21 September 2020

News Flash

प्राचीन अंबरनाथ शिवालय

अंबरनाथ मंदिराच्या संशोधनाकरिता, २००३-०४ या वर्षांसाठी एशियाटिक सोसायटीने त्यांना ही पाठय़वृत्ती दिली.

एक हजार वर्ष जुन्या अंबरनाथ शिवालय

एशियाटिक सोसायटीतल्या एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने संशोधक विदुषी डॉ. कुमुद कानिटकर यांच्याशी संभाषण झालं आणि मग अंबरनाथला जाऊन एक हजार वर्ष जुन्या अंबरनाथ शिवालयाचे वैभव स्वत: बघण्याचा मोह आम्हाला आवरलाच नाही. हे मंदिर म्हणजे स्थापत्यकला आणि शिल्पकला या दोहोंतलं आश्चर्य मानलं जातं. डॉ. कानिटकर यांनी इंडॉलॉजीमधल्या संशोधनासाठी न्या. के. टी. तेलंग पाठय़वृत्ती प्राप्त केलेली आहे. त्यांच्याविषयी..

भारताच्या वैभवशाली इतिहासाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असेल, तर संशोधक आणि इतिहासकारांचा सहवास मिळवल्यावाचून गत्यंतर नाही. मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीत माझी भेट झाली प्रख्यात संशोधक डॉ. कुमुद कानिटकर यांच्याशी. त्यांच्या प्रकल्पाचा विषय होता अंबरनाथ शिवालय. त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने ही भेट झाली. त्यांच्या  स्फुर्तीदायी भाषणाने प्रेरित होऊन आम्ही, या मंदिराला भेट देण्याचं ठरवलं आणि अंबरनाथला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसलो. हा प्रवास काहीसा असा झाला..

मुंबईच्या सीएसएमटीवरून दीड तासांचा रेल्वेप्रवास करून तुम्ही मध्य रेल्वेच्या अंबरनाथ स्थानकावर उतरता आणि मग रिक्षात बसून रिक्षाचालकाला पुरातन शिवालयाजवळ घेऊन जायला सांगता. काही मिनिटांतच तुम्ही उभे असता अकराव्या शतकातल्या, सुमारे हजार वर्षांपूर्वीच्या, एका स्थापत्य आणि शिल्पकलेतल्या आश्चर्यापुढे. महाराष्ट्राच्या या छोटय़ाशा शहरातलं हे शिवमंदिर म्हणजे शिलाहार राजवटीने बांधलेलं भूमिजा शैलीतलं सर्वात प्राचीन मंदिर असल्याची नोंद आहे. अकराव्या आणि बाराव्या शतकात सध्याच्या महाराष्ट्रातल्या कोकण भागावर शिलाहार घराण्याची सत्ता होती. घराण्यातला सर्वात शक्तिशाली राजा चित्तराजा याने या मंदिराचं बांधकाम सुरू केलं आणि त्याचा धाकटा भाऊ मुम्मुनीने- हा चालुक्य राजा कल्याणीचा जहागीरदार झाला होता – इसवी सन १०६० मध्ये बांधकाम पूर्ण केलं. भूमिजा शैलीतलं हे सध्या अस्तित्वात असलेलं सर्वात जुनं मंदिर आहे हे ऐतिहासिक पुराव्यांवरून सिद्ध होतं. शिलाहार राजे परंपरेने शैव होते. मात्र काही शिलालेखांवरून सिद्ध होतं की त्यांनी अध्यात्माचे काही अन्य मार्गही स्वीकारले होते. मंदिरातलं हरी-हर-पितामह-सूर्य हे शिल्प काहीसं गुंतागुंतीचं पण वैशिष्टय़पूर्ण आहे. शिव, विष्णू, ब्रह्मदेव आणि सूर्य हे सगळे या शिल्पकलेच्या अत्युत्तम नमुन्यात एकत्र दाखवण्यात आले आहेत.

