होईल! आशेने शब्दरूप घेतलंच तर ते असं दिसेल ना!

होईल! ही तीन अक्षरं म्हणजे जणू ऊर्जेचा स्रोत!

savarkar
सर्वसमावेशक दृष्टिकोन
a story of self confidence chaturang article
जिंकावे नि जगावेही : आपल्या माणसांचं ‘असणं’!
vada pav recipe
वडापाव नव्हे! इडली वडापाव; कधी खाल्ला का? जाणून घ्या ही सोपी रेसिपी
Nutritious but tasty Makhana Uttapam Try this recipe once
पौष्टिक पण चविष्ट असा मखाना उत्तपा! एकदा खाऊन तर पाहा, ही घ्या रेसिपी

होईल! जिजीविषा म्हणजे जगण्याची इच्छा देणारा शब्द जणू!

प्रसंग कुठलाही असेना का.. हा शब्द काम करतो.. म्हणजे.. मुलीचं लग्न जमत नसलेल्या आईला धीर देताना म्हणावा, अचानक नोकरी गेलेल्या तरुणाला उभारी देताना उच्चारावा, लग्नानंतर खूप दिवस मूल नसलेल्या जोडप्याच्या डोळ्यात स्वप्न देताना सांगावा, खूप मोठं कार्य निर्विघ्न पार पडावं म्हणून झटणाऱ्या घरातल्या कर्त्यां पुरुषाला दिलासा देताना म्हणावा, नाटकाचा पहिला वहिला प्रयोग करणाऱ्या अभिनेत्याला शुभेच्छा देताना उच्चारावा.. होईल.. मग या शब्दाच्या मागेपुढे आपल्या भावनेच्या तीव्रतेनुसार.. मस्त, छान, उत्तम, नीट, व्यवस्थित, मनासारखं अशी विशेषणं वापरावीत.. पण खरं काम करतो तो होईल हाच शब्द..

हुरहुर, अस्वस्थता, काळजी, चिंता अशी सगळी तारांची कुंपणं ओलांडून हृदयापर्यंत पोहोचतो तो हाच शब्द.. पाठीवर हात ठेवून, खांद्यावर हात ठेवून, वयाच्या ज्येष्ठतेनुसार डोक्यावर हात ठेवून, हलकेच हात दाबून, नुसतं डोळ्यात पाहून प्रेमानं उचारलेला ‘होईल’ हा शब्द खरंच किमया करतो. काही काळजी करू नका, हे संकट टळेल, चांगलंच घडेल, देव पाठीशी आहे, अशी किती तरी वाक्य या एका ‘होईल’मध्ये सामावलेली असतात.. उत्साहाचं एवढं प्रभावी इंजेक्शन देणारा दुसरा शब्द नाही.. बघा ना.. आपण विश्वासानं होईल म्हटलं की समोरच्याची मानही होकारार्थी हलते जणू, तोही म्हणतो होईल! होईल.. आणि त्यानंतरचा एक क्षण.. होईल म्हणणारा आणि ऐकणारा दोघेही शांत असतात. नाटकात ‘प्रेग्नंट पॉझ’ असतो ना तसा वाटतो हा क्षण. दोघांच्या विचारांच्या मनाच्या तारा या क्षणी ‘होईल’ या शब्दावर अगदी अचूक जुळलेल्या असतात आणि म्हणूनच पुढे काही बोलावंसं वाटत नाही. खरा अचूक षड्ज लागल्यावर खाँसाहेब गायचे थांबले, असं आपण अनेक चरित्रात वाचलेलं असतं ना. स्वर अचूक लागल्यावर जी शांतता येते क्षणभर तीच या ‘होईल’नंतर मनात येते. खरंच किती आधार येतो, उत्साह वाटतो. काही वेळा तर परिस्थिती हातून ९० टक्के निसटली आहे हे कळतही असतं पण तरीही कोणी तरी मोठय़ा विश्वासानं ‘होईल’ म्हणतं आणि क्षणभर वाटून ही जातं की खरंच काही तरी होईल. मनात आहे ते घडेल, इच्छित आहे ते होईल.. माणूस हा आशावादी असतो. सर्वस्व गमावल्यावरही उद्याचा सूर्योदय कदाचित काही तरी अनुकूल घडवेल या आशेवर निराशेची रात्र माणूस काढू शकतो. जिवलगांच्या जाण्यानं पार उद्ध्वस्त झालेली व्यक्ती ही दुसऱ्या दिवशी सकाळी थोडीशी का होईना सावरलेली असते. वास्तव मान्य करते आणि होईल असं म्हणत स्वत:लाच उभं करते. घरातल्या इतर मंडळींना सावरायला स्वत: सतत मनाशी ‘होईल.. होईल’ असं उच्चारत राहते.. अहो, कमळात अडकलेला भुंगाही ‘होईल’ असंच म्हणतो. संध्याकाळी सूर्य अस्ताला गेल्यावर कमळ मिटलं, पण रस पिणारा भुंगा मात्र त्यातच अडकला. आता लाकूड चिरू शकणारा भुंगा कमळाच्या पाकळ्यांना भोक नाही का पाडू शकणार? पण नाही पाडत आणि तो विचार करत बसतो. ‘रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम्। भास्वान उदेष्यति हसिष्यति पंकजश्री:।’ रात्र जाईल, सकाळ होईल, सूर्य उगवेल आणि मग हे सूर्यविकासी कमळही हसेल, फुलेल आणि मग आपण यातून बाहेर पडू. होईल.. जर एका छोटय़ाश्या भुंग्याच्या मनात ही एवढी आशा निर्मात्याने देऊन ठेवलीय तर मग मन हेच ज्याचं वैशिष्टय़ आहे त्या माणसाच्या मनात तर आशेचं स्थान केवढं मोठं! ‘बघू या, होईल’ असं म्हणताना मनात साशंकता असली तरी आशाही कुठे तरी उभी असतेच.. किंबहुना ती असते म्हणून तर आपण ‘होईल’ म्हणू शकतो. ‘आशा नाम मनुष्याणां काचिद आश्चर्य शृंखला..’ आशा म्हणजे पायात बांधलेली बेडी आहे. पण ही बेडी नेहमीच्या बेडीसारखी नाही. आशेची बेडी पायात पडली की, माणूस त्या आशेच्या बळावर धावू लागतो, ती आशा पूर्ण करण्यासाठी धावू लागतो आणि ज्याच्या पायात आशेची बेडी नाही तो जिथल्या तिथे थांबतो. ‘यया बद्धा: प्रधावन्ति मुक्ता: तिष्ठन्ति पंगुवत्..’ होईल हा शब्द आपल्याला पंगू होऊ देत नाही.

