लहानपणी कितीतरी वेळा ऐकलेली, हसून हसून पोट दुखायला लागणारी ती तीन बोबडय़ा बहिणींची गोष्ट आजही आठवते.. ‘ही बोयी म्हणून मी बोयी.. ती बोयी म्हणून मी बोयी..’ आजही गोष्ट आठवली की हसायला येतं, पण लहानपणी ऐकलेल्या या गोष्टींची एक गंमत असते, तेव्हा त्या रंजक वाटतात आणि मोठेपणी तीच गोष्ट आपल्याला अंतर्मुख व्हायला लावते, विचार करायला लावते..

या तिन्ही बहिणींची पंचाईत झाली ती त्या बोलल्या म्हणून.. गोष्टीतच नाही तर बहुतेक वेळा बोलल्यानेच पंचाईत होते. ‘बघ, उगाच बोलले’, ‘छे, मी असं नको होतं बोलायला’, ‘ काय मिळालं बोलून’, ‘बोलले नसते तर बरं झालं असतं’ असे उद्गार आपल्या तोंडून अनेकदा निघालेले असतात. पण काय करणार.. सवय. आपण पुन्हा पुन्हा बोलत राहतो, ‘धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडून निघालेला वाग्बाण हा परत घेता येत नाही. पण हे नेहमी बाण सुटल्यावर लक्षात येतं आपल्या आणि वाग्बाण सोडताना आपण साक्षात रामचंद्र झालेलो असतो. रामाचा बाण जसा वाया जात नाही आणि अगदी अचूक वेध करतो तसा आपला वाग्बाण ही अगदी अचूक वेध घेतो. धनुर्विद्या न शिकताही आपण याबाबतीत अगदी अव्वल बाणचालक असतो. आपला बाण समोरच्या अंत:करणाला विद्ध करतो. तेव्हा काही वेळासाठी आनंद मिळतही असेल, पण नंतर बऱ्याचदा तो बाण आपल्यालाच जखम करत राहतो. कारण नंतर बऱ्याचदा आपल्या मनात अपराधीपणाची भावना जागी झालेली असते.

chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
delhi farmer protest marathi news, trolley times newspaper marathi news, trolley times newspaper delhi farmers protest marathi news
ना ऑफिस, ना प्रेस… ट्रॅक्टरमधून निघणारं जगावेगळं वृत्तपत्र…
Sanjay Raut ANI
“मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता

मग वाटतं नसतो असं बोललो तर बरं झालं असतं, पण वेळ गेलेली असते. पंचाईत ही बहुतेक वेळा अशी बोलण्याने होते, म्हणून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा विचार करूनच उच्चारला जावा.. असं म्हटल जातं..

असा विचार करून दर वेळेला प्रत्येक शब्द उच्चारायचा म्हणजे अवघड.. आम्हा बायकांना तर फारच अवघड.. कारण आम्ही इतक्या वेगवान आणि अखंड बोलत असतो की त्या शब्दांचा विचार करण्यात वेळ दवडणं आम्हाला सहनच होणारं नाही (अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या अबोल मैत्रिणींची क्षमा मागून हे वाक्य लिहिते आहे.) केवळ एखाद्यावर शरसंधान करतानाच नाही तर एरवी ही अतिउत्साहात आपण खूप जास्त बोलून जातो. काही वेळा तर काही जण त्याच अतिउत्साहाच्या भरात शक्य नसलेल्या गोष्टींनाही होकार देऊन टाकतात आणि मग पंचाईत होते. म्हणूनही बोलण्यापूर्वी एक क्षण विचार करायला हवा. स्पर्धा परीक्षांमधल्या मुलाखतीत तर प्रश्न विचारल्याक्षणी झटकन बोलू नका, थोडा वेळ विचार करण्यात गेला तरी चालेल पण नेमक्या शब्दात तुमचं म्हणणं मांडा असं सांगितलं जातं.

