15 October 2019

News Flash

संस्मरणीय फोटो शूट आणि इराण दौरा!

इराणी गालिचे तर जगप्रसिद्ध आहेत. इराणी हा शब्द उच्चारला की, अनेक गोष्टी पटकन डोक्यात येतात.

माझं आयुष्य आणि करिअर दोन्हींचं वैशिष्टय़ म्हणजे सातत्याने होणाऱ्या घडामोडी, सळसळतं चैतन्य आणि विविध रंगांची उधळण. सकाळी एका कामाच्या संदर्भात एखाद्या प्रख्यात व्यक्तिमत्त्वाची भेट, तर संध्याकाळी आणखी वेगळ्या कामाच्या संदर्भात दुसऱ्या तेवढय़ाच प्रसिद्ध सेलेब्रिटीची मुलाखत, असं माझ्याबाबत अनेकदा घडलं आहे. अर्थात यामागे दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे या सेलेब्रिटींचे कार्यक्रम ठरलेले असल्याने त्यांना वेळ असेल तेव्हा मुलाखती घ्याव्या लागतात आणि दुसरं म्हणजे मी ज्या यशस्वी नियतकालिकाचं संपादन करत होते, त्यात सेलेब्रिटीजच्या आयुष्यातल्या घटनांना महत्त्वाचं स्थान असल्याने त्यांच्या गाठीभेटी अपरिहार्य होत्या. असाच एक दिवस माझ्यासाठी खूपच संस्मरणीय ठरला. १९७५ मध्ये देशात आणीबाणी लागू असताना इराणचे सम्राट शाह मोहम्मद रेझा पहलवी त्यांच्या पत्नीसह- फराह दिबा यांच्यासह भारतभेटीवर आले होते. त्या दिवशी सकाळी सम्राज्ञी फराह दिबा यांच्यासोबत ‘फोटोशूट’ करण्याची दुर्मीळ संधी मला लाभली आणि त्यावर कडी म्हणजे त्याच दिवशी दुपारी मी राजभवनात इंदिरा गांधींची मुलाखत घेतली आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं ‘फोटोशूट’ केलं. हा दिवस माझ्या आयुष्यातला एक वेगळाच दिवस ठरला. पुढे निवृत्त झाले असताना इराण सरकारने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना इराण भेटीचं निमंत्रण दिलं. भारताप्रमाणेच इराणही जगातल्या सर्वात सुंदर देशांपैकी एक आहे, हे त्या भेटीत मला स्पष्टपणे जाणवलं.

ते वर्ष होतं आणीबाणीचं आणि देशाची सत्ता होती पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हातात. आंतरराष्ट्रीय स्त्री वर्षांच्या निमित्ताने स्त्रियांसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाबद्दल इंदिरा गांधींची मुलाखत घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती. योगायोग म्हणजे त्याच दिवशी इराणचे शाह आणि त्यांच्या पत्नी फराह दिबा हेदेखील सरकारी पाहुणे म्हणून दिल्लीत होते आणि नियतकालिकाच्या मुखपृष्ठासाठी फराह दिबा यांचं फोटोशूट करण्याचं कामही आमच्याकडेच होतं. त्याच दिवशी संध्याकाळी आम्हाला संपूर्ण गांधी कुटुंबाचा फोटो काढण्याची संधी लाभली. मला वाटतं प्रसारमाध्यमांच्या इतिहासात तेव्हापर्यंत कोणालाही  असा फोटो काढण्याची संधी मिळाली नव्हती. माझ्यासाठी तर तो दिवस म्हणजे रोमांचक कामांची मालिकाच ठरला. या दोन्ही भेटींबाबत माझ्या मनात अतीव उत्सुकता दाटलेली होती. एक सकाळी, तर दुसरी त्याच दिवशी दुपारी. आमचे कॅमेरामन जीतेंद्र आर्यही (आता ते हयात नाहीत) माझ्या इतकेच उत्सुक होते. त्याच दिवशी दुपारी ठरलेली इंदिरा गांधींची मुलाखत आणि नंतर संध्याकाळी त्यांच्या कुटुंबाचं फोटोशूट हीदेखील तितकीच अप्रतिम संधी होती. म्हणूनच माझ्या आयुष्यातल्या या अनोख्या दिवसाला माझ्या मनात किती अभिमानाचं स्थान आहे हे सांगितल्यावाचून राहवत नाहीये. भारत आणि इराण यांच्याबद्दलही काही माहिती इथे दिलीच पाहिजे. कारण, मी घेतलेल्या मुलाखतीचा तो कणा आहे.

