16 October 2019

News Flash

इंद्रायणी काठी..

रेंगाळणाऱ्या हिवाळ्यातली धुक्याची अखेरची वलयंही सोन्यासारख्या सूर्यप्रकाशात वितळून गेलीयेत.

माणसाच्या प्रयत्नांची आणि अनुभवांची गुपितं पोटात घेऊन उभ्या असलेल्या छोटय़ा शहरांचं मला कायमच आकर्षण वाटत आलंय. मुंबई-पुणे मार्गावरच्या तळेगाव नावाच्या छोटय़ाशा गावात मिळालेलं लहानसं कॉटेज हे माझ्यासाठी खूप मोठं वरदान होतं. हे कॉटेज काढल्यानंतर माझं केरळमध्येही छोटंसं घर होतं. आयुष्यातले काही निवांत दिवस मी या दोन्ही घरांमध्ये घालवले, बागकाम करत आणि आजूबाजूच्या परिसरात हिंडत. माझ्या लक्षात आलं की माझी ही घरं म्हणजे ऐतिहासिक स्थळांना, आजूबाजूच्या परिसराला भेट देण्याच्या दृष्टीने अत्यंत मोक्याच्या ठिकाणी होती. महाराष्ट्रातल्या अध्यात्माचा, कलेचा इतिहास लिहिणाऱ्या अनेक स्थळांना माझी मूळं मला घेऊन गेली.  इथे मी असेच काही अविस्मरणीय अनुभव तुम्हाला सांगतेय..

रेंगाळणाऱ्या हिवाळ्यातली धुक्याची अखेरची वलयंही सोन्यासारख्या सूर्यप्रकाशात वितळून गेलीयेत. सह्यद्री पर्वतांतल्या कडय़ाकपारींच्या रेषा आता उन्हाळ्यातल्या निळ्या, निरभ्र आकाशाच्या पाश्र्वभूमीवर स्वच्छ, पूर्ण दिसू लागल्याहेत. हिवाळ्यात काशाच्या रंगासारख्या भासणाऱ्या झाडांना, गवतांना एक सोनेरी छटा आलीये.. महाराष्ट्राच्या बहुपदरी सांस्कृतिक इतिहासाची मूक, पण सजग साक्षीदार भासणारी इंद्रायणी नदीही सौम्य दिवस आणि शांत रात्रींच्या या ऋतूत कशी स्थिर भासतेय.

पश्चिम घाटातल्या लाव्हा खडकांमध्ये उगम पावणारी ही नदी कितीतरी निसर्गरम्य परिसरांतून ऐतिहासिक स्थळांना स्पर्श करत वाहते. तळेगावात ती प्रथम स्पर्श करते ती मराठय़ांच्या इंदूरी किल्ल्यातल्या महाकाय खडकांना. किल्ल्याच्या टेहळणी बुरुजांवरून सूर्यास्ताच्या समयी इंद्रायणीचं प्रसन्न रूप दिसतं. सध्या मोडकळीला आलेला हा किल्ला मराठा साम्राज्याच्या वैभवशाली काळाचं प्रतीक आहे. इंद्रायणीने हे वैभव नक्कीच बघितलं असेल, मराठा सरदारांची जीवनशैली तिने नक्कीच बघितली असेल. आज किल्ल्याच्या उंचच उंच भिंतीवर शेवाळं उगवलंय, फाटकातून आत गेलं की दिसते ती केवळ गवताळ जमीन. किल्ल्याच्या आतमध्ये थेट नदीत उतरणाऱ्या पायऱ्या आहेत आणि दुर्गेचं एक छोटंसं मंदिर, त्यात किणकिणणाऱ्या घंटा.

आणखी काही किलोमीटर्स वाहत गेली की, इंद्रायणी महाराष्ट्रातल्या आणखी एका ऐतिहासिक शहराला स्पर्श करते. देहूमध्ये तिचे दोन्ही किनारे पावन झाले आहेत ते थोर संत-कवी तुकाराम यांच्या जीवनकहाणीने आणि साहित्याने. तुकारामांचा जन्म १६०८ मध्ये देहूतच झाला होता. देहूच्या थोडं अलीकडे एक वृक्षराई आहे, तिथे बसूनच तुकारामांनी विठ्ठलाची महती सांगणारे अजरामर अभंग रचले. तुकारामांना विरोध करणाऱ्यांनी गाथा इंद्रायणीत बुडवली, पण देवी इंद्रायणीने ही गाथा त्यांना सन्मानाने परत दिली, अशी आख्यायिका आहे. पुढे त्यातही अनेक विचार मांडले गेले. आणखी एक आख्यायिका आहे – तुकाराम भंडारा टेकडय़ांवर बसून ध्यान करायचे आणि त्यांच्यावर संतापणारी, पण तितकंच प्रेम करणारी त्यांची पत्नी जिजाई तिथे त्यांच्यासाठी चटणी-भाकरी घेऊन यायची. गमतीचा भाग म्हणजे विठ्ठल स्वत: तिच्या पाठीमागे येऊन भाकरीतला घास मागायचा आणि ती मात्र तिच्या नवऱ्याच्या आयुष्याचं वाटोळं केल्याबद्दल विठ्ठलाला शिव्याशाप द्यायची. ती टेकडीवर पोहोचली की, तुकाराम तिला विठ्ठलाला भाकरीचा एक घास दे अशा विनवण्या करायचे, असंही आख्यायिका सांगते. या टेकडीवर आजही तुकारामांचं मंदिर आहे आणि ध्यान करण्यासाठी अनेक शांत जागा आहेत.

