21 April 2019

News Flash

मुंबईचा अतुल्य वारसा!

खूप अलीकडे अरबी समुद्र हे नाव मिळालेल्या समुद्रकिनाऱ्यावरच्या सात बेटांचा समूह म्हणजे मुंबई.

बाणगंगा तलाव

वाढत्या लोकसंख्येने मुंबई ओसंडतेय आणि दररोज वाढतेच आहे. अर्थात देशाच्या प्रत्येक भागातले, प्रत्येक समाजाचे लोक मुंबईत राहून या सतत विस्तारणाऱ्या शहरात रोजीरोटी कमावत असले, तरी श्रीमंत आणि प्रसिद्ध होण्याची प्रत्येक संधी जिने पुरवली त्या महानगरीबद्दल जाणून घेण्याचे कष्ट कोणालाही नको आहेत. मुंबई हे माझं जन्मगाव, मी शिक्षण घेतलं ते शहर, माझं घर. म्हणूनच मुंबईत नंतर आलेल्या नागरिकांना मलबार किनाऱ्याची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराचा आगळावेगळा आणि अचंबित करणारा इतिहास समजावून देण्याचा हा माझा प्रयत्न!

गेल्या काही शतकांत मुंबईने काळाच्या पुढे पावलं टाकली आणि आज ती व्यापार आणि उद्योगाचा विचार करता जगातील सर्वात मोठय़ा, सर्वात लखलखत्या आणि सर्वात संपन्न शहरांपैकी एक झाली आहे. शहरातील समृद्ध घरं, उद्यानं आणि क्रिकेट मैदानांसह अन्य काही हिरवीगार स्थळं बहुतांशी श्रीमंत उद्योजक कुटुंबांच्या मालकीची आहेत. काही ब्रिटिशांनी आणि उद्योजक घराण्यांनी बांधलेली आहेत. शहरातले अनेक भाग स्थापत्यकला आणि बांधकामाच्या विविध शैलींची साक्ष देणारे आहेत.

पोर्तुगीज राजकन्या कॅथरिन ब्रगंझा हिचं लग्न ब्रिटिश राजपुत्र चार्ल्स दुसरा याच्याशी झालं तेव्हा आंदण म्हणून पोर्तुगीजांनी ब्रिटिश राजपुत्राला ही सात बेटं दिल्यानंतर हे सगळे चमत्कार घडले. दिल्ली, वाराणसी, पुणे, म्हैसूर किंवा अगदी कोलकाता आणि चेन्नईच्या तुलनेत मुंबई हे शहर अलीकडचं मानलं जातं. मात्र सत्य या गृहीतकापेक्षा खूप वेगळं आहे. खूप अलीकडे अरबी समुद्र हे नाव मिळालेल्या समुद्रकिनाऱ्यावरच्या सात बेटांचा समूह म्हणजे मुंबई. यातल्या बहुतेक बेटांवर मच्छीमार समाजाचे लोक राहत होते. त्यांनी त्यांच्या संरक्षक देवांची प्रत्येक बेटावर एक अशी सात मंदिरं बांधली होती. ही सात बेटं म्हणजे- मुंबई, कुलाबा, म्हातारीचं बेट किंवा छोटा कुलाबा, माहीम, माझगाव, परळ आणि वरळी.

ब्रिटिशांच्या ताब्यात ही बेटं आली तेव्हा ही सगळी बेटं जोडून बंदर विकसित केलं, तर ते जगातल्या सर्वात मोठय़ा बंदरांपैकी एक असेल हे त्यांच्या लक्षात आलं. मुंबई द्वीपसमूहाचं भौगोलिक स्थान बघता इथे विकसित झालेल्या बंदरांतून जगाच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही दिशांना प्रवास शक्य होणार होतं आणि यामुळे प्रचंड पैसा कमावण्याची संधी ब्रिटिश व्यापाऱ्यांना मिळणार होती. मग त्यांनी जगातील सर्वात मोठय़ा समुद्रात भराव टाकण्याचा प्रकल्प हाती घेतला आणि सात बेटांच्या समूहाचं रूपांतर एका मोठय़ा बेटात करण्यात यश मिळवलं. या बंदरामध्ये माल व प्रवासी वाहतुकीची प्रचंड क्षमता होती. महाराष्ट्राला आपल्या ऐतिहासिक वारशाने समृद्ध आणि प्रसिद्ध करणारी मंदिरं-गुंफा, शिल्पकला

आणि लेण्यांची एक यादी तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. ही यादी परिपूर्ण नाही, कारण महाराष्ट्रात अगणित अशी स्थळं असल्याने त्या सर्वाचा समावेश शक्यच नाही.

