कार्यालयीन कामांचा तीन महिन्यांचा आढावा घेतला जाणार होता. वेगवेगळे विभाग, त्यांचे प्रमुख आपापल्या गटप्रमुखाबरोबर सर्व मुद्दय़ांबद्दल, वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा करीत होते. सर्वाचं काम संपल्यावर, जेवणाची सुट्टी झाली. त्यानंतर शाखाप्रमुखाबरोबर सर्व विभागप्रमुखांची बठक झाली. प्रत्येकानं आपापल्या गटाची, गटप्रमुखाच्या कामांची थोडक्यात माहिती दिली. परत एकदा आपली उद्दिष्टं, कमी-जास्त पडणाऱ्या गोष्टींबद्दल चर्चा झाली. एक विभाग मात्र कामाच्या बाबतीत मागं पडलेलं होतं आणि एचआरच्या बाबतीत अडचणीतही होतं.

त्याबद्दल शाखाप्रमुखाने त्या विभागप्रमुखाची स्वतंत्र भेट घेतली, आढावा घेतला. त्यांच्या हाताखाली चांगला गटप्रमुख देऊनसुद्धा त्या विभागाचा ‘परफॉर्मन्स’ कमी का व्हावा, या विषयी त्यांना जाणून घ्यायचं होतं. विभागप्रमुखसुद्धा थोडे गोंधळात होते. त्यांच्याकडं प्रत्येक गटाचा सर्व डेटा होता. तो सर्वसाधारणपणे चांगला होता. डेटावरून अडचण दिसत होती, ती उलट या चांगल्या म्हणून दिलेल्या टीम लीडरच्या संदर्भात होती. याचं कोडं विभागप्रमुखांनाही समजत नव्हतं. आधीची पाच माणसांची टीम उत्तम हाताळणारा टीमलीडर त्यांनी आता चाळीस माणसांच्या टीमवर नेमला होता. त्यांच्या कामाच्या, यशाच्या अपेक्षा अर्थातच जास्त होत्या. तरीही निकाल मात्र त्याच्याशी जुळणारा नव्हता. उलट टीमचा ‘परफॉर्मन्स’ खाली आणणारा आणि एचआरसाठी समस्या निर्माण करणारा होता.

त्यांचा तो गोंधळलेला चेहरा पाहून शाखाप्रमुखांनी त्यांना सांगितलं, की तुम्ही काळजी करू नका. आपल्याला त्या प्रश्नाचं स्वरूप नीट कळलं नाही, हे त्याचं कारण आहे. त्याचा खुलासा करताना ते म्हणाले, कुवत आणि काम यांची सांगडच माणसाला यशस्वी करीत असते, हे तर तुम्हाला माहीत आहेच. यात थोडा कुवतीचा अधिक विचार करत जा. यशाच्या अपेक्षांना मर्यादा नसतात. कुवतीला मात्र त्या असतात! प्रत्येक व्यक्तीप्रमाणं त्याच्या कुवतीची उंची ठरलेली असते. त्यात त्याचा दोष नसतो. कुवतीपेक्षा काम कमी असलं, तर मनुष्य त्यात जास्त यश मिळवतो. जेव्हा ते काम त्याच्या कुवतीच्या एका अंतिम मर्यादेपर्यंत येतं, तोपर्यंत यशही वाढत जातं. सावध राहावं लागतं, ते त्या वेळेला! कुवतीपेक्षा जास्त काम आपण त्याच्यावर टाकलं, तर मात्र आता यश त्या प्रमाणात मिळत नाही, उलट अपयश यायला सुरुवात होते. आपण काम देत असतो, अधिकारपद देत असतो, म्हणून हा विषय आपला आहे.

