19 October 2019

News Flash

साडीचा डौल

साडी हे भारतीय स्त्रीच्या सौंदर्याचे, दिमाखाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग आहे.

साडी हे भारतीय स्त्रीच्या सौंदर्याचे, दिमाखाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग आहे. बनारसचं अप्रतिम रेशमी आणि जरीकाम, ओरिसा आणि आंध्र प्रदेशाच्या इक्कत साडय़ा, गुजरातच्या पटोला, कांचीपूरमच्या कांजीवरम, महाराष्ट्रातल्या पैठण्या, पश्चिम बंगालच्या ढाकाई साडय़ा, राजस्थान-गुजरातमधल्या लेहरिया आणि बांधणी साडय़ा, मध्य भारतातल्या चंदेरी साडय़ा, गढवालच्या सुती साडय़ा, आसाममधल्या टसर, मुगा सिल्कच्या साडय़ा.. भारताच्या विविध भागांत तिथल्या वैशिष्टय़ांसह साडी विणली जाते. आपलं परंपरागत सौंदर्य टिकवून ठेवण्यात या साडय़ा यशस्वी ठरल्या आहेत आणि म्हणूनच त्या लोकप्रियही ठरल्या आहेत. साडीचं मूळ रूप आणि सौंदर्याविषयी..

केवळ साडेपाच मीटर लांबीचं साडी नावाचं वस्त्र म्हणजे कदाचित जगातला सर्वात ‘अनडिझाइण्ड’ पोशाख असावा. आताच्या काळात डिझायनर साडय़ांनाही महत्त्व आलं असलं तरीही पारंपरिक साडय़ांचा दिमाख काही औरच. एखाद्या स्त्रीच्या अंगावर जेव्हा हे वस्त्र ल्यायलं जातं तेव्हा स्त्रियांच्या जगातल्या कोणत्याही पोशाखापेक्षा जास्त ग्लॅमरस आणि दिमाखदार भासू लागतं.

स्त्रीचं सौंदर्य खुलवण्यासाठी तयार झालेल्या सर्वात प्राचीन पोशाखांमधला साडी हा एक पोशाख समजला जातो. कपडे बेतण्याची आणि शिवण्याची कला अस्तित्वात आली नव्हती त्या काळात साडीचा उदय झाला असला, तरी प्राचीन काळातल्या दिग्गज विणकरांनी चकाकणाऱ्या धारा आणि रेशमी झळाळी असलेलं हे वस्त्र निर्माण केलं. या विणकरांनी त्यांची समृद्ध कल्पनाशक्ती आणि चपळ बोटं वापरून निसर्ग, संस्कृती आणि कलेतले नेत्रसुखद आकृतिबंध निवडले आणि त्याला शैलीदार नक्षीकामाचं स्वरूप देत जादूई वस्त्रांची निर्मिती केली. सुरुवातीच्या काळातले विणकर सूत, रेशीम, ताग आणि वनस्पतींचे तंतू वापरून सगळ्या स्तरांतल्या स्त्रियांसाठी- राजघराण्यातल्या आभूषणांनी मढलेल्या राण्या आणि राजकन्यांपासून ते सामान्य कामकरी स्त्रियांपर्यंत सर्वासाठी- वस्त्र विणत होते. श्रीमंतांसाठी रेशीम आणि सोन्याच्या जरीपासून विणलेली साडी असो किंवा सामान्यांसाठी जाडय़ाभरडय़ा सुतापासून विणलेली साडी असो, त्यावरची डिझाइन्स सारखीच असायची. फुलं-वेली,  पशू-पक्षी, मानवी आकृती किंवा शुभ आणि भाग्यशाली मानली जाणारी सांस्कृतिक चिन्हं.