योग्य शब्द, योग्य ठिकाणी आणि तो योग्य वेळी बोलणं महत्त्वाचं. फोडणीत योग्य वेळी कढीपत्ता टाकल्यावरच त्याचा स्वाद येतो तसं आपलं बोलणं योग्य वेळी झालं तरच त्या बोलण्याला स्वाद असतो, काही गोष्टी जिथल्या तिथे सांगायच्या असतात तर काही नंतर सावकाशीने. हा विवेक महत्त्वाचा. म्हणूनही बोलण्यापूर्वी एक क्षण थांबणं महत्त्वाचं. थांबून फक्त योग्य शब्दाचा विचार करणं म्हणजे विवेक नाही. तर खरंच माझ्या बोलण्याची तरी गरज आहे का? हा विचार म्हणजेही विवेक. असा विचार जर आपण केला तर लक्षात येतं की, ९० टक्के वेळेला आपल्या बोलण्याची गरजही नसते. तरीही आपण बोलत असतो. विनोबा म्हणाले होते, ‘दिवसभरात ५ किंवा ६ वाक्यंच आपण बोलावी अशी असतात. बाकी सगळं चऱ्हाट. मौनाएवढं पाळायला सोपं दुसरं काही नाही.’

पण खरंच मौन पाळणं इतकं सोपं असतं? आपणही खूप रागावलो आणि काही सुचलं नाही बोलायला की मौन पाळतोच की. हां फक्त आपल्या हातातून जोरात ठेवलं गेलेलं ताट जरा मोठय़ाने बोलतं किंवा जोरात लागलेलं दार जरा राग व्यक्त करतं इतकंच. आपलं मात्र मौन असतं. खरं ना? या मौनाला मौन म्हणायचं का? योगाभ्यासातले साधक म्हणतील की, हे केवळ वैखरीचं मौन. हे खरं मौन नाहीच. न बोलणं म्हणजे मौन नाही. ती फक्त शब्दांना विश्रांती. मनाला विश्रांती नाहीच. मग खरं मौन कुठलं? तर परा वाणीचं मौन हेच खरं मौन. परा वाणीचं मौन म्हणजे बोलावंसंच न वाटणं, प्रतिक्रियाच न उमटणं हे खरं मौन. न बोलता जोराने ठेवलेलं ताट किंवा जोरात लोटलेलं दार ही शेवटी प्रतिक्रियाच आहे, आपला राग व्यक्त करणारीच ती कृती आहे. फक्त शब्दावाचून.. त्यापेक्षा अशा तोल सुटण्याच्या वेळेला तो विषयच तिथे थांबवणं सगळ्यात उत्तम, पण ते नाही जमत आपल्याला. म्हणूनच तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला राग आला तर मनातल्या मनात आकडे मोजायला सांगितलंय. जेणेकरून तो विषय मनातून काही क्षण दूर जाईल आणि काही क्षण गेल्यावर त्या रागाची तीव्रताही कमी होईल. या निमित्ताने आपलं रागातलं भान सुटलेलं बोलणं थांबतं कारण शब्दानेच शब्द वाढतो.. बोलण्याने बोलणं वाढतं आणि बोलण्यानेच पंचाईत होते.. आजार बरा व्हावा म्हणून आपण गोळ्या कितीही कडू असल्या तरी गिळतो ना.. तसं पुढे सगळं बरं व्हावं म्हणून काही वेळा कटू शब्दही उच्चारण्यापूर्वीच गिळून टाकायला हवेत.

जेणे रसना जिंकिली तेणे जग जिंकिले.. हे जिभेला जसं खाण्याच्या तसं बोलण्याच्या बाबतीतही तितकंच लागू आहे. अगदी मौन नाही धरलं तरी प्रत्येक वेळा बोललंच पाहिजे असं नाही. काही भावना जर न बोलता व्यक्त झाल्या तर त्या अधिक सुंदर होतात. जसं, ‘भरे बज्म में नजरे बोलती है’ किंवा चारचौघात मस्ती करणाऱ्या आपल्या मुलाला आई शब्दही न उच्चारताच डोळ्यांनी बरंच काही सांगून जाते. काही भावना बोलून दाखवल्या तर त्या वरवरच्या वाटतात.