माझ्या लहानपणी आमच्या घरी एक बोहारीण येत असे. तिचा धंदा झाला नाही दिवसभरात की मग ती आमच्याकडे यायची. मला आणि माझ्या भावाला तिच्या भांडय़ांच्या टोपलीला हात लावून ‘ होईल’ असं म्हणायला सांगायची. आणि आम्हीही वेडे, मोठय़ाने ‘होईल’ म्हणायचो.. खरंच तिचा धंदा होत होता की नाही त्यामुळे माहीत नाही पण यानिमितानं एक छान सवय लागून गेली. एखाद्या विक्रेत्याकडे कधी सकाळी काही खरेदी केली आणि त्याची बोहनी केली की, आजही पटकन ‘होईल’ असं म्हटलं जातं. करणारा तोच आहे हे माहीत असतं, पण तरीही उत्स्फूर्तपणे सदिच्छा व्यक्त झाल्याचा आनंद नक्की मिळतो. शांत पाण्यात, तळ्यात एखादा खडा टाकला की, त्याचे तरंग मध्यातून थेट काठापर्यंत पोहोचतात. तसं मनाच्या तळ्यात एक खडा सकारात्मक, ‘होईल’चा पडला की सकारात्मकतेचेच तरंग मनभर पसरतात. पसरत राहतात.. आणि मग गोष्ट आपल्या हातात असेल तर आणखी प्रयत्न करायलाही आपण सिद्ध होतो. ‘किये बिना कुछ होता नही, किया हुआ व्यर्थ जाता नही’ होईल..

‘होईल’ हा दुधारी शब्द आहे, या शब्दातून आशा तर सूचित होतेच पण त्या बरोबरीने ‘धीर धर’.. हे ही तितक्याच प्रभावीपणे व्यक्त होतं.