मुंबईच्या उपनगरांमध्ये कान्हेरी लेणी आहेत. इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकात भिख्खू, विद्वान आणि तज्ज्ञांनी या लेण्यांतील शिल्पं आणि शिलालेख कोरले असावेत हे इथल्या शिलालेखांवरून स्पष्ट होतं. ही लेणी सध्याच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ आहेत आणि शनिवार-रविवारी सहलीसाठी जाण्याचं हे  सध्याचे लोकप्रिय स्थळ आहे. त्यानंतर आहे ते प्राचीन शहर शुर्पराका म्हणजेच सध्याचं नालासोपारा. इसवीसनपूर्व पहिल्या शतकात हे शहर प्रचंड मोठं व्यापारी केंद्र होतं. शुर्पराका शहराचा व्यापार रोम आणि पाश्चिमात्य जगातल्या आणखी काही प्रसिद्ध शहरांसोबत होता. बहुतेक व्यापारी त्या काळात मुंबईचा उल्लेख सात बेटांचा समूह असा करायचे. सध्या नालासोपाऱ्यात एकच स्तूप असून तो पुनर्निर्मित स्थितीत आहेत. प्राचीन शुर्पराकाची ओळख सांगणारे हे एकमेव स्मारक आता उरलं आहे.

त्यानंतर आहेत जोगेश्वरी लेणी. ही लेणी सहाव्या शतकात खोदली गेली आहेत. स्वातंत्र्यानंतर लगेचच्या काळात ही लेणी प्रसिद्ध झाली होती, कारण एक संन्यासी या लेण्यांमध्ये त्यांच्या पाळीव वाघासह राहत होते. तज्ज्ञांच्या मते, जोगेश्वरी लेणी ही देवतांची शिल्पं असलेली सर्वात प्राचीन हिंदू किंवा बौद्ध लेणी असावीत. ही लेणी मुंबई शहराच्या हद्दीत आहेत आणि सर्वात जुन्या हिंदू आणि बौद्ध गुंफा मंदिरांपैकी समजली जातात. या लेण्यांचा काळ ५२० ते ५५० असावा. या स्थळाचं वैशिष्टय़ म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं अत्यंत व्यग्र केंद्र समजल्या जाणाऱ्या मुंबई शहरामध्ये ते आहे आणि कित्येक लोक या लेण्यावरून कामाच्या ठिकाणी ये-जा करतात.

बाणगंगा तलाव

मुंबईतलं आणखी एक रमणीय स्थळ म्हणजे बाणगंगा तलाव आणि त्याच्या काठाला असलेलं वाळकेश्वर शिवमंदिर. हे देखणं मंदिर आणि मंदिरापासून तलावाकडे उतरणाऱ्या महाकाय, सुंदर पायऱ्या यांच्या बांधकामाचं श्रेय इतिहास शिलाहार राजवटीतील राजांना देतो. आज, या तलावाच्या भोवताली बरीच मंदिरं आहेत आणि पलीकडे चकाकता अरबी समुद्र. हे बांधकाम दहाव्या शतकातलं आहे. आज हे संरक्षित वारसास्थळ आहे. काही वर्षांपूर्वी बाणगंगा संगीत महोत्सव कार्यक्रमामुळे या स्थळी मोठी गर्दी होत असे. मात्र, या तलावाला आणि परिसराला काही हानी पोहोचू नये म्हणून हा कार्यक्रम इथे घेणं थांबवण्यात आलं आहे. या परिसराची स्वच्छता नुकतीच करण्यात आली असून गतकाळातील दगडी स्थापत्यकलेचं उदाहरण म्हणून हा परिसर मोलाचा आहे. शिवाय रामायणातही या संदर्भात एक गोष्ट आहे. वनवासात असताना राम, सीता आणि लक्ष्मण समुद्राजवळच्या एका टेकडीवर आले. सीतेला पिण्यासाठी गोडं पाणी हवं होतं, पण त्यांना कुठेच गोडं पाणी मिळत नव्हतं. म्हणून रामाने या समुद्रकाठच्या वालुकामय जमिनीत एक बाण मारला आणि या जमिनीतून गोडय़ा पाण्याचा झरा फुटला. म्हणूनच या तलावाला बाणगंगा असं नाव पडलं. याचा अर्थ जमिनीत बाण मारून निर्माण केलेली गंगा. हा गोडय़ा पाण्याचा झरा समुद्राच्या इतका जवळ असूनही त्याचं पाणी अजिबात खारट नाही ही विस्मयाचीच बाब आहे.