बिरबलाने तर न बोलण्याचा एक फायदाच आपल्या एका गोष्टीतून सांगितलाय. एकदा अकबर बादशहा म्हणतो, ‘‘बिरबला, मला एकदा तुझ्या वडिलांशी बोलायचंय. अरे, तू एवढा हुशार तर तुझे वडील केवढे हुशार असतील.’’ बिरबलाने बादशाहाचा निरोप वडिलांना दिला. वडिलांना एकदम दडपण आलं. कारण बिरबलाची हुशारी ही त्याची स्वत:ची होती. वडिलांकडून आलेली नव्हती. आता काय करायचं? बिरबलाने त्यांना मौन धरायला सांगितलं. अकबराने त्यांना अनेक प्रश्न विचारले पण उत्तर काही नाही. याची तक्रार दुसऱ्या दिवशी बादशाहने बिरबलाकडे केली, तेव्हा बिरबल म्हणाला, ‘‘माफ करा खाविंद, पण अहो, एखाद्या हुशार व्यक्तीने उत्तर द्यावं तर तुमचे प्रश्नही त्याच ताकदीचे हवेत ना.. आमच्या पिताश्रींना तुमचा एकही प्रश्न उत्तर देण्याजोगा वाटला नाही म्हणून ते काही बोलले नाहीत.’’ यातला गमतीचा भाग सोडून देऊ , पण बाबा बोलले असते तर पंचाईत झाली असती. खरंच बरं आहे ना, मुखाला ओठांची कवाडं दिली आहेत ती. बोलेपर्यंत शब्द आपले गुलाम असतात पण ते एकदा ओठांची कवाड उघडून बाहेर पडले की आपला त्यांच्यावरचा अधिकार संपतो आणि मग आपण त्यांचे गुलाम होतो. आपल्या प्रत्येक शब्दाला किंमत आहे, आपला शब्द आपण पाळला तरच ती किंमत टिकून राहते. नाही तर नुसते वाऱ्यावर सुंदर, छान शब्द उधळण्यात काय अर्थ आहे. एकेका शब्दासाठी प्राण हातावर धरणारी माणसं होऊन गेली या भूमीत. अर्थात शब्दांच्या डोलाऱ्यावर लोकांना भुलवणाऱ्या आजच्या काळात त्या गोष्टी केवळ अविश्वसनीय वाटतात. ‘रघुकुल रिती सदा चली आई प्राण जाये पर वचन ना जाई’ रामाच्या कुलाची ही शब्दमर्यादा मात्र आपल्या लक्षात राहत नाही.. आपल्या मुखातून उमटणारे शब्द म्हणजे आपल्या स्वभावाचा, आपल्या चिंतन- मननाचा आरसाच! शब्द शब्द जपून ठेव.. हे अगदी खरं.. बोलण्यासारखं काही असेल तरच बोलणं योग्य.. आणि म्हणूनच रणांगणात उभं राहूनही भगवंत बोलले. कारण ते बोलणं फार महत्त्वाचं होतं. कारण ते केवळ अर्जुनालाच नाही तर आपल्यालाही मार्गदर्शक ठरणारं होतं म्हणूनच भगवंत बोलले. अगदी मनापासून बोलले आणि त्यांचं बोलणंही असं की ते काळाच्या पटावर चिरंतन झालं. आपण असं चिरंतन वगैरे बोलू शकलो नाही तरी एवढं नक्की करू शकतो.. काय?

बोली बोल अमोल है बोल सके तो बोल

पहेले भीतर तौल के फिर बाहर को खोल..

धनश्री लेले

dhanashreelele01@gmail.com