15 October 2019

News Flash

स्त्रीस्वातंत्र्य लढय़ातील चार पावले

स्त्रियांचे काम आता केवळ ‘नोकरी’ उरले नव्हते, तर ते ‘करिअर’ झाले होते.

भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दशकापासून पुढची साठ वर्षे जगभरातील स्त्रियांप्रमाणेच भारतीय स्त्रियांनीही सबलीकरणाच्या दिशेने वाटचाल करत मोठे पल्ले गाठले. या काळात स्त्रियांनी स्वयंपूर्णतेचे लक्ष्य साधण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची फळे आज आपण चाखत आहोत. चार महत्त्वाच्या क्षेत्रांत मोठी झेप घेऊन स्त्रियांनी स्वत:त आणि समाज दोहोंमध्ये कायापालट घडवून आणला. या चार क्षेत्रांत स्त्रियांनी केलेली वाटचाल जवळून बघण्याची संधी एक पत्रकार आणि समाजाची निरीक्षक या नात्याने मला लाभली याचा नेहमीच खूप आनंद वाटतो.

मी माझ्या पत्रकारितेच्या, एका स्त्रीविषयक नियतकालिकाच्या (फेमिना) संपादकपदाच्या दीर्घ आणि रोमांचक कारकीर्दीचा आढावा घेते तेव्हा सर्वाधिक अभिमान वाटतो, आनंद होतो तो दशकागणिक अधिकाधिक यशस्वी होत गेलेली स्वातंत्र्याची एक चळवळ मला जवळून बघण्याची संधी मिळाली याचा! या महान चळवळीने कायम आपली प्रतिष्ठा जपली. या चळवळीत कधी मोर्चे निघाले नाहीत, घोषणाबाजी झाली नाही किंवा मोडतोड झाली नाही. मात्र १९५०च्या दशकाच्या अखेरीला आणि १९६०च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात भारतीय स्त्रियांना हळूहळू त्यांच्या हक्कांची, स्वतंत्र भारतातील त्यांच्या महत्त्वपूर्ण स्थानाची जाणीव होऊ  लागली.

१९४५ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस झालेल्या महाभयंकर विध्वंसाच्या आठवणी वयोवृद्धांच्या मनात आजही ताज्या असल्या तरी,  हे महायुद्ध भारताच्या पदरात मात्र स्वातंत्र्याचे दान टाकून गेले. महायुद्धाच्या काळात पुरुषवर्ग मोठय़ा संख्येने युद्धावर गेल्याने भारतीय स्त्रियांसाठी घराबाहेर पडून अर्थार्जन करण्याच्या शक्यता काही प्रमाणात खुल्या झाल्या. सनातन्यांनी प्रथांच्या नावाखाली घातलेल्या बंधनांतून मुक्त होण्यासाठी यापूर्वी लढलेल्या स्त्रियांचा आदर्श समोर ठेवून आम्ही समाजात आणि देशात नवीन स्थान प्राप्त करण्याची रुजवात याच काळात केली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सगळेच बदलले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणारेही स्त्रियांसाठी आदर्श झाले.

मुंबई विद्यापाठीच्या सन्मान दालनात (हॉल ऑफ ऑनर) डॉ. रखमाबाईंच्या तैलचित्राचे अनावरण करण्याच्या समारंभाचे आमंत्रण एक पत्रकार म्हणून मिळाल्यामुळे मलाही एका महान स्त्रीबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली. ही स्त्री म्हणजे

डॉ. रखमाबाई. आजच्या तरुण मुलींना यांच्याबद्दल फारसे माहीत नसेल. मला मात्र त्यांच्या कार्याबद्दल लिहिण्याची दुर्मीळ संधी मिळाली आणि मी तिचा उपयोग करून घेतला. तीच गोष्ट मी आज इथे मांडणार आहे. पत्रकारितेच्या कारकीर्दीने मला काय संधी दिली ते वाचकांना यावरून सहज कळेल. तेव्हाच्या महाराष्ट्र राज्यात स्वत:च्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या या शूर स्त्रीची गाथा जास्तीत जास्त स्त्रियांना समजावी हा तर या कथेमागील मुख्य उद्देश.

