16 October 2019

News Flash

‘आपलं’ जग..!

ज्याला कुणाला आपल्या जगातलं दुसऱ्याला सांगता येत नसेल

ज्याला कुणाला आपल्या जगातलं दुसऱ्याला सांगता येत नसेल त्याचा कोंडमारा होईल, हे उघड आहे. म्हणून घरोघरी आणि समाजातही विसंवाद, त्रास, त्रागा, भांडणं होत असल्याचं आढळून येतं. आपण स्वत: ज्यात जगतो आहोत, ते ‘आपलं जग’ असणार हे सत्य आहे; पण इतरांचंही तसंच जग असणार, याचा विसर पडल्यामुळे परस्परांच्यातल्या संवादाला, आनंदाला बाधा येते.

शाळेत असताना आपल्या तालुक्याचा परिचय करून देणारं- आपला तालुका, जिल्ह्य़ाचा परिचय करून देणारं- आपला जिल्हा- अशी पुस्तकं असतात. पुढं मोठय़ा पातळीवर जगाचा परिचय करून देणारं- आपलं जग- असंही पुस्तक असतं. व्यवहाराच्या दृष्टीनं आपण एकाच वेळी आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्य़ात आणि फार मोठय़ा असलेल्या आपल्या जगातही राहात असतो. एकाच वेळी असे आपण आपला तालुका, जिल्हा, राज्य, जग अशा सगळ्यांत कसे काय राहू शकतो, याचा विचार करताना थोडी गंमत वाटते. आपण तेच असतो, एकाच ठिकाणी राहातो, पण एकाच वेळी आपण अशा अनेक ठिकाणीही राहिल्यासारखं असतं. हे थोडं विस्मयकारक असलं तरी ते संदर्भानं खरं ठरतं.

जिल्ह्य़ात कुठं राहाता म्हटलं तर, तालुक्याचा उल्लेख करावा लागतो, राज्यात कुठं राहाता म्हटलं तर जिल्ह्य़ाचा उल्लेख करावा लागतो. त्या अर्थानं हळूहळू सर्वाचं एक समान उत्तर निघतं, ते म्हणजे आपण या जगात राहातो. त्याला आपण ‘आपलं जग’ असं म्हणतो. हे सगळं तसं सोपं, सरळ वाटतं; पण वस्तुस्थिती काही वेगळं सांगते, शिकवतेही.

कुठं व्याख्यान-निरूपण चालू असतं, ते ऐकायला अनेक माणसं असतात. तिथं एका विषयाला धरून अनेक गोष्टी सांगितल्या जात असतात. ते ऐकताना सगळे वस्तुत: एकाच ठिकाणी, एकाच कामाला आणि एकत्र श्रवण करीत असलेली माणसं असतात. त्या अर्थानं या बाबतीत ते एकाच जगात, त्या वेळेपुरते तरी वावरत असतात; पण म्हणून सगळ्यांचा असाच एकत्रित प्रवास चालू असतो का, याकडं थोडं लक्ष द्यावं. ऐकता ऐकता एखादं उदाहरण किंवा प्रसंग एखाद्या श्रोत्याच्या जीवनात घडलेला असतो. ते ऐकताच त्याला त्याची आठवण होऊन त्यावर तो विचार करीत बसतो. त्या वेळचं सारं त्याच्या डोळ्यांसमोर उभं राहातं. कधी तरी तो त्यातून बाहेर येतो, तोपर्यंत इकडं दहा-पंधरा मिनिटांचं निरूपण पुढं गेलेलं असतं. त्यामुळं मधले संदर्भ लागत नाहीत. त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागतं. असं अनेकांच्या बाबतीत वेळोवेळी घडत असतं. इथल्या त्या निरूपणाच्या विश्वात बसलेली माणसं अशा वेळी प्रत्यक्षात इथं एकत्र बसलेली दिसली, तरी ती ‘आपापल्या जगात’ वावरत असतात. म्हणून मनुष्याला विचारलं की, तो कुठल्या जगात जगतो, तर या सर्वाच्या जगात जगत असूनही, खऱ्या अर्थानं तो ‘आपल्या जगात’

जगत असतो.