राजा भीमदेवाने १३व्या शतकात महिकावतीला, सध्याच्या माहीमला, त्याची राजधानी केली आणि बाणगंगा तलावाकडे जाणाऱ्या वाळकेश्वर मार्गाच्या अगदी सुरुवातीला असणारं बाबुलनाथ शिवमंदिर बांधलं. असं म्हणतात की, याच राजाने किनारपट्टीवर मोठय़ा संख्येने नारळाची झाडे लावून घेतली.

कार्ला लेणी हे आणखी एक आश्चर्य मुंबई-पुणे महामार्गावर मळवली रेल्वेस्थानकाच्या जवळ आहे. मानवी प्रयासांतून साकारलेलं आश्चर्य म्हणजे या लेण्यांतील एका भल्यामोठय़ा दालनातले ३२ कोरीवकाम केलेले खांब. दालनाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी १६. चैत्याकडे जाणाऱ्या रुंद रस्त्यावर हे महाकाय स्तंभ आहेत. या हाताने कोरीवकाम केलेल्या स्तंभांवरील नक्षीकाम अचूक आहे. हे दालन म्हणजे भारतातील सर्वात मोठे गुंफादालन आहे. लेणींच्या प्रवेशद्वाराबाहेर एक मोठा अशोकस्तंभ आहे. हा स्तंभ भारतातील बहुधार्मिक समाजाचं तसेच त्यांच्या आयुष्याकडे बघण्याच्या समान आध्यात्मिक दृष्टिकोनाचं प्रतीक मानला जातो. हे एक राष्ट्रीय प्रतीक असून भारतातील चलनी नोटांवर तसेच सरकारी दस्तावेजांवर तो दिसतो. बाजूला आणखी काही दगडांमध्ये भिख्खू आणि अन्य कर्मचाऱ्यांची निवासस्थानं असलेल्या साध्या गुहा आहेत. हा भाग सह्य़ाद्री पर्वतरांगांमध्ये येतो. हे सगळं इसवीसनपूर्व दुसऱ्या ते पाचव्या शतकांदरम्यान बांधलं गेलं. सर्वात जुनं लेणं इसवीसनपूर्व १६० मधलं आहे. पश्चिम किनारपट्टीवर कामासाठी येणारे अनेक व्यापारी काल्र्याला मुक्काम करत असत. महाराष्ट्रभर पसरलेल्या सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगा दख्खनच्या खडकापासून तयार झालेल्या असून, त्यांची रचना निर्दोष आहे. या पर्वतरांगा उत्तर व दक्षिण भारताच्या मध्ये आहेत. या पर्वतरांगांमध्ये सुंदर फुलांनी बहरलेल्या दऱ्या आहेत, प्राचीन बांधकामं आणि लेणी आहेत. किनारपट्टी हा अनेक शतकांपासून व्यापारी मार्ग राहिला आहे. कार्ला लेणी बौद्ध राज्यकर्त्यांनी खोदून घेतलेली आहेत. ही लेणी म्हणजे एका खडकातून खोदून तयार केलेलं एक मोठं दालन असून त्याला स्तंभांचा आधार आहे. या बांधकामातलं आश्चर्य म्हणजे एवढय़ा जुन्या काळातही हे मंदिर बांधणाऱ्यांना या खडकांच्या दर्जाविषयी ज्ञान होतं, कारण स्थापत्यशास्त्र आणि धार्मिक रूढी दोहोंनुसार मंदिरासाठी कच्चे खडक वापरले जात नाहीत. मळवली रेल्वे स्थानकाच्या दुसऱ्या बाजूला भाजे लेणी आहेत. हा इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकात खोदण्यात आलेला २२ लेण्यांचा समूह आहे. दक्षिण आणि उत्तर भारताच्या केंद्रस्थानी असलेलं भाजे हे त्या काळी कदाचित एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं. लेण्यांमध्ये काही स्तूप आणि शिलालेख आहेत. हे सगळं आता राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करण्यात आलं आहे.

