मला कोणी माझ्या आयुष्याचं आणि कामाचं वर्णन करायला सांगितलं किंवा माझं स्वत:चं वर्णन करायला सांगितलं तर मी हेच तीन शब्द वापरेन- ‘साऊथ मुंबई वुमन’ माझा जन्म इथे झाला, मी इथल्याच शाळा-महाविद्यालयात शिकले, माझं सगळं करिअर इथेच घडलं, माझं लग्न इथेच झालं, मी माझ्या मुलांना इथेच वाढवलं आणि माझं संपूर्ण आयुष्य इथेच घालवलं. माझ्या पिढीतल्या स्त्रियांनी शाळेत किंवा महाविद्यालयामध्ये असताना कधीच संगणक बघितला नाही किंवा माहिती तंत्रज्ञानाचं शिक्षण घेतलं नाही- खरं तर त्या काळात बऱ्याच भारतीय स्त्रिया शाळेनंतर कॉलेजमध्ये जातही नव्हत्या. चांगला मुलगा दृष्टिपथात आला की, त्यांचं लग्न करून दिलं जात होतं.

माझा जन्म झाला त्या मुंबईत रस्त्यांवरून घंटा वाजवत जाणाऱ्या ट्राम्स होत्या, सगळीकडे हिरवाई होती. मात्र या मुंबईच्या उदरात भारताचा स्वातंत्र्यलढा खदखदत होता. मुंबईच्या हिरव्यागार मैदानांवर महात्मा गांधी किंवा जवाहरलाल नेहरू यांची भाषणं होत, तेव्हा हजारो लोक ती ऐकण्यासाठी जमत. मी ज्या दक्षिण मुंबईत राहात होते, तिथेच ही चळवळ शिखराला पोहोचली होती. शाळेत असताना या नेत्यांना बघण्याचं आणि गवालिया टँक मैदानावर (आताचं ऑगस्ट क्रांती मैदान) विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करण्याचं भाग्यही मला लाभलं. माझे वडील तेव्हा मुंबईत तसे नवीनच होते. व्यवसायासाठी त्यांचं मूळ गाव उत्तर कन्नडहून मुंबईला आले होते. माझी अभ्यासातली प्रगती आणि समाजकार्याची आवड बघून त्यांनी मला कॉलेजमध्ये पाठवलं. मी बीए झाल्यानंतर गव्हर्न्मेंट लॉ कॉलेजमध्ये एलएलबीला प्रवेश घेतला. पण माझ्या इंग्रजीच्या शिक्षकांनी साहित्य आणि सर्जनात्मक लेखन घेण्यासाठी माझं मन वळवलं. विशेष म्हणजे, पत्रकारितेच्या अभ्यासासाठी माझे वडील मला वयाच्या २१व्या वर्षी एकटीला लंडनला पाठवण्यास तयार झाले. त्याकाळी हे धाडसाचं होतं. या तीन वर्षांच्या अभ्यासाचा दुहेरी फायदा म्हणजे मी माध्यमात काम करण्यासाठी पात्र झाले आणि तिथेच मला माझे भावी पती भेटले. भारतात परतल्यानंतर मी त्यांच्याशी लग्न केलं.

navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
policeman committed suicide by shooting himself in the head
नागपूर : डोक्यात गोळी झाडून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कामाचा ताण की…

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या नवीन नियतकालिकात, ‘फेमिना’त काम करण्याची संधीही मिळाली. तिथून मी मागे वळून बघितलं नाही. ‘फेमिना’च्या पहिल्या संपादक फ्रेनी तल्यारखान यांच्या मार्गदर्शनाखाली मी निष्ठेने माझ्यातलं उत्तम देण्यासाठी प्रयत्न करू लागले. दोन वर्ष नोकरी केल्यानंतर मी उत्तम लेख लिहू लागले, मुलाखती घेऊ लागले, भाषणांच्या व मोठय़ा सोहळ्यांचे वृत्तांत लिहू लागले. त्या काळात जॉन एफ. केनेडींचा करिष्मा अवघ्या जगावर होता. भारत आणि अमेरिका नवीन सांस्कृतिक संबंधांसाठी उत्सुक होते. याच काळात मला संधी मिळाली ती यूसिस अर्थात अमेरिकी माहिती सेवेसाठी काम करण्याची. यूसिसमध्ये आम्ही सेलेब्रिटीजच्या भेटी आखत होतो आणि विविध वृत्तपत्रांसाठी लिहीत होतो. इथे माझ्यापुढे एका नवीन जगाचे दरवाजे उघडले गेले. मला जॉन केनेथ गॅलब्रेथ, पर्ल बक, रेड निकोल्स, आर्थर श्लेसिंगर आणि अमेरिकेतील अनेक दिग्गजांशी भेटण्याची संधी मिळाली. जॅकलिन केनेडी यांनी भारताला सदिच्छा भेट दिली, तेव्हा त्यांच्या पथकात मी होते. पीस कॉर्पोरेशन्स आणि अमेरिका-भारत सहयोगाच्या प्रयत्नांसदर्भातले वृत्तांत मी लिहिले आणि १९७३ मध्ये मी ‘फेमिना’ची संपादक झाले.