‘‘अनेकविध बाबींमुळे हे मंदिर वैशिष्टय़पूर्ण झालं आहे. जिथून अनेक मार्ग फुटतात अशा चौकात-भौगोलिकदृष्टय़ा आणि सांस्कृतिकदृष्टय़ाही – हे मंदिर वसलेलं आहे. त्यामुळे इथे अनेकविध शैलींमधील सौंदर्य बघायला मिळते. या मंदिरावर चालुक्य घराण्याचा प्रभाव आहे; त्याचप्रमाणे गुजरातमधल्या सोळंकी स्थापत्यकला शैलीची वैशिष्टय़ंही यात सापडतात. कोल्हापुरातलं अंबाबाईचं मंदिरही शिलाहार घराण्यानेच बांधलं. अंबरनाथ आणि अंबामाता या दोन्ही मंदिरांमध्ये गेली हजार वर्ष दरवर्षी लाखो भाविक येतात आणि दर्शन घेतात,’’ असं

डॉ. कुमुद कानिटकर यांनी सांगितलं. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीने इंडॉलॉजीतल्या अभ्यासासाठी २००३-०४ या वर्षांत दिलेल्या

न्या. के. टी. तेलंग पाठय़वृत्तीखाली त्यांनी या मंदिराचा अभ्यास केला आहे. एशियाटिक सोसायटीच्या २००५ च्या नियतकालिकात त्यांचा शोधनिबंध ‘डिस्टिंक्टिव्ह फीचर्स ऑफ द शिवालय अ‍ॅट अंबरनाथ’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे.

तरीही आश्चर्याची गोष्ट म्हणजे डॉ. कुमुद कानिटकर म्हणतात की, ‘त्यांनी इतिहासाचं कोणतंही औपचारिक शिक्षण घेतलेलं नाही. त्यांना प्राचीन वास्तूंबद्दल प्रचंड आकर्षण वाटत आलं आहे आणि म्हणूनच त्यांनी स्थापत्यकलेच्या दृष्टीने लक्षणीय असलेल्या वास्तू व मंदिरांना भेटी देणं हे आयुष्याचं कार्य करून टाकलं. त्यांची शैक्षणिक पाश्र्वभूमी आणि त्यांचं संशोधन यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. त्यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्र या विषयात बी. एस्सी.ची पदवी घेतली आहे आणि अमेरिकेतल्या मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून एम. एस्सी. आणि पीएच. डी. पूर्ण केलं आहे. शिकोगातल्या इलिनॉयस विद्यापीठात त्या पोस्ट डॉक्टरल संशोधन करत होत्या. कुमुद यांच्या शैक्षणिक पदव्या आणि करिअर रसायनशास्त्रातलं असलं, तरी इतिहासाबद्दलचं प्रेम त्यांना पुरातत्त्वशास्त्र, शिल्पकला आणि त्यांच्या सांस्कृतिक महत्त्वाकडे ओढून घेऊन आलं. या विषयात कायम रस घेतल्यामुळेच त्या भारतीय कला, विद्या वा इंडॉलॉजीतल्या अभ्यासासाठी दिली जाणारी न्या. के. टी. तेलंग पाठय़वृत्ती प्राप्त करू शकल्या. अंबरनाथ मंदिराच्या संशोधनाकरिता, २००३-०४ या वर्षांसाठी एशियाटिक सोसायटीने त्यांना ही पाठय़वृत्ती दिली. त्या सांगतात ,‘‘माझ्या लक्षात आलं की, एशियाटिक सोसायटीकडे शिलालेखांच्या नमुन्यांच्या स्वरूपात मंदिराच्या निर्मितीबद्दलच्या नोंदी आहेत. बॉम्बे इलाख्याच्या ब्रिटिश गव्हर्नरांनी वास्तू व मंदिरांच्या पाहणीदरम्यान एकोणिसाव्या शतकात या नोंदी एशियाटिक लायब्ररीत केल्यामुळे आज त्या उपलब्ध आहेत. ब्रिटिश सरकारने प्रत्येक इलाख्यात अशा प्रकारच्या पाहण्या आणि नोंदीकरणांची कामं केली आहेत. हे नमुने लायब्ररीत आहेत हे खरोखर सुदैव. कारण अंबरनाथ शिवायलाच्या निर्मितीबद्दल सर्व पुरावे देणारा शिलालेख आता सिमेंटच्या थरामुळे नाहीसा झाला आहे. हा शिलालेख खोदण्यात आला तिथे आता सिमेंटचा थर आहे. मात्र एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत तो तिथे होता. मी संशोधनासाठी निवडलेल्या मंदिरातला हा अमूल्य शिलालेख नाहीसा झाल्यामुळे मी खूपच व्यथित झाले होते. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीसाठी मी या मंदिराबाबत एक सखोल संशोधन प्रबंध तयार करू शकत होते. या संशोधनादरम्यान, ऑस्ट्रियन इंडॉलॉजिस्ट स्टेला क्रॅमरिश यांचं संशोधन आणि पुस्तकं माझ्या वाचनात आली. स्टेला यांना रवींद्रनाथ टागोरांमुळे भारताबद्दल औत्सुक्य निर्माण झालं होतं आणि त्या भारतात, शांतिनिकेतनमध्ये येऊन राहिल्या होत्या. त्यांच्या आयुष्यातली तीसहून अधिक वर्ष देऊन त्यांनी मोठं संशोधन केलं आणि भारतातल्या मंदिर स्थापत्यकलेवर काही अप्रतिम पुस्तकं लिहिली. मी त्यांच्या दोन पुस्तकांचा अभ्यास केला- ‘द हिंदू टेम्पल’ आणि ‘द ग्रेट केव्ह टेम्पल्स इन इंडिया’. आता या इंडॉलॉजीतल्या विदूषीच्या आयुष्यावर तसंच कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा एक शोधनिबंध तयार करण्याची माझी योजना आहे.’’