घारापुरी लेण्यांमधील त्रिमूर्ती

एलिफंटा किंवा घारापुरी लेणी मुंबईच्या किनाऱ्यालगतच्या एका बेटावर आहेत. इथल्या लेण्यांचं खोदकाम अप्रतिम आहे. त्रिमूर्ती तसंच शिवाच्या विविध रूपांची शिल्पं इथे आहेत. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियासमोर हे बेट असून इथे हिंदू लेण्यांचा एक मोठा समूह, तर बौद्ध लेण्यांचा छोटा समूह आहे. हिंदू लेण्यांमध्ये त्रिमूर्तीचं शिल्प अचंबित करणारं आहे. एका दगडातून हे शिल्प कोरण्यात आलं असून आभूषणांनी परिपूर्ण आहे. हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक आहे. आजूबाजूला शिवाची अनेक रूपं दाखवणारी शिल्पं आहेत. शिवपुराणासारख्या प्राचीन ग्रंथातील अनेक कथा शिल्पांतून चितारल्या आहेत. शिव-पार्वतीचा विवाह, शिवाचं वैश्विक नर्तकाचं रूप आणि अन्य अवतार दाखवण्यात आले आहेत. या लेण्यांच्या शैलीवरून ती इसवीसनाच्या पाचव्या ते दहाव्या शतकांदरम्यान खोदली गेली असावी, असं दिसतं. मात्र, ही कोणी बांधली हे सिद्ध करणारे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. असं म्हणतात की, बऱ्याच पूर्वी या शिल्पांना रंग देण्यात आला, पण आज रंगाच्या केवळ खुणा राहिल्या आहेत. कोणतेही निकष लावले तरी घारापुरी लेणी हा अतुल्य वारसा आहेत. आज याचं संरक्षण उत्तम केलं जात आहे. दर वर्षी हजारो पर्यटक या लेण्यांना भेट देतात. या लेण्यांसाठी वापरलेला खडक बघितला तर त्या वेळी बांधकाम करणाऱ्यांना भूगर्भशास्त्राचं किती ज्ञान होतं हे लक्षात येतं. अशा प्रकारच्या महाकाय कामासाठी कोणता खडक निवडावा हे त्यांना पुरेपूर समजत होतं. त्रिमूर्तीच्या लेण्याची १९७० च्या दशकात दुरुस्ती करण्यात आली आणि पुरातत्त्व संशोधन विभागाला या लेण्याची काळजी नीट घेता यावी म्हणून १९८७ मध्ये त्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये करण्यात आला. आजही वाजवल्या जाणाऱ्या तबला व वीणा ही वाद्ये वाजवणाऱ्या वादकांची शिल्पं या लेण्यांमध्ये आहेत. ही वाद्यं हजारो वर्षांपूर्वीही अस्तित्वात होती याचा हा पुरावा आहे. नृत्याची शिल्पंही आधुनिक शास्त्रीय नृत्यशैलींची आठवण करून देणारी आहेत. आज अस्तित्वात असलेल्या नृत्यशैली दोन हजार वर्षांपूर्वीही होत्या, हे यावरून स्पष्ट होतं.

अंबरनाथचं शिवमंदिर हा प्राचीन स्थापत्यकलेचा आणखी एक नमुना. याबद्दल आपण मागील लेखामध्येच जाणून घेतलं. परळमध्ये सापडलेलं शिवाचं शिल्प हा अलीकडे हाती लागलेला ठेवा. मुंबईतल्या एका औद्योगिकीकृत उपनगरात, परळमध्ये, रस्तादुरुस्तीचं काम सुरू असताना हे शिल्प सापडलं. मुंबईतल्या प्रत्येक नागरिकाला यामुळे विस्मय वाटला, कारण हे शिल्प सापडलं तो भाग मुंबईतला कापड गिरण्यांचा आणि रुग्णालयांचा होता. या भागात तुफान रहदारी होती. शिवाचं हे शिल्प आता प्रथम श्रेणी वारसास्थळ म्हणून जाहीर करण्यात आलं असून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे याच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. संकल्पना आणि तिची अंमलबजावणी या दोन्ही बाबतीत हे अचंबित करणारं आहे. हे शिल्प सापडलं तिथून जवळच तीन मंदिरं आहेत- चंडिकेचं, व्याघ्रेश्वरीचं आणि शंकराचं. यातील काही शिल्पं सहाव्या शतकातली आहेत. शिवाचं शिल्प संग्रहालयात नेण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणांनी केला. मात्र, स्थानिक रहिवाशांनी याला विरोध करून त्यांच्या वसतिस्थानाजवळच हे शिल्प राहिलं पाहिजे, असा आग्रह धरला. आता १५ फूट बाय १० फूट अशा एका खोलीत या शिल्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, त्याला बारादेवी असं नाव स्थानिकांनी दिलं आहे. विश्रांती घेत असलेल्या सातमुखी शिवाचं शिल्पही असंच रस्तादुरुस्तीच्या कामात दगडांमध्ये सापडलं. मात्र, ते शिल्प अपूर्ण दिसत असल्याने त्याची प्रतिष्ठापना झाली नाही. या शिल्पात शिवाच्या केसांच्या जटा दिसत असल्याने त्याला परेल शिवा असं म्हटलं जातं. शिवाच्या खांद्यावरून दोन प्रतिमा दाखवलेल्या आहेत. त्याच्या प्रत्येक खांद्यापासून दोन शिरे दाखवली आहेत. यातली दोन शिरे अपूर्णावस्थेत आहेत. हे शिल्प साडेअकरा फूट बाय साडेसहा फूट एवढं महाकाय असल्याने मंदिरात ठेवण्याजोगं नाही, तर लेण्यांसाठीच केलेलं असावं, असा इतिहासकारांचा अंदाज आहे. उत्खननात त्याची हानी झालेली असल्याने ते मंदिरात किंवा प्रार्थनेसाठी ठेवलेलं नाही.