हे इंग्रजी भाषेतलं पहिलं स्त्रियांसाठीचं नियतकालिक भारतीय स्त्रियांची आयुष्य बदलण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणार अशी खात्री आम्हा सर्व स्त्रियांना (फेमिनाचा संपूर्ण कर्मचारी वर्ग स्त्रियांचा होता.) वाटत होती. पुढची २० वर्ष, म्हणजे मी निवृत्त होईपर्यंत, स्त्रियांवर अन्याय करणारे सगळे कायदे बदलण्यात योगदान म्हणून आम्ही सरकारच्या अनेक सामाजिक आणि राजकीय संस्थांशी शाब्दिक लढे दिले. आता कोणाचा विश्वास बसणार नाही पण अगदी १९५०च्या दशकापर्यंत स्त्रियांना त्यांच्या नवऱ्याच्या स्वाक्षरीशिवाय स्वत:चं बँक खातं उघडता येत नव्हतं किंवा नवऱ्याची मान्यता असल्याशिवाय त्या कर्ज घेऊ शकत नव्हत्या. हुंडय़ाच्या बोजाखाली मुलींची कुटुंबं दबलेली होती आणि फार कमी स्त्रियांना उच्चशिक्षणाची संधी मिळत होती, कारण, विद्यापीठाच्या पदवीपेक्षा लग्न होणं मुलींच्या बाबतीत जास्त महत्त्वाचं समजलं जात होतं. हे सगळं बदलायला अनेक वर्ष जावी लागली. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात ‘भारतीय’ स्त्रीची एक ओळख निर्माण करण्याची संधी आम्हाला मिळाली.

मला वाटतं, कोणत्या तरी समुदायातली स्त्री यापेक्षा एक भारतीय स्त्री म्हणून स्त्रियांना एकत्र बांधण्यासाठी आम्ही जे काम केलं, ते माझं सर्वात मोठं यश. हा बदल घडवून आणण्यासाठी आम्ही स्त्रीच्या आयुष्यातली तीन क्षेत्रं निवडली आणि या क्षेत्रांच्या माध्यमातून स्त्रियांना एकत्र आणलं. ही तीन क्षेत्रं म्हणजे खाद्यपदार्थ, फॅशन आणि घराची सजावट. माझ्या २० वर्षांच्या कार्यकाळात आम्ही या आणि अशा आणखी काही बंधांच्या मदतीने भारतीय स्त्रीचं व्यक्तिमत्त्व तयार करण्यात यशस्वी झालो. त्यांना आर्थिक स्वावलंबन, शिक्षण, एक सर्वसमावेशक भारतीय व्यक्तिमत्त्व आणि आपल्या वारशाबद्दल वाटणारा अभिमान यांचं महत्त्व पटवून दिलं.

माझा या नियतकालिकातला कार्यकाळ संपला, तेव्हा या मासिकाचा खप प्रचंड होता आणि उत्पन्नही. आम्ही ‘मिस इंडिया’ स्पर्धेची सुरुवात केली. आज ही स्पर्धा एक राष्ट्रीय सोहळा झाला आहे. माझ्या करिअरची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे मला जगभर प्रवास करण्याची, विविध देशांतल्या स्त्रियांबद्दल माहिती करून घेण्याची आणि भारतीय स्त्रीच्या आयुष्याची झलक त्यांना दाखवण्याची संधी मिळाली. मी ग्रेट ब्रिटनला गेले, युरोपातल्या सगळ्या देशांत फिरले. फिजी बेटं, व्हेनेझुएला, युगोस्लावाकिया, यूएसएसआर, जपान, मालदीव्ज, मॉरिशस यांसारखे आगळेवेगळे देश आणि संपूर्ण अमेरिका खंड पालथा घातला.