– भारत आणि इराण यांच्यातील संबंध हजारो र्वष जुने आहेत. कला, खाद्यसंस्कृती, भाषा आणि व्यापार यांच्या धाग्यांनी दोन्ही देश गेली अनेक र्वष बांधले गेले आहेत. तरीही, आज परस्पर संवादाच्या दरीमुळे या दोन देशांमध्ये मैत्रीपूर्ण त्रयस्थता असल्यासारखं भासतं. इराणी गालिचे तर जगप्रसिद्ध आहेत. इराणी हा शब्द उच्चारला की, अनेक गोष्टी पटकन डोक्यात येतात. इराणी उपाहारगृह आणि त्यांचे विशिष्ट खाद्यपदार्थ, भारतातल्या अनेक शहरांमध्ये अनेक शतकांपासून वसलेली इराणी कुटुंबं, हस्तकलेच्या वस्तू आणि सुकामेवा. हफीझ, फिरदौसी आणि उमर खय्यामच्या नजाकतदार शायरीने आपल्या मनावर कायमचं गारुड केलंय, तर इराणमधल्या वख्श नावाच्या खेडय़ात इराणी बोलणाऱ्या आई-वडिलांच्या पोटी जन्मलेल्या रुमीचं सुफी काव्य आपल्याला सौंदर्य आणि शांतीची अनुभूती देतं. आणखी सांगायचं म्हणजे दिल्ली, आग्रा, फतेहपूर सिक्री आदी शहरांभोवतीच्या हजारो वास्तू आणि वारसास्थळं. बाबरापासून ते बहादूर शाह जफरांपर्यंत सगळ्या मुघल सम्राटांनी सत्तेत असताना या वास्तू बांधून घेतल्या. त्यांनी मागे ठेवलेला इस्लामी संस्कृती, स्थापत्यकला, भाषा, साहित्य आणि खाद्यसंस्कृतीचा वारसा भारताच्या महासागरासारख्या सांस्कृतिक इतिहासात मिसळून गेलाय. भारतात आजही लोक एक अभिजात भाषा म्हणून पर्शियन भाषा शिकतात आणि या भाषेतल्या महान शायरीचा अभ्यास करतात.

– इराणचे शाह मोहम्मद रेझा पहलवी आणि त्यांच्या पत्नी फराह दिबा यांनी भारताशी मैत्रीचा अतूट बंध जोडला. शाह यांच्या आधुनिकीकरणाच्या धोरणामुळे संपूर्ण जगाला इराणची आणि पर्यायाने या देशातल्या समृद्ध स्थापत्यकला, वारसास्थळं, साहित्य आणि खाद्यसंस्कृतीची ओळख झाली. या शाही जोडप्याने पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात भारताला भेट दिल्याने अर्थातच त्यांची शाही बडदास्त ठेवण्यात आली होती. त्याच वेळी मला सम्राज्ञी सौंदर्यवती फराह दिबा यांना भेटण्याची आणि त्यांच्यावर लिहिण्याची संधी मिळाली.