तुकाराम एक दिवस नाहीसे झाले, असंच इतिहास सांगतो. त्यांनी कुटुंबातल्या सगळ्यांना सांगितलं की, ते वैकुंठाला जाताहेत आणि टेकडीवर जाऊन विठ्ठलाची वाट बघत बसले. नंतर झालेला चमत्कार बघण्यासाठी मोठ्ठा जनसमुदाय एकत्र झाला. लोक गाऊ  लागले. एखादं विमान म्हणा किंवा दिव्य वाहन म्हणा आलं आणि विठ्ठल तुकारामांना त्यात बसवून घेऊन गेला, असं प्रत्यक्ष बघितल्याचं सांगणारे लोकही होऊन गेलेत असं म्हणतात. आजही भंडारा टेकडय़ा तीर्थक्षेत्रासारख्या आहेत. तुकारामांवर – ते व्यवसायाने वाणी होते – एक चित्रपटही आला आणि खूप लोकप्रिय झाला. यात तुकारामांची मुख्य भूमिका विष्णुपंत पागनीस यांनी केली होती. त्यानंतर पागनीसांनी कधीच मुंबईला परत येऊन त्यांचा व्यवसाय केला नाही. ते तिथेच विठ्ठलाची भक्ती करत तुकारामांसारखं आयुष्य जगले.

इंद्रायणी पुढे वाहत जाते ती महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र असलेल्या आळंदी शहरातून. थोर संत ज्ञानेश्वर (१२७५-१२९६) यांची समाधी इथेच आहे. पावसाळ्याच्या हिरव्यागार ऋतूत इंद्रायणी नदी पाण्याने दुथडी भरून वाहत असते, तेव्हा हजारो भाविक इंद्रायणी काठच्या ज्ञानेश्वरांच्या समाधीपुढे नतमस्तक होण्यासाठी येतात. भगवद्गीतेचं सार सामान्य लोकांना समजावं म्हणून ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या या थोर संताने प्रेम हाच मानवजातीसाठी सर्वात मोठा धर्म अशी शिकवण समाजाला दिली. अवघ्या २१व्या वर्षी संजीवन समाधी घेऊन जीवनयात्रा संपवण्यापूर्वी ज्ञानेश्वरांनी अवघ्या देशाला जगण्याचा आणि प्रेमाचा मार्ग दाखवला. आजही त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी होणारी गर्दी विस्मयकारक आहे. असं म्हणतात की, ज्ञानेश्वरांनी आळंदीतल्या मंदिराखालच्या गुहेत विठ्ठलाच्या समक्ष प्रवेश केला आणि मग ते तिथून बाहेरच आले नाहीत. आजही ते त्या गुहेत ध्यान करत आहेत, असा अनेकांना विश्वास आहे.

काळ सरत गेला, पण इंद्रायणी पिवळसर भूभागावर एखादी चमकदार सोनेरी रेघ ओढावी तशी वाहत राहिली. ती जिथे जिथे वाहते तिथला परिसर शांतपणे समृद्ध करून टाकते. ज्ञानेश्वरांच्या समाधीतून एक पवित्र वृक्ष- अजानुवृक्ष बाहेर आला आहे. या झाडाखाली ज्ञानेश्वरीचं वाचन सातत्याने सुरू असतं. असं म्हणतात की, गेली अनेक शतकं हे पारायण सुरू आहे. महाराष्ट्रावर ज्यांचा संदेश आज इतक्या शतकांनंतरही छाया धरून आहे, त्या ज्ञानेश्वरांबद्दल लोकांना किती प्रेम आहे, हे यावरून स्पष्ट होतं. भगवद्गीतेचं सार मराठी भाषेतून सामान्य लोकांना समजावून सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीचा भारतातल्या आध्यात्मिक संकल्पनांवर गाढा प्रभाव आहे. केवळ २१ र्वष जगून ज्ञानेश्वर अमर ठरले आहेत.

ज्ञानेश्वरांच्या आयुष्यावर एक स्मरणीय चित्रपट तयार करण्यात आला होता. यात ज्ञानेश्वरांची भूमिका करणारे अभिनेते शाहू मोडक यांनीही त्यांचं उर्वरित आयुष्य ज्ञानेश्वरांच्या साहित्याला अर्पण केलं. ते ज्ञानेश्वरीवर व्याख्यानं देऊ  लागले.

