News Flash

तूच तुझा परीक्षक

गाडीत समोरच्या बाकावर बसलेली मुलगी फारच अस्वस्थ दिसत होती.

गाडीत समोरच्या बाकावर बसलेली मुलगी फारच अस्वस्थ दिसत होती. आधी बराच वेळ व्हाट्स अ‍ॅपवर घाईघाईने काही तरी टाइप करत होती, मध्येच डोळे पुसत होती. मग ते सगळं सोडून तिने फोनवर बोलायला सुरुवात केली. इतरांचं बोलणं ऐकू नये हे कळत होतं मला, पण तीही जरा मोठय़ानेच बोलत होती, त्यामुळे मी ऐकायचं नाही म्हटलं तरी माझ्या कानावर सगळं पडत होतं. आपण असं मुद्दाम वागलो नाही, असं ती कोणाला तरी पुन्हा पुन्हा सांगत होती. आपल्या वागण्याची सगळी कारणमीमांसा सांगत होती, आईबाबा, साईबाबा सगळ्यांच्या शपथा घेत होती. आपल्यावर समोरच्याने विश्वास ठेवावा म्हणून खूप आटापिटा करत होती. आपलं वागणं पुन्हा पुन्हा समजवून देत होती.

मी तिच्याकडे एकटक पाहत होते. घामाघूम झाली होती. बोलून बोलून दमली होती बिचारी. पण फोनवरची पलीकडची व्यक्ती ऐकून घेत नसावी. हिच्या डोळ्यात खरेपणा जाणवत होता. आपण हा निर्णय घेताना कोणाकोणाचा विचार केला ते समोरच्याला सांगत होती. ‘प्लीज प्लीज, बोल माझ्याशी, फोन नको ठेवू, प्लीज ऐकून घे माझं..’ असं वारंवार विनवत होती.  पण उपयोग शून्य. समोरच्याने फोन कट केला असावा. हिनं पुन्हा फोन लावला पण उचलला गेला नाही, पुढचा काही वेळ फोन लावण्यात गेला तिचा. शेवटी हताश होऊन तिने फोन पर्समध्ये ठेवला आणि डोळ्याला रुमाल लावून बसली. तिचं स्टेशन आल्यावर ती उतरून गेली, पण माझ्या मनातून काही ती जाईना. काय झालं असेल? कोणाशी इतकं बोलत असेल? तिची बाजू कोणी तरी समजून घेईल का?.. जोपर्यंत तिची बाजू समजून घेतली जाणार नाही तोपर्यंत किती अस्वस्थ राहील ती.. या विचाराने क्षणभर गलबलून आलं..

असं होतं ना.. आपल्या सगळ्यांच्या बाबतीत.. कधी ना कधी तरी. आपला निर्णय, आपलं वागणं, आपलं बोलणं आपल्या जवळच्या व्यक्तींना नाही पटत पण ते आपल्याला पटत असतं किंवा काही वेळेला तर ते आपल्याही नकळत घडलेलं असतं. आपण त्यात दोषी नसतो, पण समोरच्या व्यक्तीला ते पटत नाही. आपण ते मुद्दाम केलय किंवा अविचाराने केलंय असच इतरांना वाटत राहतं. मग आपणही आपली बाजू मांडण्यासाठी जिवाचा आकांत करतो. वेगवेगळे दाखले देत, वेगवेगळ्या प्रसंगांची आठवण करवून देत आपण आपला मुद्दा मांडत राहतो. खरं तर आपली बाजू मांडत राहतो. आपण कसे आहोत, नेहमी आपण कसे वागतो, आपला स्वभाव कसा आहे, समोरचा आपल्याला किती वर्षांपासून ओळखतोय, आपल्याबद्दल समोरच्याने कोणालाही विचारावं, अगदी शत्रूलासुद्धा.. असं कित्ती कित्ती आपण सांगत राहतो, पटवत राहतो.. पण काही वेळा नाही होत याचा उपयोग. गैरसमज व्हायचा तो होतोच. पुढचे काही दिवस आपण अस्वस्थ राहतो. सगळं एकदा स्पष्ट करण्याची संधी मिळावी अशी इच्छा करतो.

