08 August 2020

News Flash

हे निद्रे

सावरकरांनी अशी ओळ कधीच लिहिली नसती. कारण सावरकरांना निद्रेचा वियोग कधी झाला नाही.

शांत निद्रा हीसुद्धा एक प्रकारची समाधीच आहे.

लहान मूल नेहमीच सुंदर दिसतं. पण ते जेव्हा विश्वासाने खांद्यावर डोकं ठेवून गाढ झोपतं ना, तेव्हा ते जास्त सुंदर दिसतं. या शांत झोपेचा विश्वासाशी संबंध आहे नक्की. सगळे शांत झोपलेत आणि आपणच तळमळतोय, तेव्हाचं एकटेपण किती भयावह असतं. शांत निद्रा हीसुद्धा एक प्रकारची समाधीच आहे. ती मिळते ती कुठलीही टोचणी मनात ठेवली नाही तरच..

आखों मे भरकर प्यार अमर

आशिष हथेली में भरकर

कोई मेरा सर गोदी में रखकर सऱ्हाता

मै सो जाता..

कोई गाता.. मै सो जाता..

.. काय शब्द आहेत हरिवंशराय बच्चन यांचे! नुसते शब्द वाचून झोपेच्या अधीन व्हावसं वाटतं, पण गंमत अशी की असं वाटलं तरी झोप लागत नाही, कारण.. ‘आखों मे भरकर प्यार अमर.. आशिष हथेली में भरकर..’ असे हात आता डोक्यावर फिरत नाहीत. लहानपणी बाबा किंवा आजोबांच्या मांडीवर डोकं ठेवून गोष्ट ऐकता ऐकता डोळे जड कधी व्हायचे कळायचंच नाही. जड झालेले डोळे उघडून वर पाहिलं की बाबांचे, आजोबांचे आपल्याकडे प्रेमाने बघणारे डोळे दिसायचे. त्यांच्या हातांची ऊब जाणवायची, त्यांच्या तळहाताचा मऊ  स्पर्श जाणवायचा आणि त्या सुखशय्येवर झोपणं हा आपला अधिकारच आहे अशा विश्वासाने शरीराचा सारा भार त्यांच्या अंगावर सोडून दिला जायचा. वा! विचारानेसुद्धा शरीराला हलकेपणा आलाय. किती शांत झोप..  लहानपणातली अनेक सुखं मोठेपणी गहाळ होतात, त्यातलंच हे एक निद्रासुख.

त्या दिवशी गाडीमध्ये मी इतकी पेंगत होते, अधूनमधून शेजारच्या बाईंच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपत होते. मध्येच डोळे उघडले की मान सरळ करून त्या बाईंना सॉरी म्हणत होते आणि परत निद्राधीन.. जेव्हा मी पुन्हा सॉरी म्हटलं तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘अहो कशाला सॉरी म्हणताय? इतकी छान झोप येतेय तुम्हाला, झोपा निवांत.’’ क्या बात है! झोपलेल्या परक्या व्यक्तीला आपुलकीने दिले जाणारे खांदे आजही आहेत तर.. ‘निजेला धोंडा’ ही म्हण जरी वेगळ्या अर्थाने खरी असली तरी कधी कधी असा ‘निजेला खांदा’ही लागतो.

लहान मूल नेहमीच सुंदर दिसतं. पण ते जेव्हा विश्वासाने खांद्यावर डोकं ठेवून गाढ झोपतं ना, तेव्हा ते जास्त सुंदर दिसतं. या शांत झोपेचा विश्वासाशी संबंध आहे नक्की. युरोपात एक संत होऊन गेला. त्याच्या मांडीवर विषारी नागही शांत झोपायचे म्हणे.. अहिंसेचा परमोच्च बिंदू म्हणून त्याचं उदाहरण दिलं जातं. विनोबा म्हणाले, ‘हे अहिंसेचं उदाहरण नक्कीच, पण अहिंसेचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे.. युरोपात संताच्या मांडीवर नाग झोपतात. आमच्याकडे नागाच्या मांडीत देव झोपतो. शेषशायी भगवान.. भगवंताचा शेषावर आणि शेषाचा भगवंतावर विश्वास आहे. या विश्वासामुळेच भगवंत शेषावर शांत निद्रा अनुभवत असतात.’ अर्थात क्षीरसागरातला हा लक्ष्मीपती जितक्या सहज शांत निद्रा अनुभवतो तितकी शांत निद्रा पृथ्वीवरच्या लक्ष्मीपतींना लागत असेल की नाही काय माहीत?