अनंताची कळी झाडावर अस्पष्टशी दिसायला लागल्यापासून तिचं फूल व्हायलामध्ये पुष्कळ दिवस जातात, तिला दररोज हात लावून पाहणाऱ्या आपल्या मनाला ‘थांब.. फुलेल .. फुलायला  थोडा वेळ लागणार ..’ हे सांगणं म्हणजेच ‘होईल’ घडेल, होईल.. पण थोडा धीर धरायला हवा. योग्य काळ येईपर्यंत वाट बघायला हवी. वाट बघणं, पेशन्स हा फार फार मोठा गुण आहे. अस्पष्टशी कळी दिसायला लागल्यापासून तिचं फूल होण्यापर्यंत ते लढाईत शत्रू योग्य कात्रीत सापडेपर्यंत सगळीकडे या गुणाचा उपयोग होत असतो. जखम झाल्यावर लगेच खपली धरत नाही, वेळ जातोच.. होईल, ती खपली धरणार आहे याचा आपल्याला विश्वास असतो.

गम्मत अशी की, काही वेळा होईल होईल म्हणता म्हणता किती तरी काळ उलटून जातो, जे हवं असतं ते घडलेलं नसतं.. पण या होईलच्या जपाने तो मधला काळ सह्य़ होतो. काळ हेच अनेक गोष्टींवरचं औषध असतं. त्या मधल्या काळात मन थोडं शांत होतं, वास्तव स्वीकारायच्या पातळीवर येतं, काही तरी वेगळी वाटही कदाचित या मधल्या काळात दिसून जाते.. हे सगळं घडण्यासाठी नैराश्य न येऊ देणारा, आशेवर उभा करणारा मंत्र म्हणजे होईल.. हल्ली जीवनाचा वेग अफाट वाढलाय, इन्स्टन्टचा जमाना आहे. डोकं दुखण्याची गोळी घेतली की, जाहिरातीतील  व्यक्ती अर्ध्या सेकंदात ताजीतवानी झालेली दिसते.. त्यामुळे गोळी घे, होईल थोडय़ा वेळात डोकं दुखणं कमी.. असं म्हणायला वावच नाही. या ‘तत्काल’ वृत्तीमुळे नवीन पिढी, महाविद्यालयांमधली मुलं ‘होईल’ म्हणायला फारशी उत्सुक नाहीत. खरं तर आज सगळ्यात जास्त बिकट परिस्थितीचा सामना या तरुणांना करायचा आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रचंड वाढलेली स्पर्धा, आरक्षणं, हाताला काम आणि कामाला दाम मिळेल की नाही या बाबतीत वाढलेली साशंकता, वाढलेल्या श्रीमंतीच्या अपेक्षा, दर दिवशी वाढणारी महागाई या सगळ्यातून या तरुणांना वाट काढायची आहे, आपली स्वप्नं साकार करायची आहेत. सगळं पटकन, मनासारखं नाही घडलं तरी उन्मळून जाता कामा नये. धीर धरणं आणि स्वत:ची उमेद टिकवून ठेवणं यासाठी ‘होईल’ हा त्रिअक्षरी मंत्र त्यांनाही आत्मगत करायला हवाय. थोडंसं ललित शब्दात लिहायचं तर, जीवनाच्या तप्त वाटेवर ‘होईल’चं हिरवी सावली देणारं झाड लावायला हवंय.

बिहारमधला मांझी आठवतो. डोंगराळ भागातून जाताना, अवघड वाटेवरून चालताना पाय घसरून मांझीच्या पत्नीचा मृत्यू झाला. हे पुन्हा दुसऱ्या कुणाच्या बाबतीत घडू नये म्हणून हा डोंगर फोडून त्यातून चालायला सोपी वाट आपण करायला हवी, असं त्याच्या मनात आलं आणि तो कामाला लागला, खऱ्या अर्थाने डोंगर फोडायचं काम.. केवळ अशक्य वाटणारं, किती वेळा त्याचं अवसान गळूनही गेलं असेल पण त्याला ‘होईल’ हाच तारक मंत्र ठरला असेल. हा मंत्र आणि जिद्द यांच्या जोरावर दशरथ मांझी याने तो डोंगर फोडून तब्बल २२ र्वष काम करून, त्यातून रस्ता काढलाच.. त्यानं ‘होईल’ हा मंत्र तर जपलाच पण त्याच बरोबर ‘करीन’ हा मंत्रही जपला..

धनश्री लेले

dhanashreelele01@gmail.com