का हे सगळं करतो आपण? का समर्थन करत राहतो आपल्याच वागण्याचं? आपला निर्णय? आपली बाजू समोरच्याने ऐकून घ्यावी, आपला त्यामागचा विचार समजून घ्यावा म्हणून का एवढं शिणतो आपण? आपल्याबद्दल गैरसमज होऊ नये म्हणून..? आपल्या विचारसरणीवर शंका घेतली जाऊ नये म्हणून..? नातं तुटू नये म्हणून..? आपल्याला वाईट ठरवलं जाऊ नये म्हणून..? आपला खरेपणा सिद्ध व्हावा म्हणून? .. आपण जेव्हा असं स्वत:ला सिद्ध करायला लागतो ना किंवा अशी स्वत:ची बाजू मांडायला लागतो ना तेव्हा समोरच्यालाही चेव चढत असावा आणि तोही दुसरी बाजू ऐकून घ्यायची नाहीच अशा निर्धाराने उभा राहतो. मग आपण आणखीनच कंबर कसून आपली बाजू सांगायला लागतो. जुनीपुराणी उदाहरणं द्यायला लागतो, बोलता बोलता तोल सुटला तर मग आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला लागतात. उणी-दुणी काढली जातात, मूळ मुद्दा बाजूला पडून भलतंच काही तरी उकरलं जातं.. या सगळ्यात होतं काय? तर फक्त शक्ती आणि वेळ वाया जातो. कोणालाच कोणाचं म्हणणं कळत नाही, पटणं तर पुढची गोष्ट..

मग अशा वेळी मनात येतं, खरंच काही गरज आहे का आपलं म्हणणं, आपली बाजू समोरच्याला पटवून द्यायची? का घालवायची शक्ती एवढी? त्याने ‘ओके’ असं प्रमाणपत्र दिलं म्हणजेच आपली बाजू योग्य ठरणार आहे का? दोन वेळा अगदी चार वेळाही प्रयत्न करावा. पण नंतरच्या पुढल्या क्षणी मात्र थांबावं. त्याला पटलं तर आपल्याबद्दल गैरसमज होणार नाही हे अगदी खरं, पण नाही जरी पटलं त्या व्यक्तीला तरी आपला आपल्यावर विश्वास आहे ना? आपण कोणत्या परिस्थितीत तसं वागलो, बोललो हे आपल्याला माहीत आहे ना.. आपला विवेक जागृत आहे ना.. मग समोरच्याची पावती कशासाठी? सगळं स्पष्ट झालं, प्रवाह पूर्वीसारखा वाहायला लागला की बरं असतं, त्यात मध्ये गरसमजाच्या गाठी नकोत हे जरी कितीही खरं असलं तरीही अशा वेळी गाठी सुटत नाहीत तर त्या आणखीनच घट्ट होतात. त्यापेक्षा आपलं म्हणणं मांडून थांबावं, काही काळ मध्ये जाऊ द्यावा, समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल जे वाटायचंय ते वाटू द्यावं. फक्त आपला आपल्यावर पूर्ण विश्वास मात्र असायला हवा. आपल्यातला साक्षी जागा आहे ना मग झालं तर.. बरं जे खरं आहे ते आज ना उद्या कळणार आहेच. काळच ते सगळं सिद्ध करणार आहे. आणि नाही जरी झालं ते सिद्ध तरी काय हरकत आहे? सत्य आपल्याला ठाऊक आहे ना.. त्या दुसऱ्या व्यक्तीने आपल्याविषयी घेतला काही गैरसमज करून म्हणून आपण लगेच तसे होत नाही.