आपल्याकडे लहानपणापासून कवितेत वगैरे असंच सांगितलं जातं ना! ‘उंच पाटी पालथी उशाखाली’ घेऊन निजणारा कष्टकरी हमालच शांत निद्रा अनुभवू शकतो. खरंच आहे. कष्टाविण निद्रा ना मिळते.. एका गावात एक बाई राहत होती. मोठय़ा श्रीमंत घरची. सगळी सुखं हात जोडून पुढय़ात उभी होती, पण निद्रासुख नव्हतं. निद्रासुख श्रीमंत-गरीब असा भेद पाहत नाही. कित्येक र्वष त्या बाईला झोप लागत नव्हती. त्याच गावात एका स्वामींचा मुक्काम पडला होता प्रवचनासाठी. कुणीतरी त्या बाईला सांगितलं, ‘‘मोठे अधिकारी सत्पुरुष आहेत. त्यांना विचारा झोपेवरचा काही उपाय माहीत आहे का?’’ बाई त्यांच्याकडे आली. बोलता बोलता स्वामींनी तिची सगळी चौकशी केली आणि नेमका प्रश्न त्यांच्या लक्षात आला. डोळे मिटून घेतले आणि समोर काही दिसतंय असं भासवत बाईला म्हणाले, ‘‘बाई, हा झोपेचा प्रश्न नंतर सोडवू. आधी तुझ्या गेल्या जन्मातलं एक व्रत पूर्ण कर. ते राहून गेलंय. या समोरच्या डोंगरावरच्या मंदिरासमोर जो अश्वत्थ वृक्ष आहे त्याला तू सकाळ -संध्याकाळ १०८ प्रदक्षिणा घालण्याचा नेम केला होतास तो आधी पूर्ण कर बाई. तो सलग ३ महिने न थांबता कर. झोपेचं नंतर बघू.’’ तिने प्रदक्षिणा सुरू केल्या आणि आठवडाभरात तिला झोप लागायला लागली.

स्वामींना हे पक्कं माहीत होतं की, झोपेसाठी शरीर झिजवा म्हटलं तर कोणी काही करणार नाही. पण धर्म, कर्म असं काही सांगितलं तर लोक करतील. अर्थात ज्यांच्यावर निद्रादेवी प्रसन्न आहे, ज्यांना कधीही, कुठेही, केव्हाही झोप लागू शकते ते या असल्या विधानांना कुत्सित हसतील. प्रचंड उकाडय़ात, पंखे चालत नसताना, लग्नाच्या कार्यालयात, नातेवाइकांच्या गोंगाटात, इतरांची जेवणं होईपर्यंत काही मंडळी कोपऱ्यात बसल्या बसल्या गाढ झोपतात, अहाहा! काय त्यांची ती समाधी अवस्था! ती पाहून, छे! छे! मत्सर नाही वाटत, मन भरून येतं.

सावरकरांच्या कवितेत थोडासा बदल करून म्हणावंसं वाटतं, ‘तव मत्सर ना.. परी छळी त्या वियोग निद्रेचा’ सावरकरांच्या ओळीत थोडा बदल करून वरची ओळ म्हटली आहे.

सावरकरांनी अशी ओळ कधीच लिहिली नसती. कारण सावरकरांना निद्रेचा वियोग कधी झाला नाही. त्यांची १९१४ मध्ये अंदमानात लिहिलेली ‘निद्रे’ शीर्षकाची कविता आहे. त्या कवितेच्या प्रस्तावनेत वा. गो. मायदेवांनी म्हटलंय, ‘‘बंदिगृहात सर्वतोपरी गांजले असताही विनायकरावांच्या वाटय़ास एक सुख दैवाने शेवटपर्यंत राखून ठेवलं होतं, ते म्हणजे त्यांना पडल्याक्षणी लागणारी शांत झोप. विनायकरावांनी या निद्रेचे मनापासून आभार मानलेत कवितेत.. तीच कविता ‘निद्रे.’ सावरकर म्हणतात,

‘हे निद्रे, सहगमना अंगने-समा

करुनी या यमपुरीत येसी मजसवे.