काही वेळा पती कार्यालयामधून आल्यावर हुश्श करून, घरी असणाऱ्या पत्नीकडून चहापाणी मिळण्याची वाट बघत बसलेला असतो. त्या वेळी, आज उशीर का झाला इथपासून दुपारी काय काय घडलं, नातेवाईकांच्यात, संबंधित माणसांच्यात कोणत्या नवीन घटना घडल्या – अशा असंख्य विषयांवर त्याला एवढं ऐकून घ्यावं लागतं, की त्याचं चहापाणी झालं नाही, हेही तो विसरून जावा, कारण त्याला दिवसभरात तिकडं कोणते ताणतणाव होते, कोणते निर्णय घ्यावे लागले, कोणती कामं मनासारखी झाली- झाली नाहीत – यासंबंधी इतकं सांगायचं असतं, तेही त्याच्या डोक्यात विरून जातं. ती तिच्या जगात वावरत असल्यामुळं  दुसऱ्याच्याही जगात काही सुरू असेल, ते आधी समजून घ्यावं, हा विचारही तिच्या मनात येत नाही. इथे हेही समजून घ्यायला हवं की त्याला संधी मिळाली नाही म्हणून, अन्यथा तोही आल्याबरोबर त्याच्या जगात राहिला असता आणि त्यानंही तेच केलं असतं.

आपल्याला असंही आढळून येईल, की कर्त्यां मुलासमोर असंख्य कामं असतात, ताणतणाव असतात, जबाबदाऱ्या असतात, तसंच ते कदाचित त्याच्या पत्नीबद्दलही असतं. ते लक्षात घेतलं जात नाही. अशा वेळी अशी समजूत नसलेली घरातली प्रौढ-वृद्ध माणसं या नव्या पिढीला, घरात आल्याआल्या दोन मिनिटं बसू देत नाहीत की पाणी पिऊ देत नाहीत. त्यांनी आणायला सांगितलेली एखादी वस्तू, औषध आणलं की नाही, हे दारात पाऊल टाकल्या टाकल्याच विचारतात. काही जण तर त्यांच्या जगाविषयी इतके आग्रही असतात की, केलं तरी त्यात काय विशेष असा भाव असतो आणि नाही केलं तर मात्र, तुम्हाला आता आमची किंमत उरली नाही, असले शेरे मारून विषय बंद करतात आणि आपल्याशीच खिन्न होऊन बसतात.

याउलट आपल्याला जसं आपलं जग आहे, तसं त्यांनाही त्यांचं जग आहे, याची जाणीव असली, तर असा चांगला अनुभवही आपल्याला येऊ शकतो, की अशी मोठी माणसं आधी या कर्त्यां मुलांना, सुनांना त्यांचं दिवसभरात काय घडलं, सगळं ठीक आहे ना – अशा सहज आणि प्रेमळ विचारणा करताना दिसतील. त्यांनी काम केल्याचं कळलं तर त्याबद्दल, इतक्या गडबडीत तुम्ही हे लक्षात ठेवलंत, असे कौतुकाचे चार शब्दही बोलतील. तसंच ते काम न केलं तरी, ते इतकं महत्त्वाचं नाही, उद्या-परवा बघता येईल, असं म्हणून कुठलाही ताण निर्माण न करता, तो विषय स्वास्थ्यानं घेतील आणि त्या कर्त्यां पिढीलाही त्याची खंत, त्रास देणं टाळतील.