नामदेवांची गोष्ट फार बोधप्रद आहे याबाबतीत. नामदेव विठ्ठलाच्या नामस्मरणात, त्याच्या विचारात गुंग झालेले असायचे. लोकांना फार कौतुक वाटायचं नामदेवांचं. पण एकदा परिसा भागवत मात्र नामदेवांना अगदी टाकून बोलले.. ‘नामदेवा हाती टाळ चिपळी घेऊन मोठा अगदी हरिदास झाल्याचं भासवतोयस.. परि याति तुझी हीनचि’ आता हे ऐकल्यावर एखादा सामान्य माणूस दुखावला गेला असता. (आजच्या काळातला जर कोणी असता तर हे प्रकरण न्यायप्रविष्टच झालं असतं.) विठ्ठलापाशी उच्चनीच असा भेदभाव नसतो, असं कदाचित त्याने पटवूनही पाहिलं असतं. पण नामदेवांनी ते ऐकलं आणि पुढल्या क्षणी डोळे मिटून नामस्मरणात तल्लीन झाले. काही सांगितलं नाही, पटवलं नाही.. पण काही वर्षांनी नामदेवांचा महिमा सिद्ध झाला तेव्हा हेच परिसा भागवत स्वत:हून पुढे आले आणि नामदेवांना म्हणाले.. ‘मागे जे बोललो सारेचि विसरलो, लोटांगणी आलो नामयाच्या’ काहीही स्पष्टीकरण न देता नामदेव आपल्या कार्यात मग्न राहिले. परिसा भागवतांनी नंतर तरी आपल्याला चांगलं म्हणावं हीसुद्धा नामदेवांची अपेक्षा नव्हती.. कुणी निंदा कुणी वंदा.. इतरांच्या प्रमाणपत्रावर गुणदोष ठरत नाहीत.

गुणदोष हे व्यक्तीसापेक्ष आहेत. एकाला वाटणारा गुण दुसऱ्याला वाटेलच असं नाही. म्हणून इतरांच्या विचारांवर आपण आपली प्रतिमा का उभी करायची? ..गमतीत म्हणावसं वाटतं ..अध्यात्मात ‘को हं’ समजून घ्यायचं म्हणजे.. ‘कोण आहे?’ तर या लौकिक जगात वावरताना ‘मी कसा-कशी आहे?’ हे समजून घ्यायचं. अर्थात हे दोन्ही प्रश्न समजून घेणं अवघडच आहे.. कोणी आपल्या विषयी काय वाटून घ्यावं हे आपल्या हातात नाही. पण आपण दुसऱ्याविषयी काय वाटून घ्यायचं, खरं तर  काय वाटून घ्यायचं नाही हे मात्र आपल्या हातात आहे. ‘आपणावरुनी जग ओळखावे’ हे अशा वेळी ध्यानात ठेवायला हवं.

हे एवढं सगळं मी लिहित्येय खरी, पण काही रोखठोक बोलणारी माणसं म्हणतील की, एवढा कसला विचार करायचा त्यात? आपण एकदा सांगायचं नि नाही पटलं समोरच्याला तर ‘गेला उडत’ म्हणून मोकळं व्हायचं. अशा वेळेला आम्ही का एवढा या गोष्टीचा विचार करतो, त्याच्या मागच्या आमच्या भावना काय.. हे सगळं त्यांना पटवून देण्यापेक्षा एवढंच म्हणावं की ‘गेला उडत’ म्हणणं ज्यांना जमतं त्यांच्यासारखे सुखी तेच..

असो.. या लेखनप्रपंचाचा शेवट करताना माझी आजी मला  लहानपणी जे वाक्य सांगायची ते सांगते.. ‘‘धने, कशाला इतकं स्पष्टीकरण देतेयस.. तुझ्या मनाला विचार.. हे करण्यामागचा तुझा हेतू शुद्ध होता का? हेतू शुद्ध असेल तर स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आणि हेतू शुद्ध नसेल तर स्पष्टीकरणाचा उपयोग नाही..’’ थोडक्यात, तूच आहेस तुझ्या कृतीचा परीक्षक..

– धनश्री लेले

dhanashreelele01@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 1:22 am

Web Title: dhanashree lele articles in marathi on take responsibility for your own actions
Next Stories
1 दीपज्योती
2 ऐकावे जनाचे
3 प्रत्यक्ष आणि प्रतिमा
Just Now!
X