साडीची लांबी आणि ती नेसण्याची शैली अशी आहे की नेसणाऱ्या स्त्रीचं डोक्यापासून पावलापर्यंतचं सगळं शरीर झाकलं जाईल. आणि आश्चर्याची बाब म्हणजे तरीही या पोशाखातून स्त्रीचं शरीरसौष्ठव उठून दिसतं इतकं की स्त्रियांच्या पोशाखातला हाच सर्वात डौलदार आणि आरामदायी पोशाख ठरावा. अगदी आधुनिक जगातही साडीचं आकर्षण कायम आहे. साडीच्या या दिमाखदार रूपामागचं कारण म्हणजे पारंपरिक साडी नेहमी उत्तम वस्त्रापासून तयार केली जाते. हेतू हा की, साडी अंगाभोवती चापूनचोपून बसावी.  हे वस्त्र मजबूतही असतं. कारण बदलत्या हवामानात ते टिकलं पाहिजे. गेल्या अनेक शतकांपासून साडीचा होणारा वापर आणि मुघलकाळापासून ते ब्रिटिश वसाहतवादाच्या काळात आलेल्या फॅशनच्या असंख्य लाटांमध्येही साडी टिकून राहिली यामागचं कारण म्हणजे साडीचं अभिजात डिझाइन आणि भारताच्या बहुढंगी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारं वैविध्य.

भारतीय स्त्रियांचा वारसा समजली जाणारी साडी टिकून राहिली यामागचं रहस्य म्हणजे या पोशाखाची विश्वास न बसण्याइतकी लवचीकता. हा पोशाख स्त्रीला उन्हा-पावसापासून संरक्षण म्हणून किंवा भारतातल्या काही समाजांच्या रूढी-परंपरा म्हणून पटकन डोकं झाकून घेण्याची मुभा देतो. साडीचा पदर शालीसारखा खांद्याभोवती लपेटून घेता येतो किंवा दिमाखात एका खांद्यावरून खाली सोडता येतो. थंडी-वाऱ्यापासून संरक्षण म्हणून किंवा काही वेळा ओळख लपवण्यासाठी या पदराचा उपयोग होतो. भारताच्या विविध भागांत स्थानिक किंवा एखाद्या समाजाच्या रूढीप्रमाणे साडी नेसून स्त्री तिची सामाजिक ओळख व्यक्त करू शकते. साडीचा रंग, काठ किंवा पदरावरची नक्षी किंवा त्यावर विणलेल्या अथवा छापलेल्या आकृती या सर्व बाबी तिचं समाजातलं स्थान, तिची अभिरुची, वय याबद्दल बरंच काही सांगतात. भारतातल्या लक्षावधी स्त्रिया दररोज आणि सणासमारंभात साडी नेसत असल्या, तरी साडीच्या ग्लॅमर आणि दिमाखाचा इतिहास मात्र राण्यांनी आणि त्या काळातल्या श्रीमंत स्त्रियांनी लिहिला आहे. या स्त्रियांनी अत्यंत कुशल विणकरांना आश्रय देऊन त्यांच्याकडून तलम जाळीदार रेशमी वस्त्रं, मलमल, सोनं-चांदी-रत्नांचं भरतकाम असलेलं ब्रोकेड अशी कितीतरी वस्त्रं विणून घेतली. आजही भारतभर प्राचीन शहरांमध्ये विणकर नैसर्गिक आणि कृत्रिम धागे वापरून वस्त्रांचं इंद्रधनुष्य खुलवत आहेत. आधुनिक स्त्रीच्या उच्चभ्रू अभिरुचीला साजेशा साडय़ा तयार करण्यासाठी पाश्चिमात्य सेलेब्रिटी डिझायनर झांड्रा ऱ्होड्ससह अनेक डिझायनर्स या विणकरांसोबत काम करत आहेत.

अर्थात भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या संपूर्ण भारतीय उपखंडात सर्व स्तरांतल्या स्त्रियांनी साडी इतकी आपलीशी केली आहे की, तिचं उगमस्थान भूतकाळात काहीसं अंधूक झालं आहे. साडी या पोशाखप्रकारात फार मोठय़ा बदलाला वाव नसला, तरी ती विणण्याची नवीन तंत्रं, ब्लॉक किंवा मशीन प्रिंटिंग, रंगवण्याच्या विविध पद्धती आणि भरतकामाच्या विविध प्रकारांमुळे साडी कायमच नवीन भासत आली आहे. अगदी सध्याच्या फॅशनच्या उन्मादाच्या काळातही साडी सर्वात किफायतशीर आणि आरामदायी पोशाख आहे. कामाच्या ठिकाणी, सहज म्हणून किंवा खास प्रसंगी वापरण्यासाठी उत्तम आहे.