समजुतीनं इतरांचा विचार करणं सगळ्यांनाच शक्य व्हायला हवं अन्यथा मग विसंवाद होतो, त्रास होतो. हे वयावर अवलंबून नाही. थोडं पुढं जाऊन आपण पाहिलं तर ज्याचा अनुभव कुटुंबात येतो, त्याचा अनुभव दोन नातेवाईक, दोन शेजारी, एखादी अपार्टमेंट, एखादी सोसायटी या ठिकाणीही येताना दिसेल. तिथंही पुन्हा असं आपलं आपलं जगच बरोबर आणि तेच महत्त्वाचं आणि खरं – त्याचबरोबर इतरांचं कमी महत्त्वाचं आणि चुकीचं असं वाटून त्याप्रमाणं या साऱ्या ठिकाणी वागणारे लोक, हे त्या त्या पातळीवर असाच विसंवाद आणि अशांतता आणतात. आपलं जग हे असणार – व्यक्तीपुरतं, कुटुंबापुरतं, नातेवाईकांपुरतं, घर, सोसायटी, गल्ली, गाव – असं त्या त्या पातळीवर असणार, हे समजूनच राहिलेलं बरं. अडचण आहे ती, तेच खरं, तेच बरोबर, तेच मुख्य – अशा गोष्टी मानण्याची, वागण्याची. तसं मानायचं खरं तर कारण नाही, कारण प्रत्येक पातळीवर या जगाला त्या-त्या पातळीवरच्या स्वार्थाच्या मर्यादा पडतात. म्हणून त्या पोटी होणाऱ्या कुठल्याही कृती या स्वार्थी, अहंकारी आणि अर्थातच अनुचित असतात, कारण आपल्यासारखंच दुसऱ्यालाही त्याचं जग असतं. त्यालाही त्याप्रमाणं व्हावं, असं वाटणं स्वाभाविक असतं. त्यामुळे मूलत:च असं दोघांच्याही किंवा अशा अनेक समूहांच्याही मनाप्रमाणं, सुखाचं सदैव घडणं शक्य नसतं. स्वत:च्या जगाला थोडी मुरड, दुसऱ्याच्या जगाचा थोडा स्वीकार, त्यासाठी सर्वानीच करायचा थोडा त्याग, दाखवायची अत्यावश्यक समजूत – या मार्गानी त्या-त्या काळचे, त्या-त्या पातळीवरचे प्रश्न सुटू शकतात. विसंवाद कमी होऊ शकतात, आनंद वाढू शकतो.

अधिक मोठय़ा पातळीवर विचार केला, तर भौगोलिक, राजकीय, धार्मिक – अशा अनेक पातळ्यांवरही असे विसंवादाचे, त्रासाचे प्रश्न असतातच. खूप वेळा या आपल्याआपल्या जगांना प्राधान्य देण्यानं, इतरांच्या जगांचा विचार न केल्यामुळं, त्यांनाही आवश्यक प्राधान्य न दिल्यामुळं, अशा तऱ्हेच्या समजुतीच्या विकासाची सर्व पातळ्यांवर वाढ न झाल्यामुळं – मुळात असे प्रश्न निर्माण होतात. खूप मोठे होऊन बसतात, असं आढळून येईल. आपल्या रोजच्या पातळीवर पाहिलं तरी, आपल्या कुटुंबात प्रत्येकाचं ‘आपलं जग’ समजून घेणं गरजेचं आहे. तसंच इतर घटकांचं ‘आपलं’ जगही समजून घेणं शक्य आहे. तीच गोष्ट बाहेर पडल्यावर ऑफिसमध्ये आपल्या सहकाऱ्यांच्या बाबतीत, वरिष्ठांच्या बाबतीत करण्याचा फायदा आहे. तसंच ते आपण कुठल्या धंद्यात, व्यवसायात असू तर व्यवसायातले स्पर्धक, नोकरवर्ग, देणेकरी-घेणेकरी, पुरवठादार, ग्राहक – अशांच्या बाबतीतही करणं गरजेचं आहे. अनेकदा, ‘ते असं कसं काय म्हणतात, ते असं कसं वागले, त्यांनी माझं नुकसान केलं.’ – असल्या होणाऱ्या प्रतिक्रिया, एकमेकांच्यावरचे राग, गरसमज जरूर कमी होतील.

भूगोलानं ‘आपल्या जगाचा’ परिचय ‘घडतो’. पुढं मात्र अशा मानसिक पातळीवरच्या ‘आपल्या आणि इतरांच्याही जगाचा’ परिचय घडणं, समजूत वाढणं, त्यामुळं विसंवाद कमी होणं, सौख्यात भर पडणं – हा आनंदाचा प्रवास करणं, आपल्याच हाती आहे. बेसावध, चुकीचा प्रवास ‘घडू शकतो’, पण ‘बरोबर, आनंददायी प्रवास’ मात्र आपोआप घडत नाही, तो आपल्यालाच ‘करावा लागतो’!

सुहास पेठे

drsspethe@gmail.com

 

First Published on April 22, 2017 1:07 am

Web Title: kathakathan by suhas pethe