03 April 2020

News Flash

चित्रपट आणि ध्वनी

भारतात बनलेला पहिला संगीतप्रधान बोलपट मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमामध्ये १४ एप्रिल १९३१ रोजी प्रदर्शित झाला.

रातकिडय़ांची किरकिर, पक्ष्यांचा किलबिलाट, वाऱ्याचं घोंघावणं, ढगांचा गडगडाट हे सगळे निसर्गामधले आवाज आपल्याला चित्रपटांमध्ये ऐकायला मिळतात याचं आपल्याला बिलकुल नवल वाटत नाही. एवढंच काय, सिगरेट शिलगावल्यावर तिच्या जळत्या टोकातून होणारी ‘चुर्र्र’, ग्लासमध्ये सोडा ओतल्यावर बुडबुडय़ांचा होणारा ‘फिझ्झ्’, म्यानातून तलवार काढल्यावर तिच्या पात्यातून येणारा ‘सण्ण्’ असे अत्यंत सूक्ष्म ध्वनीदेखील चित्रपटांमध्ये ऐकू येणार, हे आपण हल्ली गृहीतच धरतो! चित्रपट माध्यम अधिकाधिक जिवंत करण्यासाठी निर्माण केलेल्या या ‘ध्वनी’आलेखाचं आपल्याला अप्रूप वाटेनासं झालंय. चित्रपटनिर्मितीच्या सुरुवातीला हे कुठलेच ध्वनी अस्तित्वात नव्हते, याचा विसर पडावा इतके हे चित्रपटात ऐकू येणारे विविध आवाज आज आपल्या अंगवळणी पडले आहेत.
शनिवार, ३ मे १९१३- मुंबईत गिरगावातल्या ‘कॉरोनेशन सिनेमा’ या चित्रपटगृहात दादासाहेब फाळके यांनी संपूर्णपणे भारतात बनवलेला पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ प्रदíशत केला. हा मूक- चित्रपट होता, कारण तेव्हा चित्र आणि ध्वनी यांची सांगड घालणारं तंत्रज्ञान भारतातच नव्हे, तर जगात कुठेच अस्तित्वात नव्हतं. अर्थात एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकापासूनच या विषयावर प्रयोग चालू झाले होते. १८९५ साली थॉमस एडिसन यांच्या प्रयोगशाळेत विलियम डिक्सन यांनी २१ सेकंदाची एक ध्वनीचित्रफीत तयार करून पाहिली. ‘कायनेटोफोन’वर तयार केलेली ही ध्वनीचित्रफीत ध्वनी आणि चित्र एकत्रित केल्याचं जगातलं पहिलं उदाहरण मानलं जातं. साधारण याच काळात डे फॉरेस्ट यांनीदेखील ‘फोनोफिल्म’ ही प्रणाली विकसित केली होती. परंतु पूर्ण लांबीचा पहिला बोलपट प्रदíशत व्हायला यानंतर साधारण ३२ वर्षे जावी लागली! ६ ऑक्टोबर १९२७ या दिवशी वॉर्नर ब्रदर्सने ‘जॅझ सिंगर’ हा ‘व्हिटाफोन’ ही प्रणाली वापरून तयार केलेला चित्रपट न्यूयॉर्कच्या फ्लॅगशिप थिएटरमध्ये रिलीज केला. ‘व्हिटाफोन’ या प्रणालीमध्ये फक्त चित्र फिल्मवर असायचं. ध्वनी मात्र वेगळ्या तबकडीतून वाजत असे. ‘जॅझ सिंगर’चा काही भाग मूक होता आणि काही भागात संवाद आणि गाणी होती. पण ‘ऑडिओ व्हिज्युअल सिंक्रोनाइज्ड’ अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे ‘जॅझ सिंगर’ला मलाचा दगड मानलं गेलंय.
‘राजा हरीश्चंद्र’नंतर दादासाहेब फाळकेंनी ‘लंकादहन’, ‘श्रीकृष्णजन्म’, ‘काालियामर्दन’ असे अनेक मूकचित्रपट बनवले. कलिपदा दास, आर्देशीर इराणी, जे. जे. मदन, बाबुराव पेंटर, व्ही. शांताराम यांसारखे अनेक निर्माते-दिग्दर्शक मूक-चित्रपट बनवण्यात अग्रेसर होते. (खेद याचा वाटतो, की या २०७ पकी पूर्ण लांबीचे केवळ पाच ते सहाच चित्रपट आज अस्तित्वात आहेत. तर तुकडय़ा-तुकडय़ांमध्ये असलेल्या चित्रपटांची संख्या साधारण १० ते १५ असेल.) वीसच्या दशकात मूकपट अधिक रंजक बनवण्याकरिता एक अनोखी प्रथा सुरू झाली. सिनेमागृहात वादकांनी पिटात बसून पडद्यावर चाललेल्या मूक प्रसंगाला अनुसरून संगीत वाजवण्याची! चित्रपटाला ध्वनीचा साज चढवण्याचं हे पहिलं उदाहरण.