तुम्ही वेटलििफ्टग बघितलं असेल. पाच पाच दहा दहा किलोंची वजनं लीलया पेलणारा यशस्वी असतोच. तसा तो वजन वाढवीत जाऊन चाळीस-पन्नास किलोंपर्यंत जातो. ती त्याच्या शारीरिक कुवतीची एक मर्यादा असते. त्यापुढं जर यशस्वी आहे, म्हणून त्याने दोन्ही बाजूंना वजनं वाढवली, तर त्याला ते उचलवत नाही, प्रयत्न केला तर तो त्यासकट खाली बसतो. दुसरा एखादा अधिक शारीरिक कुवतीचा माणूस त्याच्याही पुढं दहा दहा वीस वीस किलो जातो, यशस्वीपणे उचलतोही. आता यात पहिल्याचा दोष नाही. त्याच्या कुवतीची ती मर्यादा आलेली असते. त्यानं ती ओळखावी आणि तेवढं यशाचं रेकॉर्डही त्यानं करावं. दुसऱ्यालाही पहिल्याच्या तुलनेनं अहंकार वाटायचं काम नाही. त्याचं यश दिसायला मोठं दिसलं, तरी त्याच्या कुवतीप्रमाणं ते बरोबर असतं. उद्या त्याच्यावरही त्याच्या कुवतीप्रमाणं वजन वाढवीत गेलं, तर तोही एका क्षणी खाली बसेल. तेही त्यानं अपयश मानायचं कारण नाही!

स्पध्रेसाठी उतरवताना त्यांच्या गुरूंना ते कळलं म्हणजे झालं. तुमच्या या गटप्रमुखाला पाच माणसांची टीम उत्तमपणे सांभाळता आली, ते त्यांचं यश आहेच, त्याचं आपण कौतुक केलंच पाहिजे. अभ्यासानं माणसाची कुवतही थोडी वाढू शकते. पण आधी म्हटलं, तसं ती एका मर्यादेपर्यंत. त्यानंतरचं काम त्याची इच्छा असली, त्याला करायचं असलं, तरी कुवतीच्या प्रश्नामुळं त्याला अडचणी येतात. हे खरं तर त्यानं लक्षात घ्यावं, हे अधिक चांगलं! त्या वेळी त्या पुढचं काम स्वीकारू नये. त्यामुळं त्याच्या कुवतीचा पुरेपूर वापर होईल, कामांत यश येईल, तोही आनंदात राहील आणि कंपनीही. इथं थोडा तसा प्रश्न झाला आहे. आता तो तुम्ही त्याच्याबरोबर बोलून सोडवा! यशावकाश त्या टीमलीडरला चाळीसऐवजी दहा जणांची टीम देऊन तो प्रश्न मार्गी लागला!

कुवतीचा हा प्रश्न असा एखाद्या ठिकाणापुरता नाही. तो तसा सार्वत्रिक आहे. त्यात कुणी कुणाला काही सांगण्यापेक्षासुद्धा सर्वात जास्त उत्तमपणे सुटतो तो, स्वतला तो कळण्यानं, समजून घेण्यानं आणि स्वीकारण्यानं. एखाद्या कार्यालयात कर्मचारी म्हणून उत्तमपणे काम करणारी आणि वेळी अधिकाऱ्यांचीही काही कामं सांभाळू शकणारी व्यक्ती, केवळ कुवतीच्या एवढय़ा अंदाजावर अधिकारी म्हणून नेमली, तर ती तेवढीच यशस्वी होते, असं अनेकदा आढळत नाही. काही गुण, शक्ती या सुप्त स्वरूपात असतातही. त्यांना योग्य वातावरण दिलं गेलं, तशी जबाबदारी, संधी मिळत गेली, तर व्यक्ती विकसित होतात. अधिकाधिक वरच्या पदांवर जातात, यशस्वीही होतात. पण तेही या कुवतींच्या शक्यता असतात, त्या मर्यादेपर्यंत!