– आजचा इराण खचितच वेगळा आहे. राजेशाही थाटाचे आणि विलासी राहणीमानाचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. इमाम अयातुल्ला खोमेनी यांच्या इस्लामी क्रांतीला अनेक दशके उलटून गेल्यानंतर आता इराणचं स्वरूप एक खंदं इस्लामी प्रजासत्ताक असंच आहे. देशाची सत्ता लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या कायदे मंडळाच्या आणि प्रशासनाच्या हातात असली, तरी ते राबवतात कुराणातले इस्लामी कायदेच. (इराणी लोकांच्या दैनंदिन जीवनातही खूप बदल झाले आहेत. देशातली ९८ टक्के जनता शिया मुस्लीम आहे. अन्य दोन टक्क्यांना, म्हणजे ख्रिश्चन, पारशी आणि ज्यू लोकांना, खासगीत त्यांच्या धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य असलं, तरी सार्वजनिक जीवनात त्यांनी इस्लामी कायद्याचं पालन करणं अपेक्षित आहे. इस्लामी क्रांतीपूर्वी इराणमध्ये एक लाख २० हजार ज्यू होते. आता २० हजारही उरलेले नाहीत. बहुतेकांनी त्यांच्या धर्माच्या आधारावर स्थापन झालेल्या इस्रायलचा आश्रय घेतला आहे. इस्लामी कायद्यांच्या चौकटीत राहून खासगीत स्वत:च्या धर्माचं पालन करण्याची मुभा दिली जात असली, तरी ख्रिश्चन आणि पारशी लोकही मोठय़ा संख्येने इराण सोडून गेले आहेत. वर्तमानपत्रं आणि अन्य माध्यमांची मालकी सरकारी किंवा खासगी कंपन्यांकडे आहे. मात्र, यावर सेन्सॉरशिप आहेत. वर्तमानपत्रांवर लक्ष ठेवण्याचा आणि गरज भासल्यास त्यांचे प्रकाशनाचे हक्क काढून घेण्याचा अधिकार एका विशेष न्यायालयाला आहे. इस्लामी कायद्यांवर टीका करण्याची इराणी वृत्तपत्रांना मनाई आहे.)

स्त्रियांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना हिजाब किंवा चादोर वापरण्याची सक्ती आहे, मग त्या कोणत्याही धर्माच्या असोत. यामुळे शिक्षणसंस्था आणि एकंदर सामाजिक जीवनात स्त्रिया आणि पुरुष असे दोन भाग पडले आहेत. टीव्हीवरील कार्यक्रम आणि चित्रपटांसाठीही कडक सेन्सॉरशिप आहे. फारसी किंवा पर्शियन ही अधिकृत भाषा आहे. बहुतेक खासगी शाळांमध्ये इंग्रजी आणि फ्रेंच शिकवले जाते. सर्व सरकारी शाळांना सातव्या इयत्तेपासून इंग्रजी शिकवणं सक्तीचं आहे.

– इराणी स्त्रिया बहुसंख्येने सुशिक्षित असून अत्यंत रुबाबदार राहातात. अनेक ठिकाणी त्या अधिकारपदावर आहेत. काही स्त्रिया, विशेषत: बुंदेर अब्बास शहरातल्या स्त्रिया अप्रतिम सुंदर आहेत. तेहरानसारख्या शहरात मात्र स्त्रियांना सर्व प्रकारचं स्वातंत्र्य आहे. त्यांना कामाच्या आणि करिअरच्या संधी पुरुषांइतक्याच दिल्या जातात. राजकारण, अर्थशास्त्र आणि सामाजिक कामात त्या समानतेचा हक्क बजावत आहेत. अर्थातच हे सगळं चादोर वापरून. घर किंवा स्त्रियांच्या संमेलनांचा अपवाद वगळता इतरत्र चादोर वापरण्याची सक्ती आहे. बहुतेक स्त्रिया नवऱ्याने परवानगी दिली, तरच सार्वजनिक ठिकाणी वावरताना मेक-अप करतात. इराणमध्ये स्त्रियांच्या साक्षरतेचं प्रमाण उच्च आहे. प्रशासनात तसंच नागरी सेवांत अनेक स्त्रिया अधिकारपदावर आहेत. वैद्यकीय आणि कायदे क्षेत्रात स्त्रियांना विशेष मानानं वागवलं जाते. स्त्रीरोगतज्ज्ञ या स्त्रियाच असाव्यात असा तिथे आग्रह आहे. सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये स्त्रिया अध्यापनाचं काम करत आहेत. कुटुंबनियोजन आणि पर्यावरणाचं संरक्षण या दोहोंना सरकारचं प्राधान्य आहे आणि गेल्या काही दशकांत त्याचे उत्तम परिणाम दिसून आले आहेत. इराणची लोकसंख्या अत्यंत आवाक्यात म्हणजेच ७७.४५ दशलक्ष इतकी आहे. राजधानी तेहरानची लोकसंख्या तर केवळ ८० लाख आहे.