दरवर्षी आळंदीला लाखो भाविक भेट देतात. ज्ञानेश्वरीचं किंवा भावार्थ दीपिकेचं वैशिष्टय़ म्हणजे सुंदर भाषा आणि दैवी शक्तीला पूर्णपणे समर्पित झाल्याचा भाव. ज्ञानेश्वरी ही मराठीतली सर्वोत्कृष्ट साहित्यकृती समजली जाते. देशात अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेविरोधात चळवळ सुरू होण्याच्या कितीतरी पूर्वी संत ज्ञानेश्वरांची भक्तिसंप्रदायाच्या माध्यमातून समानताधिष्ठित समाजाची निर्मिती केली होती. त्यांच्यानंतर कित्येक शतकं आणखी कितीतरी संत-लेखक आणि कवींनी भक्तिसाहित्याची निर्मिती केली. हे साहित्य आजही लक्षावधी घरांमध्ये वाचलं जातं. ज्ञानेश्वरी हा तर मराठी भाषेचा अलंकार किंवा दागिना समजला जातो. ज्ञानेश्वरांनी चांगदेव पासष्टी, अमृतानुभव, हरिपथ आणि यांसारख्या अनेक साहित्यकृतींची निर्मिती केली. विठ्ठलाच्या भक्तीसाठी अनेक भक्तिगीतं रचली. महाराष्ट्रातल्या भक्तिसंप्रदायाचं वर्णन असं केलं जातं : ज्ञानियाने रचिला पाया, तुका झालासे कळस. अर्थात ज्ञानेश्वरांनी रचलेल्या पायावर, तुकारामांनी कळस चढवला. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस ज्ञानदेवांनी देवाकडे आशीर्वादाची याचना केली आहे. ज्याला पसायदान म्हटलं जातं. जे अनेकांना मुखोद्गत आहे.

आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे। तोषोनि मज द्यावे। पसायदान हे।।

जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो। भूतो परस्परे पडो। मैत्र जीवांचे।।

दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्म सूर्ये पाहो। जो जे वांछील तो तें लाहो। प्राणिजात।।

वर्षत् सकळ भूमंडळी। ईश्वरनिष्ठांची मांदियाळी। अनवरत् भूमंडळी। भेटतु भूतां।।

चलां कल्पतरुंचे अरव्। चेतनाचिंतामणींचें गाव्। बोलते जे अर्णव्। पीयूषाचे।।

चंद्रमे जे अलांछन्। मरतड जे तापहीन। ते सर्वाहि सदासज्जन। सोयरे होतु।।

किंबहुना सर्व सुखी। पूर्ण होउनि तिन्हीं लोकी। भजीजो आदिपुरुषी। अखंडित।।

येथे म्हणे श्रीविश्वेश्वरावो। हा होईल दान पसावो। येणे वरे ज्ञानदेवो। सुखिया झाला।।

अलीकडच्या काळातल्या काही ऐतिहासिक घटनांचीही इंद्रायणी साक्षीदार आहे. माळवलीला तिच्याच काठावर अनंत शिवाजी देसाई यांनी राजा रविवम्र्याच्या प्रसिद्ध चित्रांच्या प्रिंट्स काढण्यासाठी मुद्रणालय सुरू केलं. रविवम्र्याने काढलेल्या विष्णू, शिव, लक्ष्मी, पार्वती, सरस्वती या देवतांच्या चित्रांच्या प्रिंट्स इथेच छापल्या गेल्या आणि रविवम्र्याच्या कलाकृती असलेल्या या देवता स्वस्त दरात उपलब्ध होऊन सामान्यांना त्यांच्या घरांत लावणं शक्य झालं. आज ते मुद्रणालय तिथे नसलं, तरी त्या प्रिंट्स बाळगणं कोणत्याही कला संग्राहकाचं स्वप्न असतं. असं म्हणतात की, हे मुद्रणालय बंद झाल्यानंतर राजा रविवम्र्याने दादासाहेब फाळके यांना भारतातला पहिला चित्रपट- राजा हरिश्चंद्र काढण्यासाठी अर्थसाहाय्य केलं.

माळवलीहून गिर्यारोहकांना रस्त्याच्या एका बाजूला भाजालेणी तर दुसऱ्या बाजूला कार्लालेणी असं रमणीय दृश्य दिसतं. गौतमबुद्धाच्या खडकांतून कापून काढलेल्या भल्यामोठय़ा पुतळ्याभोवती रांगेने उभे असलेले एकसारखे स्तंभ हे कार्लालेण्यांचं वैशिष्टय़ आहे. या लेण्यांच्या परिसरातच एकवीरा देवीचं मंदिरही आहे. एकूणच महाराष्ट्राचं हे वैभव, त्याची संपन्नता विलक्षण आहे.

 

विमला पाटील

भाषांतर – सायली परांजपे

sayalee.paranjape@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on May 6, 2017 3:44 am

Web Title: vimla patil marathi articles dnyaneshwari