डॉ. रखमाबाई हे नाव आज खूप कमी स्त्रियांना माहीत असले, तरी ज्या थोडय़ांना माहीत आहे, त्यांनी २०१५ मध्ये रखमाबाईंची १५१वी जयंती अत्यंत आदराने आणि कृतज्ञतेने साजरी केली. देशातील अगदी सुरुवातीच्या स्त्री डॉक्टरांपैकी एक म्हणजे

डॉ. रखमाबाई. स्वत:चे आयुष्य ‘वेगळे’ घडावे यासाठी समाजाला, वैद्यकीय-कायदे क्षेत्रांतील तज्ज्ञांना आणि तेव्हाच्या सरकारला आव्हान देण्याचे धैर्य या बाईने दाखवले. त्यांची कथा म्हणूनच प्रेरणेचा स्रोत आहे. त्यांचे नाव डॉ. रखमाबाई राऊत (सावे). कथा थोडक्यात अशी : एका मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबात रखमाबाईंचा जन्म झाला. १९व्या शतकातील प्रथेप्रमाणे वयाच्या सातव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. मात्र काही काळातच हे लग्न मानण्यासच त्यांनी नकार दिला. तेव्हाच्या ब्रिटिश इंडियन कोर्टात धाव घेऊन त्यांनी लग्न अवैध ठरवून घेतले. भारतातील बुद्धिजीवी वर्गाने, समाजातील अग्रणींनी रखमाबाईंवर टीकेची झोड उठवली, तेव्हा त्यांनी १८८५ मध्ये ‘हिंदू लेडी’ या नावाने ‘टाइम्स ऑफ इंडिया’त दोन अत्यंत धाडसी लेख लिहिले. ‘इन्फंट मॅरेज अ‍ॅण्ड फोस्र्ड विडोवूड ’ या शीर्षकाने प्रसिद्ध झालेल्या या लेखांनी १९व्या शतकातील भारतीय समाजाला हादरवून सोडले. रखमाबाईंनी एकीकडे शिक्षण सुरू ठेवले. इंग्लंडमध्ये जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतले. पतीचे किंवा वडिलांचे, दोघांचेही आडनाव न लावता केवळ डॉ. रखमाबाई अशीच आपली ओळख निर्माण करण्यातूनच त्यांचे धैर्य आणि ठामपणा दिसून येतो. या स्त्रीच्या संघर्षांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचे तैलचित्र मुंबई विद्यापीठाच्या सन्मान दालनात ठळकपणे लावण्यात आले आहे.

रखमाबाईंच्या लढय़ानंतर भारतीय स्त्रियांनी मागे वळून बघितलेच नाही. भारतभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये स्त्रियांना प्रवेश दिला जाऊ  लागला. एसएनडीटी महिला विद्यापीठाचे संस्थापक धोंडो केशव कर्वे आणि स्वातंत्र्यलढय़ातील नेत्या सरोजिनी नायडू यांचे या संदर्भातील प्रयत्न उल्लेखनीय आहेत. त्यातच पाश्चिमात्य देशांतून आलेल्या मिशनऱ्यांनी भारतभरात स्त्रियांसाठी शाळा आणि महाविद्यालये सुरू केली आणि देशात स्त्रियांचे नवीन युग सुरू झाले. त्यानंतरच्या दीडशे वर्षांत भारतीय स्त्रिया त्यांच्या हक्कांबाबत अधिकाधिक जागरूक होत गेल्या.

चार महत्त्वपूर्ण क्षेत्रांत भारतीय स्त्रियांनी यशस्वी झेप घेतल्यामुळे त्या जगातील सर्वाधिक स्वयंपूर्ण स्त्रियांच्या पंगतीत जाऊन बसल्या.