मम शय्या बंदिगृही संगती तुझ्या

प्रेममृदुल, मोहक जणू शेज फुलांची

देवा या निद्रेसी तरि निदान तू

नेऊ नको मजपासुनी – सर्व यद्यपि नेलेसी’

ही शांत निद्रा आणि त्यांची कविता हीच त्यांची बंदिगृहात खरी सहचरी होती.. त्या थंड कडक फरशीवर गाढ झोपणारे सावरकर. नि सात गाद्यांच्या खाली असलेला छोटासा मटाराचा दाणा टोचतो म्हणून रात्रभर तळमळणारी ‘प्रिन्सिस अँड द पी’ कथेतली राजकुमारी, दोन टोकंच.

राजकन्येचं सोडून देऊ. तिचं वैभवच वेगळं. पण या गोष्टीतली एक बाब फार महत्त्वाची आहे. मटाराचा दाणा छोटासाच होता. झोप येत नाही तेव्हा मनाला टोचणारी गोष्ट बऱ्याचदा छोटीशीच असते. प्रत्येकाची ही छोटीशी टोचणी वेगळी असेल, पण टोचत राहते खरी. मग रात्र विचार करण्यात, उद्या कोणाला कसं समजवायचं? कोणाची कशी कानउघाडणी करायची? कोणाला उद्या सॉरी म्हणायचं? या आणि अशा असंख्य विचारात निघून जाते. सगळे शांत झोपलेत आणि आपणच तळमळतोय. तेव्हाचं एकटेपण किती भयावह असतं. आपली एखादीच रात्र अशा टोचणीत सरते म्हणून त्याचं विशेष वाटत नाही आपल्याला, पण ज्यांना कायमच रात्र रात्र झोप लागत नाही त्यांचं कसं होत असेल? कसा सामना करत असतील ते?

असा किस्सा ऐकला होता की उस्ताद आमिरखाँ साहेबांच्या मैफिलीला एक श्रोता नेहमी यायचा आणि पहिल्या रांगेत बसून झोपायचा. उस्ताद त्याला काहीच बोलायचे नाहीत. एकदा कुणी विचारलं तेव्हा त्याने सांगितलं, ‘‘उस्तादजींचं गाणं दैवी आहे. गेली ५ र्वष झोप लागली नाही, पण यांच्या मैफिलीत स्वरांची अशी काही जादू घडते की पहिल्या आलापीतच निद्रादेवी डोक्यावरून हात फिरवते.’’ हे माहीत असल्यामुळे असेल उस्तादांनी त्याला झोपण्यावरून कधी हटकलं नाही.

शेवटी शांत निद्रा हीसुद्धा एक प्रकारची समाधीच आहे. (हा लेख वाचून उद्या एखाद्या विद्यार्थ्यांने हे वाक्य शिक्षकांना सांगितलं तर शिक्षकांनी मला माफ करावं.). ओशोंच्या बाबतीतही सांगतात की, ओशोंच्या प्रवचनात अनेक माणसं शांत झोपायची. हा वाणीचा एक गुण आहे. बोलणं ऐकताना एखादा माणूस निर्भर होऊन शांत झोपणं यासाठी वाणीची वेगळी क्षमता असावी लागते.

असो. तर असं हे निद्राख्यान.. खरं तर अजून खूप लिहायचंय.. पण निद्रा ही एक प्रकारची समाधीच आहे आणि त्या अवस्थेवर बोलण्यापेक्षा त्या अवस्थेचा अनुभव घेणंच इष्ट.. नाही का?

धनश्री लेले dhanashreelele01@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2017 1:47 am

Web Title: dhanashree lele article on quiet sleep
Next Stories
1 कान सांभाळा..
2 क्षणस्थ
3 अलगद
Just Now!
X