चोख करणाऱ्या बॅकस्टेजच्या मंडळींना माझा कायम सलाम आहे.
चित्रपट आणि नाटक या दोन्ही माध्यमांमध्ये वावरत असल्यामुळे सिनेमाचं तंत्र नाटकात वापरण्याचे प्रयोगही मला करता आले. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुरेश चिखले लिखित नाटक- ‘प्रपोजल.’ हे अख्खं नाटक घडतंच मुळात मुंबईतील लोकलच्या डब्यात! आदिती सारंगधर आणि अमोल कोल्हे ही दोनच पात्रे असलेल्या या नाटकाची तालीम मी बघायला गेलो असताना दिग्दर्शक राजन ताम्हाणेने त्याला अभिप्रेत असलेल्या पाश्र्वसंगीताच्या जागा सुचवल्या. सीन बघता बघता मला प्रदीप मुळ्ये यांनी आपण केलेलं सेटचं डिझाइन दाखवलं. हुबेहूब लोकलच्या डब्याचा तो अफलातून सेट बघून माझ्या मनात एक वेगळाच सिनेमॅटिक विचार आला. अख्खं नाटक जर इतक्या खऱ्या दिसणाऱ्या लोकलच्या डब्यात घडत असेल तर लोकलचा आवाज हेच पाश्र्वसंगीत म्हणून का वापरू नये? राजनचा मी अत्यंत आभारी आहे, कारण त्याने माझा हा अतरंगी विचार धुडकावून तर लावला नाहीच, वर त्याला खतपाणी घालून तो आणखीन फुलवायला मदत केली. नाटकामध्ये नुसत्या साऊंड इफेक्ट्सचा संगीत म्हणून वापर करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यासाठी प्रयोगाला साऊंड सिस्टमही उत्तम लागणार होती. आमच्या निर्मात्या कल्पनाताई कोठारी यांनी कुठलेही आढेवेढे न घेता त्याला मान्यता दिली. ‘प्रपोजल’च्या प्रत्येक पडद्याला प्रदीपच्या सेटने, शीतल तळपदेच्या लाइटिंगने आणि अविनाश रासमने वाजवलेल्या माझ्या ट्रेनच्या साऊंड इफेक्टने टाळी घेतली! वाद्यसंगीत न वापरता केलेल्या या पाश्र्वसंगीताला मला परीक्षकांनी त्या वर्षीची बहुतेक सगळी संगीताची बक्षिसं बहाल केली. खरं म्हणजे संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेत्या प्रदीप मुळ्येंसारख्या निष्णात आणि कल्पक सेट डिझायनरच्या सेटचा या बक्षिसामध्ये मोलाचा वाटा आहे. प्रदीपनी आणि मी अनेक नाटकांमध्ये खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. नाटय़विश्वातले अनेक लोक आम्हाला तंत्रज्ञांमधले सलीम-जावेद म्हणतात. प्राप्त परिस्थितीत नवनवीन शकला लढवून आपलं सर्वोत्तम काम देणं हा आमचा दोघांचा बाणा. ब्रॉडवेचं नाटक बघून वाटणारी खंत- अनेक अडचणींमधून जाऊनही आपण प्राप्त परिस्थितीत इतकं देखणं नाटक करू शकतो, हा विचार मनात आल्यावर नाहीशी होते.
राहुल रानडे rahul@rahulranade.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2016 1:04 am

Web Title: drama and music
Next Stories
1 विचारवाटा आणि संगीत!
2 पाणघोडा आणि संगीत!
3 पाश्र्व आणि संगीत
Just Now!
X