मी १९९०च्या दशकात निवृत्त झाले, तेव्हा माझ्या आयुष्यातलं हे प्रकरण संपलं. सुदैवाने त्या सुमारास प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. सॅटेलाइट टीव्ही, कॉम्प्युटर, वेब रायटिंग, वेबसाइट तयार करणे. माहिती तंत्रज्ञान माध्यमांतली नवीन साधनं उदयाला आल्यामुळे मला शेकडो संधी मिळाल्या. मी हाऊस मॅगझिन्सचं संपादन केलं, असंख्य नियतकालिकं, वेबसाइट्ससाठी लिहिलं आणि माझी स्वत:चीही वेबसाइट होती. गुजरातमधल्या सोमनाथ मंदिरातला साऊंड अ‍ॅण्ड लाइट शो, ओडिशातल्या उदयगिरी गुंफा आणि हरिद्वारमधला गंगा वॉटर शो असे लक्षणीय प्रकल्प मला करायला मिळाले. त्याबद्दल मी या सदरातून लिहिलं आहेच. मी नियमित नोकरी करत होते, त्या वेळी मिळाल्या त्याहून अधिक संधी मला निवृत्तीनंतर मिळाल्या असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. मध्यंतरीच्या काळात माझ्या मुलाने यूकेमध्ये तर मुलीने आर्यलडमध्ये करिअर केलं. या दोन देशांतच जन्माला आलेली माझी चार नातवंडं म्हणजे मुलाने आणि मुलीने मला दिलेला बोनसच आहे!

माझ्या करिअरमधलं माझ्यापुढे असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे ‘स्त्री मुक्ती’ ही समाज उद्ध्वस्त करणारी चळवळ नव्हे, हे भारतीय समाजाला पटवून देण्याचं. काळ भुर्रकन उडून जातोय. मला आता फारसा प्रवास करता येत नाही पण माझं लेखन सुरू आहे. व्याघ्रसंवर्धनासाठीच्या टायगर वॉच प्रकल्पासारख्या सामाजिक कामांना मी मदत करते. मला योग्य वाटणाऱ्या बाबींसाठी शक्य होईल तेवढं करते. संगीत, नाटकं, प्रवास, मित्रमंडळींना भेटणं आणि माझ्या वाढत्या कुटुंबाकडे बघणं याचा आनंद मी लुटतेय.

या सगळ्यासाठी मला तिघांचे आभार मानले पाहिजेच. पहिले माझे वडील. ज्या काळात केवळ लग्न करून देण्यासाठीच मुलींना वाढवलं जात होतं, त्या काळात त्यांनी माझ्यासाठी मोठी स्वप्नं पाहिली. दुसरं माझ्या आईचं कुटुंब. त्यांनी माझ्यावर कोणत्याही मर्यादा आणल्या नाहीत आणि करिअरच्या प्रत्येक पायरीवर पाठिंबा दिला. उदाहरणार्थ, माझ्या मुलांना वाढवणारी माझी मावशी. १९७१च्या युद्धाच्यादरम्यान मी बांगलादेशात जाऊन तिथल्या स्त्रियांचं दु:खं सर्वांपर्यंत पोहोचवावीत असा तिचाच आग्रह होता. यात तुझं काही बरंवाईट झालं तर तुझ्या मुलांची जबाबदारी मी घेईन, असं आश्वासन तिने मला दिलं होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या प्रत्येक यशाचं कौतुक करणारे आणि चांगल्या-वाईट काळात मला मनापासून पाठिंबा देणारे माझे पती. मी जे स्वप्न बघत होते, ते या सगळ्या लोकांनीही माझ्यासाठी बघितलं म्हणून ‘वर्किंग वुमन’ हे शब्दच नकारात्मक भावनेने घेतले जायचे त्या काळात मी खूप काही करू शकले. एक दिवस लक्षावधी भारतीय स्त्रिया अपार कष्ट करून देशाला एक उत्तम भविष्यकाळ देतील आणि त्याच वेळी मुलांचं संगोपन करून चांगले नागरिकही घडवतील हा माझा विश्वास खरा ठरला आहे. माझ्या पुढचं सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे माझ्याकडे असलेल्या मर्यादित वेळात मुलांना घडवण्याचं, त्यांचं करिअर घडवण्याचं. माझ्या आयुष्याच्या नाण्याच्या दोन्ही बाजू- काम व घर यशस्वी करण्यासाठी मी अपार कष्ट घेतले. आणखी काय, माझ्यासाठीही जे काही करायची इच्छा होती, ते सगळं मी केलं. त्यामुळे आज मी पूर्णपणे समाधानी आहे, असं मी नक्की म्हणू शकते.

विमला पाटील

भाषांतर – सायली परांजपे

sayalee.paranjape@gmail.com

chaturang@expressindia.com

(सदर समाप्त)