23 July 2019

News Flash

भारतातील ‘महा’राज्य

स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचं स्थान मिळावं यासाठीची चळवळ महाराष्ट्रातूनच सुरू झाली.

स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचं स्थान मिळावं यासाठीची चळवळ महाराष्ट्रातूनच सुरू झाली. धोंडो केशव कर्वे यांनी स्त्रियांसाठी शाळा आणि महाविद्यालय सुरू केलं. एसएनडीटी विद्यापीठ हे या चळवळीचा महत्त्वाचा भाग आहे. करिअरमध्ये यशस्वीपणे घोडदौड करणाऱ्या स्त्रियांची संख्या आज महाराष्ट्रातच सर्वाधिक आहे. या राज्याला सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सुधारणांच्या मूलस्थानी ठेवण्यासाठी राज्यातल्या स्त्री-पुरुषांनी अपार कष्ट घेतले आणि याचे फायदे नंतर संपूर्ण देशाला मिळाले. १ मेच्या महाराष्ट्र दिनानिमित्त हा विशेष लेख.

माझा जन्म आणि शिक्षण महाराष्ट्राच्या हृदयस्थानी असलेल्या मुंबईत झालं. मी कायम इथेच राहिले आणि इथेच माझं एक सुंदर कुटुंब आकाराला आलं. लहानाची मोठी होत असताना अनेक राष्ट्रीय चळवळींच्या माध्यमातून इतिहास घडत असलेला मी पाहिला. पंडित जवाहरलाल नेहरू, साने गुरुजी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या सर्वाचे आदर्श असलेल्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं. सुप्रसिद्ध गवालिया टँक मैदान म्हणजेच आताच्या ऑगस्ट क्रांती मैदानावर किती तरी महान नेत्यांची भाषणं ऐकली. आयुष्यभर मी महाराष्ट्राचा अभ्यास करतेय, या राज्याबद्दल नवनवीन गोष्टी शिकतेय. महाराष्ट्राला मी नेहमीच माझं राज्य म्हणते.

भारत प्रजासत्ताक म्हणून यशस्वी झाल्याला अनेक र्वष लोटल्यानंतर मी या लेखाद्वारे महाराष्ट्रीयांना अभिमान वाटावा असा भूतकाळ जागवणार आहे. या भूतकाळापासून प्रेरणा घेऊन प्रत्येक महाराष्ट्रीय नागरिकाला देशाच्या विकासाच्या कामात झोकून देण्याची इच्छा होईल. अत्यंत आधुनिक आणि प्राचीन वैभवाचं दर्शन घडवणारी नागरीकरणाची प्रतीकं अन्य कोणत्याही राज्यात अशी एकत्रित सापडणार नाहीत.

भारताच्या इतिहासात महाराष्ट्राने अत्यंत ठळक आणि मोठी भूमिका बजावली आहे. राजधानी मुंबई ओळखली जाते ती मलबार किनारपट्टीवरची लखलखती राणी म्हणून. एके काळी ही मुंबई सात बेटांचा समूह होता आणि इथे मुख्यत्वे वास्तव्य होतं ते मासेमारी करणाऱ्या समाजांचं. यावर अनेकांचा विश्वासही बसत नाही. या मासेमारी करणाऱ्या समाजांनी प्रत्येक बेटावर आपल्या देवतेचं मंदिर बांधलंय. बेटांच्या या समूहाचं रूपांतर एका विशाल महानगरात केलं ते ब्रिटिशांनी. समुद्रात भराव घालण्याचे महाकाय प्रकल्प पूर्णत्वास नेऊन त्यांनी या सात बेटांच्या समूहाचं एक बेट केलं. लेडी जमशेटजी मार्ग नावाच्या कॉजवेने ही बेटं भूभागाला जोडण्यात आली. लेडी जमशेटजी म्हणजे आवाबाई, सर जमशेटजी जीजीभॉय यांच्या पत्नी. माहीम कॉजवेच्या बांधकामासाठी त्यांनी स्वत:चे दागिने विकून पैसा उभा केला होता. बेटांच्या समूहाने तयार झालेली मुंबई वायव्येकडच्या उपनगरांना जोडण्यासाठी दुवा ठरला तो हा कॉजवे. मग मुंबईची बॉम्बे झाली आणि लवकरच व्यापाराचा आणि राजकीय हालचालींचा तळ झाली.

एकोणिसाव्या शतकात ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’, ही घोषणा लोकमान्य टिळकांनी केल्यानंतर  भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचं मुख्यालय हे शहर झालं. १९४७ मध्ये ब्रिटिशांनी सत्तांतराच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या तेव्हा मुंबई नवभारताची औद्योगिक राजधानी आणि शैक्षणिक केंद्र झाली. पाकिस्तानकडे जाणारी संस्थानं वगळता अन्य सर्व संस्थानं मुंबईच्या अखत्यारीत आली.

मग १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. मार्च १९९६ मध्ये या महानगराचं अधिकृत नावही मुंबई असंच करण्यात आलं. या दरम्यान अनेक प्राचीन वास्तू, कलाकृती, शिलालेख, शिल्प, गुहा, अगदी काही पाण्याचे तलावही महाराष्ट्राचा पुरातत्त्वीय वारसा म्हणून प्रकाशात आले. पर्वता-डोंगरांनी वेढलेला महाराष्ट्राचा प्रदेश गेली अनेक शतकं प्राचीन राज्यकर्त्यांनी विकसित करत आणला आहे हे यांतून सिद्ध झालं. मुंबईसह राज्यातली अनेक शहरं प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत आणि एकूण हा प्रदेश कला, व्यापार, धार्मिक व्यवहार, स्थापत्यशास्त्र, शिल्पकला आदींनी समृद्ध होता यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

मुंबईत वस्त्रोद्योग आणि त्यासारखे कित्येक उद्योग तर आहेतच. याशिवाय गेल्या शतकभरात या शहराने आणखी दोन आस्थापनांना आश्रय दिला. यातला एक म्हणजे चित्रपट उद्योग, ज्याला सध्या बॉलीवूड असं म्हटलं जातं.

दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय चित्रपट राजा रविवर्मा यांच्या आर्थिक साहाय्याने काढला. रविवर्मा यांची चित्रं जगभर प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या आयुष्यावरही चित्रपट काढण्यात आला आहे. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचं स्थान मिळावं यासाठी चळवळही महाराष्ट्रातूनच सुरू झाली. धोंडो केशव कर्वे यांनी स्त्रियांसाठी शाळा आणि महाविद्यालय सुरू केलं. एसएनडीटी विद्यापीठ हे या चळवळीचा महत्त्वाचा भाग आहे.

भारतातल्या पहिल्या डॉक्टर रखमाबाई यांनी स्त्री-स्वातंत्र्यासाठी कायद्याच्या मार्गाने दिलेला लढा बालविवाहाची प्रथा मोडून काढण्यात महत्त्वाचा ठरला. या धाडसी स्त्रीने तिचा लहानपणी झालेला विवाह स्वीकारण्यास नकार देऊन शिक्षण पुढे सुरू ठेवण्याचा मार्ग निवडला आणि ती भारतातली पहिली स्त्री डॉक्टर झाली. सही करताना तिच्या नावापुढे वडील किंवा पतीचं नाव न लावण्याच्या अधिकारासाठीही ती कायद्याची लढाई लढली. मुंबई विद्यापीठाच्या स्वागतकक्षात आजही रखमाबाईंचं चित्र लावलेलं आहे.

लग्नासंबंधीचे कायदे, हुंडाबंदी, समान वारसाहक्क, मालमत्तेचं संपादन असे स्त्रियांना समान दर्जा देणारे कायदे व्हावेत यासाठीचे प्रयत्नर्  प्रथम महाराष्ट्रात सुरु झाले. विवाहित स्त्रियांना हुंडय़ासाठी जाळून टाकणाऱ्या प्रवृत्तींना लगाम घालणारा हुंडाबंदी कायदा आणण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतला. सतीप्रथा, देवदासीच्या नावाखाली गरीब मुलींना विकण्याचे प्रकार यांना राज्यातून कायम विरोध झाला. करिअरमध्ये यशस्वीपणे घोडदौड करणाऱ्या स्त्रियांची संख्या आज महाराष्ट्रातच सर्वाधिक आहे. या राज्याला सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सुधारणांच्या मूलस्थानी ठेवण्यासाठी राज्यातल्या स्त्री-पुरुषांनी अपार कष्ट घेतले आणि याचे फायदे नंतर संपूर्ण देशाला मिळाले. महाराष्ट्रातून सुरू झालेल्या या आणखी काही चळवळी :

सुप्रसिद्ध ‘भारत छोडो’ किंवा ‘क्विट इंडिया’ चळवळीची सुरुवात मुंबईच्या गवालिया टँक मैदानातून (सध्याचं ऑगस्ट क्रांती मैदान) झाली. स्वातंत्र्य चळवळीतील मोठमोठय़ा सभा, सत्याग्रह याच मैदानात झाले होते. अनेकांनी तुरुंगवास सोसून (काहींनी तर मृत्यूचीही तमा बाळगली नाही.) स्वातंत्र्यासाठी अविरत लढा दिला आणि अखेर १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळालं. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी सुरू केलेल्या अत्यंत वेगळ्या पण यशस्वी ठरलेल्या अहिंसा चळवळीतही महाराष्ट्राचा सहभाग मोठा होता. दोन महायुद्धांच्या काळात आणि एरवीही मुंबईने या चळवळीचं नेतृत्व केलं आणि शांततापूर्ण मार्गानी, हिंसेचा वापर न करता देशासाठी स्वातंत्र्य मिळवलं. १९४७ मध्ये ब्रिटिशांनी देशाचा कारभार एतद्देशीय नेत्यांच्या स्वाधीन केला, तेव्हा तो मानवतेच्या इतिहासातला पहिला आणि सर्वात मोठा अहिंसक लढा यशस्वी ठरला. ‘महा’राष्ट्रानेही दलितांना सामाजिक दर्जा आणि न्याय मिळवून देण्यासाठी असाच अहिंसक लढा दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वाना समान हक्क देणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत, हे तर सर्वाना माहीतच आहे.

अर्थात सध्याचा आधुनिक महाराष्ट्र घडवताना राज्याने आपला अद्वितीय प्राचीन वारसा कायमच जतन केला आहे. दगडी वास्तू बांधण्यासाठी उत्तम समजल्या जाणाऱ्या डेक्कन ट्रॅप या खडकांच्या सह्य़ाद्री पर्वतरांगा राज्याला वेढून उभ्या आहेत. सह्य़ाद्री पर्वतरांगांना वारसास्थळं म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. ऐतिहासिक लेणी-मंदिरं, भित्तिचित्रं, शिल्पं, शिलालेख यांच्यातून महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासाबद्दल माहिती तर होतेच, शिवाय राज्याचा प्राचीन इतिहास नोंदवून ठेवण्यासाठी हे सर्व महत्त्वाचं आहे.

– विमला पाटील

भाषांतर – सायली परांजपे

sayalee.paranjape@gmail.com

chaturang@expressindia.com

 

 

First Published on April 22, 2017 1:04 am

Web Title: maharashtra day women empowerment dhondo keshav karve sndt womens university