१. शिक्षण : शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे स्त्रियांना प्रवेश देऊ लागली. त्याचबरोबर स्वातंत्र्यलढय़ातील अग्रणींनीही स्त्री शिक्षणाला खंदा पाठिंबा दिला. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ातही स्त्रीनेतृत्व पुढे आले. स्त्रियांना मते व्यक्त करण्याची संधी मिळू लागली. सरोजिनी नायडूंसारख्या अनेकींनी या चळवळीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

२. व्यक्तिगत कायद्यांमध्ये सुधारणा : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच नागरी कायद्यांमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले. राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान दर्जा आणि हक्क दिला. हिंदू संहिता विधेयकासारख्या कायद्यांमुळे स्त्रियांना वडिलांच्या मालमत्तेत हक्क मिळाला, घटस्फोट-पालकत्वाबाबत समान हक्क मिळाले, हुंडा आणि स्त्रियांच्या छळाला प्रतिबंध करणारे कायदे संमत झाले.

३. अर्थार्जनाची क्षमता : समाजाच्या रुढींमध्ये आणि नागरी कायद्यांमध्ये स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या बदलांचा परिणाम म्हणून हजारो स्त्रिया अर्थार्जनासाठी घराबाहेर पडल्या. याची सुरुवात दुसऱ्या महायुद्धाच्या काळातच झाली होती. अर्थार्जन आणि आर्थिक स्वयंपूर्णतेमुळे स्त्रियांच्या समाजातील स्थानात आमूलाग्र बदल घडला. त्यानंतर आलेल्या सरकारांनी, मग ती कोणत्याही पक्षाची असोत, स्त्रियांचा शिक्षणाचा, नोकरीचा, अर्थार्जनाचा आणि स्वत:च्या पैशाच्या विनियोगाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मान्य केला. करदाती म्हणून स्त्रीचे अस्तित्व तयार झाले. यामुळे भारतीय स्त्रियांची शक्ती आणि आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढला. राजकीय पक्ष स्त्रियांकडे मतदार म्हणून बघू लागल्यानेही स्त्रियांना अनेकविध हक्कांची वचने दिली जाऊ लागली.  स्त्रियांचे भवितव्य घडवणारी ही अभूतपूर्व झेप ठरली. स्त्रियांचे काम आता केवळ ‘नोकरी’ उरले नव्हते, तर ते ‘करिअर’ झाले होते.

४. मातृत्वाबाबत निर्णयाचा हक्क : स्वत:ची प्रजननक्षमता वापरण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य ही या वाटचालीतील आणखी एक महत्त्वाची उडी. मातृत्व मुळात हवे आहे की नको हे ठरवण्याचा आणि हवे असेल तर ते कधी हवे हे ठरवण्याचा अधिकार स्त्रीला मिळाला. निसर्गधर्माप्रमाणे गर्भ राहू द्यायचा की स्वत:ला हवे तेव्हा मूल होऊ  द्यायचे हे ठरवण्याची मुभा विज्ञानाने स्त्रीला देऊ केली. लग्नबंधनातच न अडकण्याचा, मूल होऊ न देण्याचा किंवा आपल्याला हवी तेव्हा आणि हवी तितकी मुले होऊ  देण्याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य स्त्रीला मिळाले.

स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करताना हे चार टप्पे ओलांडून भारतीय स्त्रियांनी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रांत विजय मिळवला आहे आणि स्वत:च्या भवितव्याची शिल्पकार त्या स्वत:च आहेत हेही सिद्ध केले आहे. या यशामुळे त्या देशासाठी अनमोल ठेवा ठरल्या आहेत.

भाषांतर – सायली परांजपे – sayalee.paranjape@gmail.com

विमला पाटील -chaturang@expressindia.com

First Published on January 28, 2017 2:20 am

Web Title: the journey of the women of india toward empowerment