कुवत असं म्हटलं, की साधारणपणे बौद्धिक कुवत, शारीरिक कुवत – अशा ढोबळ गोष्टी समोर येतात. पण कुवतीमध्ये – शिकण्याची क्षमता, नम्रता, सबुरी, स्वत:ची आणि कुटुंबाची एकूण आर्थिक कुवत, त्यात निकड असल्यास कष्टानं, कौशल्यानं भर घालण्याची कुवत, पालकांची कुवत अतिरिक्त असली तर आपल्या कुवतीएवढंच आपण त्यातून स्वीकारण्याचा विवेक आणि धर्य, इतरांबद्दलचा खरा आदर, त्यांनी मोठं व्हावं, उत्तरोत्तर अधिकाधीक यश मिळवावं, अशा तऱ्हेचं निकोप औदार्य, इतर व्यक्तींच्या चांगल्या कामांची पारख आणि मनमोकळं कौतुक – अशा असंख्य गोष्टी या कुवतीत समाविष्ट आहेत आणि विचार करीत गेलं तर आणखीही अनेक गोष्टी यात आढळतील.

या साऱ्या कुवतीच्या गुणांचा मुकुटमणी, हा आधी म्हटलं तसं, आपापली  कुवत वस्तुनिष्ठपणे ओळखणं, स्वीकारणं आणि त्यानुरूप योग्य, आदर्श असं काम इतरांबरोबर आनंदानं करणं, मागं असणाऱ्यांना प्रोत्साहन आणि पुढं असणाऱ्यांचं निभ्रेळ कौतुक आणि शुभेच्छा – हे सारं देण्याची कुवत असणं, हा आहे!

याचा व्यक्तीच्या सुखदु:खाशी अगदी जवळचा संबंध तर आहेच, पण त्याच्याबरोबर वावरणाऱ्या कुटुंबातल्या, नात्यातल्या, मित्रपरिवारातल्या – अशा सगळ्यांच्या सुखदु:खाचाही संबंध आहे. त्याची सुरुवात अगदी लहानपणातल्या खेळापासून होते. श्रीमंत मित्रांच्या संगतीत मिळालेलं खेळणं आपल्या घरी, आपल्या गरीब आई-वडिलांनीसुद्धा द्यावं असा हट्ट, त्यापोटी त्रागा, त्यामुळं आई-वडिलांना वाटणारी खंत, राग-इथूनच दुखं सुरू होतात. ती अशी कुवत न ओळखण्यामुळं सुरू होतात. त्या अर्थानं आपली स्वत:ची कुवत नसताना घेतलेली घरंदारं, मुलांना अत्यंत खर्चीक ठिकाणी शिक्षणाला घालणं, त्यांच्या कुवतीबाहेर असलेले अभ्यासक्रम त्यांना नकळतपणे सक्तीचे करणं, ईएम्आयसुद्धा न पेलणाऱ्या महागडय़ा गाडय़ा, चनीच्या वस्तू – असा हा सारा दु:खद प्रवास सुरू राहतो. हा कुवतीचा मुद्दा लक्षात आला नाही, अमलात आणला नाही, तर हा प्रवास आयुष्यभर नव्हे, आयुष्याच्या अंतापर्यंत सुरू राहतो. तो अस्वास्थ्य देतो यात शंकाच नाही!

माणसाकडं काही एकाच प्रकारची कुवत नसते आणि सगळ्यांकडं सगळ्या प्रकारच्या कुवतीही सहसा नाहीत. अशा वेळी आपल्या कुवतीप्रमाणं केलेलं काम तितकंच मोलाचं आणि आनंददायी असतं. फक्त त्यासाठी कुवतीबद्दलची ही आणि यापेक्षाही मोठी समजूत हवी ! याच काय, प्रत्येक क्षेत्रात – शेती, संशोधन, तंत्रज्ञान, साहित्य, व्यवस्थापन, कला, सेवा – अशा अनेक क्षेत्रांत मनापासून काम करणाऱ्यांची गरज आहेच.

कुवत जशी वेगवेगळी असते, तशा गरजांच्या पातळ्या, क्षेत्रंही वेगवेगळी असतात. कुवत समजून, तिचा विकास करून वेगवेगळ्या पातळीवर उत्तमात उत्तम काम करणारा माणूस खरोखरच हवा आहे. तो बाहेर समाजमंदिरात विधायक कार्याचा कळस गाठता यावा यासाठी योगदान देईल आणि अंतरंगात तर सदैव आनंदाच्या कळसावर विराजमान राहील!

सुहास पेठे

 drsspethe@gmail.com