– तेहरानसारखी शहरं अतिशय स्वच्छ आहेत. तेहरान, इसफहान, माशेद, तब्रीझ, हमादान, बुंदेर अब्बास आणि शिराझ ही सगळीच शहरं अत्यंत स्वच्छ, हिरवीगार, सुनियोजित आणि सुप्रशासित आहेत. प्रत्येक शहराचं विभाजन विविध डिस्ट्रिक्ट्समध्ये करण्यात आलं असून प्रत्येक डिस्ट्रिक्टचा प्रमुख मेयर असतो. हा मेयर सर्व स्थानिक समस्या आणि पर्यावरणाच्या संवर्धनाची जबाबदारी वाहतो. इराणी लोकांमधली सर्वात मोठी कमतरता म्हणजे बाहेरच्या जगाशी संपर्काचा पूर्ण अभाव. फार थोडय़ा लोकांना इंग्रजी भाषा समजते किंवा बोलता येते आणि बाहेरची टीव्ही चॅनल्स आणि वृत्तपत्रांना इराणमध्ये बंदी आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सगळं जग जोडलं जात असताना, इराणी लोक बाहेरच्या जगापासून तुटल्यासारखे झाले आहेत. एकंदर इराणी लोकांच्या बोलण्यात आणि अधिकृत संभाषणांमध्येही अमेरिकेबद्दल आणि एकंदरच पाश्चिमात्य जगाबद्दल नापसंतीचा सूर आढळतो. इस्लामविरोधी पाश्चिमात्य संस्कृतीमुळे स्थानिक संस्कृती बिघडते, असा एकंदर ग्रह इराणमध्ये आहे.

– आधुनिकीकरणाच्या रेटय़ातही इराणने अरेबियन नाइट्सचा नॉस्टॅल्जिया टिकवून ठेवला आहे. इराणमधल्या वास्तू, अगदी आधुनिक इमारतीही सुस्पष्ट आणि कमानी आणि निळ्या-मोरपंखी टाइलवर्कसह जुन्या काळातल्या स्थापत्यशास्त्राचा दिमाख लेऊन उभ्या आहेत. निरभ्र आकाशाच्या पाश्र्वभूमीवर आपलं अनोखं वैभव दर्शवत उभ्या असलेल्या मशिदी, राजवाडे, बुर्ज-मनोरे आणि प्राचीन मशिदींमधून ऐकू येणारे  सूर इराणच्या हिरव्या-निळ्या-राखाडी निसर्गाला एक वेगळीच उंची गाठून देतात. अरेबियन नाइट्समध्ये वर्णिलेल्या बाजारपेठांच्या खऱ्याखुऱ्या प्रतिकृती तेहरान, इसफहान, शिराझ आणि अन्य शहरांत बघायला मिळतात. हो, अरेबियन नाइट्समधल्या नर्तकी आणि मद्याचे प्याले तेवढे वगळावे लागतील. दुकानं भरलेली असतात ब्रास-तांब्यांची भांडी, नीलमण्यासारखी मौल्यवान रत्न, कलात्मक फरशा, मातीची भांडी आणि पारंपरिक दागिन्यांनी. हाताने किंवा मागावर रेशीम आणि लोकरीच्या मिश्रणातून विणले जाणारे गालिचे हा इराणचा मुख्य उद्योग आहे. इराणी गालिचा हे जगभरात श्रीमंतीचं प्रतीक मानलं जातं. ऑनिक्स दगडापासून तयार झालेल्या नवनवीन वस्तू, वेलबुट्टीदार पडदे, फ्रेम्स, पादत्राणं, बॅग्ज, लॅम्प्स, क्रिस्ट्लच्या वस्तू आदी डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या वस्तू या बाजारांमध्ये उपलब्ध आहेत. बहुतेकदा बाजारपेठा या शहराच्या मध्यभागी किंवा प्राचीन मशिदींच्या आजूबाजूला आहेत आणि मध्यरात्रीपर्यंत सुरू असतात. पीच, प्लम, अंजिर, गुलांजिर, जर्दाळू, ओले पिस्ते, खजूर आणि कलिंगडं ही इराणची फळं तर जगप्रसिद्ध आहेत. ताज्या भाज्याही इथलं वैशिष्टय़. खोरेश्त (मटण स्टय़ू), पलाव (चिकन आणि बेरीजची बिर्याणी), शोरबा (सुप) आणि हलवा या इराणची खासीयत असलेल्या पदार्थाना परदेशी रेस्टराँजमध्ये अजून जागा मिळाली नसली, तरी पारंपरिक इराणी रेस्तराँजमध्ये हे पदार्थ आवर्जून शिजवले जातात.