भारतात बनलेला पहिला संगीतप्रधान बोलपट मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमामध्ये १४ एप्रिल १९३१ रोजी प्रदर्शित झाला. इम्पिरियल मूव्हीटोन निर्मित, आर्देशीर इराणी दिग्दर्शित या हिंदी चित्रपटाचं नाव होतं ‘आलम आरा’! त्यामागोमाग पुढील नऊ महिन्यांतच- २३ जानेवारी १९३२ या दिवशी प्रभात फिल्म कंपनीने व्ही. शांताराम दिग्दíशत ‘अयोध्येचा राजा’ हा मराठी भाषेतला पहिला संगीतमय बोलपट प्रदíशत केला. गोिवदराव टेंबे या चित्रपटाचे संगीतकार होते आणि हीरोदेखील! इतर कलाकार होते- दुर्गाबाई खोटे, बाबुराव पेंढारकर आणि मास्टर विनायक. विष्णुपंत दामले यांनी संपूर्णपणे स्वत: विकसित केलेल्या ध्वनिमुद्रण यंत्रणेद्वारे ‘अयोध्येचा राजा’चे संवाद व गाणी ध्वनिमुद्रित केली होती. केशवराव धायबर कॅमेरामन होते आणि शांतारामबापू संकलक. या मंडळींची त्या काळातली तांत्रिक हातोटी बघून अक्षरश: थक्क व्हायला होतं. दामलेंनी ध्वनी माध्यमातलं कुठलंही प्रशिक्षण न घेता ध्वनिमुद्रणाचं जे तंत्र आत्मसात केलं होतं त्याला केवळ सलाम! ‘अयोध्येचा राजा’मध्ये तारामती झालेल्या दुर्गाबाई एका झाडाखाली रोहिदासाला (मास्टर विनायक) मांडीवर घेऊन ‘बाळा का झोप येईना’ हे गाणं म्हणतात असा सीन आहे. ‘पाश्र्वगायन’ ही पद्धत अस्तित्वातच नसल्यामुळे नट स्वत: गात असत. गायन आणि वादन यांचं चित्रीकरण एकत्रितच होत असे. त्यामुळे वादकांनाही सेटवर नटांच्या जवळपास, पण कॅमेऱ्यात दिसणार नाहीत अशा जागी बसून वाजवावं लागत असे. ‘बाळा का झोप येईना’ या गाण्यात तबला, व्हायोलिन आणि हार्मोनियम वाजवणाऱ्या वादकांना झाडामागे लपून दुर्गाबाईंची साथ करावी लागली होती! ध्वनीची जोड चित्रीकरण आणि संकलन झाल्यानंतर देण्याचं तंत्र विकसित न झाल्यामुळे पाश्र्वसंगीतदेखील त्या प्रसंगाचं चित्रण चालू असतानाच रेकॉर्ड होत असे. हे करणं प्रचंड अवघड होतं. पण त्याकाळच्या दिग्गजांनी हे अवघड काम अनेक वेळा साध्य करून दाखवलं.
पन्नासच्या दशकात चित्रपट हळूहळू रंगीत व्हायला लागला. ध्वनितंत्रामध्येही सुधारणा होऊ लागल्या. चित्रीकरणादरम्यान ध्वनिमुद्रण सुस्पष्ट व्हावं याकरिता स्टुडिओंमध्ये अवाढव्य सेट्स उभारले जाऊ लागले. हॉलिवूडमध्ये वॉर्नर ब्रदर्स, एम. जी. एम, ट्वेंटिएथ सेंच्युरी फॉक्स, तर भारतात राजकमल, मेहबूब, आर. के., कमालीस्तान या कंपन्यांचे मोठमोठे स्टुडिओ होते. या स्टुडिओमधल्या सेटला ‘साऊंड स्टेज’ म्हटलं जायचं. कारण ध्वनिमुद्रणाकरिता सुलभ असा हा साऊंडप्रूफ सेट असायचा. चित्रपटाची कथा आणि चित्रीकरण जसजसं बाहेर- म्हणजेच आऊटडोअर घडायला लागलं, तसतसा ध्वनिमुद्रणाकरिता बाहेरच्या अवांतर आवाजांचा अडथळा येऊ लागला आणि