साडीला भारतीय स्त्रियांचा वैशिष्टय़पूर्ण पोशाख म्हणून मान्यता मिळून शतके लोटली असली, तरीही सर्व वयाच्या आणि सर्व अभिरुचीच्या स्त्रियांना शोभून दिसणाऱ्या या पोशाखाचा दिमाख जराही कमी झालेला नाही. उलट तांत्रिक प्रगतीच्या प्रत्येक दशकासोबत साडी अधिकाधिक उत्कृष्ट होत जातेय, तिच्यावर अधिक ‘संस्कार’ होताहेत.

मध्ययुगापासून भारतात साडय़ा विणण्यासाठी अनेक केंद्रं विकसित झाली आहेत. एकदा साडीची लांबी निश्चित झाल्यानंतर, विविध प्रदेश आणि समाजाची वैशिष्टय़ं असलेली विणण्याची पद्धत विकसित झाली. त्या त्या प्रदेशाचं किंवा समाजाचं वैशिष्टय़ समजलं जाणारं काम साडीवर केलं जाऊ  लागलं. बनारसचं अप्रतिम रेशमी आणि जरीकाम, ओरिसा आणि आंध्रप्रदेशात विणल्या जाणाऱ्या इक्कत साडय़ा, गुजरातमधल्या उठावदार रंगांच्या पटोला साडय़ा, कांचीपूरमच्या रेशमी साडय़ा, महाराष्ट्रातल्या वैभवशाली पैठण्या, पश्चिम बंगालमधल्या ढाकाई साडय़ा, राजस्थान-गुजरातमधल्या लेहरिया आणि बांधणी साडय़ा, मध्य भारतातल्या चंदेरी साडय़ा, गढवालच्या सुती साडय़ा, हैदराबादच्या हिमरू ब्रोकेड, आसाममधल्या टसर आणि मुगा सिल्कच्या साडय़ा या आणि अशा कितीतरी सुती आणि रेशमी साडय़ांमुळे भारताची गणना जगातल्या अचंबित करणाऱ्या वस्त्रांची निर्मिती करणाऱ्या देशांत होते. वस्त्रांतल्या या प्रचंड वैविध्याची प्रसिद्धी आणि विणकरांची कला यामुळे वस्त्रांचा व्यापार ही भारतासाठी अभिमानाची बाब झाली. ब्रिटिशांनी भारतात वसाहत केल्यानंतर मात्र या उद्योगाची झळाळी काहीशी कमी व्हायला लागली. ब्रिटनमध्ये झालेली औद्योगिक क्रांती आणि तिचं भारतावर झालेलं अतिक्रमण यामुळे हाताने विणलेल्या अतितलम साडय़ा झाकोळल्या गेल्या. मग पुढची काही र्वष यंत्रमागावर तयार झालेलं कापड काळाची आज्ञा मानून स्वीकारलं जाऊ  लागलं.

अर्थात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राज्यकर्त्यांनी शहाणपणा दाखवला. राष्ट्रीय स्तरावर महाकाय प्रयास करून साडय़ांच्या विणकामाची प्रत्येक पद्धत, प्रत्येक डिझाइन आणि प्रत्येक किचकट प्रक्रिया चिकाटीने पुनरुज्जीवित करण्यात आली. साडीला पुन्हा एकदा वैभवाचे दिवस आले. शेकडो र्वष बदलत्या लाटांना तोंड दिलेली आणि कायम लोकप्रियतेच्या शिखरावर बसलेली साडी सर्वात फॅशनेबल पोशाख होऊन भारतीय स्त्रियांच्या वॉर्डरोबमध्ये विराजमान झाली ती कायमचीच. भारतीय वंशाचे लोक जिथे कुठे स्थायिक झाले, तिथे तिथे साडीचा प्रवास झाला. आज ब्रिटन, अमेरिका, फिजी, सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका, मॉरिशस आणि यांसारख्या अनेक देशांमध्ये ‘नीवी’ शैलीत नेसलेली साडी हे परिचित फॅशन गारमेंट आहे..

विमला पाटील

chaturang@expressindia.com

भाषांतर – सायली परांजपे

sayalee.paranjape@gmail.com

First Published on June 17, 2017 4:41 am

Web Title: sareeindian womanmarathi articles