तेहरान आणि इसफहान या देखण्या शहरांमध्ये जुन्या-नव्याचा अप्रतिम संगम बघायला मिळतो. उत्तम स्थितीतल्या रस्त्यांवर आधुनिक कार आणि बस धावताना दिसतात. टुमदार स्थापत्यकला आणि मध्यपूर्वेतली विशिष्ट रंगसंगती यांमुळे इराणमधल्या स्वच्छ, सुनियोजित वास्तू उठून दिसतात. कमानी, द्वारं, स्तंभं, कनाती, तलाव, आरशांनी मढलेल्या भिंती, ऐतिहासिक चित्रं, पारंपरिक वस्तू आणि समृद्ध इतिहास यामुळे वास्तूंचं सौंदर्य खुललं आहे. उदाहरण द्यायचं तर, उत्तरेकडच्या बर्फात उगम पावणारी झयांदे रुद नदी इसफहान शहराच्या मध्यातून वाहते. या नदीमुळे शहरात अनेक हिरवीगार उद्यानं फुलली आहेत, कारंजे खेळत आहेत. शहराचा प्रमुख जलस्रोत असलेल्या या नदीवर गेल्या चारशे वर्षांत ३२ पूल बांधले गेले आहेत. यातले काही प्राचीन पूल तर अभियांत्रिकी आणि स्थापत्यकलेचं विस्मयकारी दर्शन

घडवणारे आहेत. १६३९ ते १६६६ या काळात बांधला गेलेला खाजू पूल तर विशेष सुंदर आहेत. संधीप्रकाशात या पुलावर विशेष प्रकाशयोजना केली जाते.

इसफहानच्या तुलनेत तेहरान हे अधिक उद्यमशील शहर आहे. सुपरमार्केट्स, फूड स्टोअर्स, कार्पेट एम्पोरिअम आणि रेस्तराँज्ने वेढलेल्या तेहरानमध्ये लोक थकेपर्यंत खरेदी करतात. खाद्यपदार्थ, सुकामेवा, चामडय़ाच्या वस्तू, गालिचे या सर्वच वस्तू तेहरानमध्ये अन्य देशांच्या तुलनेत खूप स्वस्त दरात उपलब्ध आहेत.

तरीही, इराणमध्ये सर्वत्र आढळणारा एक समान धागा म्हणजे अयातुल्ला खोमेनींनी प्रसार केलेल्या तत्त्वांचं निष्ठेने पालन करणारे लोक. इस्लामी इराणचे जनक खोमेनी आहेत हे सांगणारी अनेक होर्डिग्ज, टीव्ही व्हिज्युअल्स, फोटो दिसत राहतात. लोकांच्या संभाषणांतून हे जाणवत राहतं. १९८९ मध्ये निधन झालेले खोमेनी अजूनही इराणी लोकांच्या मनात जिवंत आहेत. अल्लाला वंदन केल्याशिवाय कोणतंही संभाषण सुरू होत नाही. इमामांची शिकवण अनुसरण्याचं शिक्षण तरुणांना शिक्षणसंस्थांमधूनही दिलं जातं.

– आज शाह पहलवींचा लाकडी, उंच टेकडीवरचा राजवाडा एकाकी आणि शांत उभा आहे. या राजवाडय़ातलं फ्रेंच फर्निचर, इटालियन झुंबरं आणि युरोपीयन डिनरवेअरचं वैभव आता इतिहासजमा झालं आहे. शाह यांच्या स्मृतींबद्दलही इराणी लोकांमध्ये तिटकारा व्यक्त केला जातो. अगदी या स्तंभांनी वेढलेल्या राजवाडय़ाच्या पोस्ट कार्डावर आढळणाऱ्या फोटोंखालीही हे शब्द वाचायला मिळतात : ‘‘अवघ्या जगाला फेरफटका मारा आणि इथे येऊन बघा, सत्य नाकारणाऱ्यांची काय परिस्थिती होते ते.’’

विमला पाटील

भाषांतर – सायली परांजपे

sayalee.paranjape@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on February 25, 2017 2:34 am

Web Title: photo shoot in iran iran memorable tours