डिबगची पद्धत सुरू झाली. चित्रीकरण आणि संकलन झाल्यानंतर कलाकारांचे आवाज स्टुडिओत पुन्हा ध्वनिमुद्रित केले जाऊ लागले. डिबग करताना कलाकाराला सीनमध्ये आपण काय बोललो आहे ते पडद्यावर दिसत असतं आणि कानात ऐकूही येत असतं. त्याला चित्रीकरणाच्या वेळी ओठ ज्याप्रमाणे हलले आहेत तसेच हुबेहूब पुन्हा सगळे संवाद बोलावे लागतात. डिबगचे काही महत्त्वाचे फायदे आहेत. एक म्हणजे अवांतर आवाज नाहीसे होतात. दुसरं असं की, चित्रीकरणादरम्यान कलाकाराकडून एखाद्या संवादात दिग्दर्शकाला अपेक्षित असलेल्या भावना व्यक्त झाल्या नसतील, तर ती दुरुस्ती डिबगमध्ये करता येऊ शकते. तिसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही भाषेतला चित्रपट कुठल्याही भाषेत डब करता येऊ शकतो; ज्यामुळे चित्रपट वितरणाची व्याप्ती वाढते. सबटायटल्स वाचताना होणारा व्यत्यय डिबगमुळे नाहीसा होतो.
अभिनेत्यांच्या तोंडी असलेले संवाद जरी पुन्हा ध्वनिमुद्रित झाले तरी त्यांच्या हालचालींच्या आवाजांचं काय, हा मोठाच प्रश्न होता. कारण संवाद ऐकू आले तरी एखाद्या सीनमध्ये नटांच्या हालचालींचे आवाज नसतील तर तो सीन जिवंत वाटणार नाही. या प्रश्नाचं उत्तर जॅक फोली या माणसाने शोधून काढलं. अभिनेत्यांच्या हालचालींचं ‘डिबग’ करण्याची भन्नाट कल्पना त्याने मांडली आणि ती करूनही दाखवली. नटांच्या पावलांचा रव, कपडय़ांची सळसळ, हातातल्या वस्तूंचा आवाज, अगदी घोडय़ांच्या टापांचा, आगीचा, वादळाचा आवाजदेखील स्टुडिओमध्ये प्रसंगाशी समन्वय साधत हुबेहूब काढण्याची किमया फोली महाशयांनी साधली आणि त्यानंतर जगातल्या सर्व तंत्रज्ञांनी ही पद्धत अवलंबिली. आजही या क्रियेला चित्रपट क्षेत्रात ‘फोली’ म्हणूनच ओळखलं जातं. मूळ स्टंटमॅन आणि सहाय्यक दिग्दर्शक असणाऱ्या जॅक फोली यांना ‘गोल्डन रील अवॉर्ड’ देऊन गौरवण्यात आलंच; पण ते खऱ्या अर्थानं अजरामर आहेत, कारण आज जगात कुठलाही चित्रपट बनवताना ‘फोली’ हा त्या चित्रपटाचा अविभाज्य घटक असतो.
साठच्या दशकापर्यंत चित्रपटगृहात ध्वनीचा एकच स्रोत असे (मोनोफोनिक). ज्या पडद्यावर चित्र दिसायचं, त्या पडद्यामागे एकच स्पीकर असायचा. संवाद, गाणी, पाश्र्वसंगीत हे सर्व त्या एकाच स्पीकरमधून ऐकू येत असे. चित्र रंगीत झालं, आकाराने मोठं झालं, भव्य ७० एम. एम. पडद्यावर दिसू लागलं. चित्राइतकाच ध्वनीदेखील भव्य असायला हवा असं चित्रपट बनवणाऱ्यांच्या लक्षात आलं. चित्रपटगृहातल्या प्रेक्षकांना ध्वनीद्वारे जास्तीत जास्त जिवंत अनुभव देणं, हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून जगभरातले चित्रपट तंत्रज्ञ त्यावर काम करू लागले. १९६५ मध्ये एका अमेरिकन व्यक्तीने जगभरातील ध्वनीची परिमाणंच बदलून टाकली. त्या व्यक्तीचं नाव होत- रे डोल्बी!
राहुल रानडे rahul@rahulranade.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2016 1:40 am

Web Title: film and sound
Next Stories
1 चांगल्या चालीचा माणूस
2 चांगल्या चालीचा माणूस
3 आधी कोंबडी की..?
Just Now!
X