कार्ला लेणी

मुंबई आणि महाराष्ट्रात भविष्यकाळातही असेच मौल्यवान प्राचीन अवशेष, लेणी किंवा मंदिरं सापडू शकतात, कारण ही भारताची पश्चिम किनारपट्टी खरोखर पश्चिमेकडील समुद्रकिनाऱ्याची राणी होती. बेसॉल्ट खडकापासून तयार झालेल्या सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगा या विशेष आहेत हे हजारो वर्षांपासून भारतातील विविध समूहांना माहीत होतं. हा खडक अत्यंत दणकट असून यावर कोठेही फटी किंवा पांढऱ्या रेषा नाहीत. या खडकावर एक चराही न पाडता त्यातून मोठमोठी शिल्पं, कोरीवकामं, लेणी आणि स्तंभ खोदले जाऊ  शकतात. मंदिरं किंवा देवतांची लेणी खोदताना फटी, जोड किंवा पांढऱ्या रेषा चालत नाहीत. हा नियम सर्व शिल्पकार आणि स्थापत्यकारांसाठी होता. घारापुरी लेणीत आजही हे दिसून येतं. दगडाला फटी पडल्यामुळे तिथे र्अध झालेलं काम मोडीत काढण्यात आलं होतं. म्हणूनच महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि केरळमधील सह्य़ाद्रीच्या रांगांना हिंदू, जैन व बौद्ध समाजाने चिरकाल टिकणारी स्मारकं आणि शिल्पं तयार करण्यासाठी पसंती दिली. ही स्मारकं आणि शिल्पं पुढे येणाऱ्या पिढय़ांना भारताच्या भूतकाळाबद्दल आणि संस्कृती-कलेमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल सांगणार होती. या पर्वतरांगांमधून लांबलचक आणि टिकणारे बोगदे काढले जाऊ  शकतात याची जाणीव भारतातील ब्रिटिश राज्यकर्त्यांनाही होती. म्हणूनच मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर १४ बोगदे बांधण्यात आले. सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगांचा समावेश अलीकडेच जागतिक वारसास्थळांमध्ये करण्यात आला आहे. यातील ३९ स्थळांचा दर्जा असा आहे की, जो केवळ पश्चिम घाट किंवा सह्य़ाद्रीतच सापडू शकेल. जगातील पहिल्या आठ  महत्त्वाच्या स्थळांमध्ये या पर्वतरांगांना युनेस्कोने स्थान दिलं आहे. या पर्वतरांगांवरील अतिक्रमण, कचरा टाकण्याचे प्रकार तसंच अन्य कोणत्याही प्रकारची हानी रोखण्यासाठी सध्या जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

राष्ट्राच्या इतिहासात आणि विकासात मुंबईची भूमिका महत्त्वाची आहेच. स्वातंत्र्याच्या ‘चले जाव’ चळवळीला १९४२ मध्ये सुरुवात झाली ती मुंबईमधूनच. देशवासीयांमध्ये बंडाची आणि त्यागाची ज्योत जागवण्यासाठी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांनी याच मुंबईतून, तिथल्या मैदानांवरून ओजस्वी भाषणं दिली होती. स्त्रियांना शिक्षणाचा हक्क देणाऱ्या, आर्थिक स्वातंत्र्य देणाऱ्या, बालविवाहाला विरोध करणाऱ्या चळवळींचं महाराष्ट्राने कायम नेतृत्व केलं आहे. शिक्षण, संस्कृती, सामाजिक सुधारणा आणि राजकीय पटलावरही महाराष्ट्र भारताचं नेतृत्व करत आला आहे. अशी ही मुंबई अचंबित करणारा अतुल्य वारसा असणारी..

विमला पाटील

भाषांतर – सायली परांजपे

sayalee.paranjape@gmail.com

chaturang@expressindia.com

,

First Published on August 26, 2017 3:01 am

Web Title: vimala patil article on mumbai history