‘‘पुरातत्त्वशास्त्रावर प्रेम करणारी एक विद्यार्थिनी म्हणून माझ्या करिअरमध्ये मी आयहोळ, पट्ट्डाकल, बदामी, हंपी, खजुराहो, वेरुळ, महाबलीपुरम, रामेश्वर, कन्याकुमारी, मदुराई, श्रीरंगम आणि अशा भारतातल्या अनेक मंदिरांना भेटी दिल्या. मला वाटतं, देशातली सर्वाधिक प्राचीन मंदिरं कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात आणि मध्य प्रदेशात आहेत. उत्तरेकडे अनेक शतकं सातत्याने झालेल्या आक्रमणांमुळे तिथली प्राचीन मंदिरं नाहीशी झाली आहेत. भारतातील ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी त्यांना शक्य होईल त्या प्रत्येक प्राचीन स्थळांचं दस्तावेजीकरण केल्याची माहिती खूप कमी लोकांना आहे याचं मला वाईट वाटतं. प्रत्येक इलाख्यातल्या प्रत्येक प्रादेशिक कलाशाळेला त्यांनी प्रत्येक वास्तूची चित्रं, नकाशे, आराखडे आणि अन्य दस्तावेज जतन करण्यास सांगितले. अशा प्रकारचं तपशीलवार दस्तावेजीकरण फार थोडय़ा देशांकडे आहे. त्यांनी जमिनी, वनं आणि भारतातल्या शेतीबद्दलचा प्रत्येक तपशील नोंदवून ठेवला. आज या नोंदी आपल्याला उपयोगी पडत आहेत. त्यांच्या साम्राज्यात भारत हा सर्वात विकसित देश होता आणि त्यामुळेच त्यांचं काम रसप्रद झालं.’’

जास्तीत जास्त लोकांनी अंबरनाथच्या मंदिराला भेट द्यावी आणि मंदिराच्या स्वच्छतेसाठी व जतनीकरणासाठी काम करावं अशी इच्छा कुमुद यांनी व्यक्त केली. ‘‘या मंदिराचं जतन राष्ट्रीय स्मारक म्हणून करण्याची योजना असली, तरी सध्या मंदिराला भेट देणारे लोक ते खूप अस्वच्छ करत आहेत. आपल्या संस्कृतीतल्या या अमूल्य स्थळाबद्दल लोकांना जाणीव असली पाहिजे. मंदिराच्या परिसरात झाडं लावून, तो सुंदर करून लोकांनी या मंदिराचं वैभव परत आणून दिलं पाहिजे. पर्यटक आणि भाविक दोहोंसाठीही शिस्त अत्यंत आवश्यक आहे.’’ सतत धडधडत राहणाऱ्या मुंबई नावाच्या महानगरापासून जवळ असल्याने, अंबरनाथच्या शिवालयाला भेट देणं खरोखर लाखो लोकांना शक्य आहे.

विमला पाटील

भाषांतर – सायली परांजपे

sayalee.paranjape@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2017 1:01 am

Web Title: 1000 year old ambernath shivalaya
Next Stories
1 राजाबाई टॉवरचं पुनरुज्जीवन
2 देखण्या वास्तूंची मुंबई
3 साडी परंपरेचं वैभव
Just Now!
X