आपल्याला असं आढळेल की, नात्यात कितीही मनमोकळेपणा असला, जवळीक असली तरी, कळतनकळत प्रत्येकाचं काहीतरी ‘हातचं’ ठेवलेलं असतं. काही वेळा असंही होतं की, तसं काही नसलं तरी जवळच्याला वाटतं की, यांनी काहीतरी ‘हातचं’ ठेवलेलं असलं पाहिजे.. हे ‘हातचं’ सकारात्मकही आहे, नकारात्मकही.

मुलाच्या उच्च शिक्षणासाठी प्रवेशाच्या तयारीचा प्रसंग असतो. मुलानं अभ्यास करून प्रवेशाच्या पात्रता यादीत नाव येण्यापर्यंतचे कष्ट केलेले असतात. त्याचा आनंद सर्वाना असतो. फक्त वडील घरी आल्यावर रात्री थोडय़ा सचिंत मुद्रेनं विचार करीत बसलेले असतात. वडिलांनी समोर वृत्तपत्र धरलेलं असलं, तरी त्यात त्यांचं लक्ष नाही, हे एकदोन वेळा हॉलमध्ये खेपा घालून गेलेल्या आईच्या लक्षात येतं. ती त्यांना आत बोलावून हलक्या आवाजात विचारते की, ‘‘तुम्ही कसल्या चिंतेत आहात का?’’ ते थोडं झटकून देतात. तेव्हा आई थेट विचारते, ‘‘तुम्ही आता या शिक्षणाच्या खर्चाच्या जुळणीच्या चिंतेत आहात ना?’’ ते फक्त मानेनं होकार देतात. ती काही न बोलता दोन मिनिटांत तिच्या खोलीत जाऊन येते आणि त्यांच्या हातात काही छोटीछोटी सोन्याची वळी ठेवते. ते एकदम चमकून तिच्याकडं पाहतात.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Andhra pradesh , G. Nirmala, Defying child marriage,10th examination topper
जी. निर्मला… हौंसलों की उडान
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
Patna High court
मुलांसाठी पत्नीच्या पालकांकडून पैसे मागणे हा हुंड्याचा प्रकार नाही; उच्च न्यायालयाचा पतीला दिलासा

ती म्हणते, ‘‘काळजी करण्याचं कारण नाही. यानं हा प्रश्न सुटेल ना?’’ त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण एकदम कमी होतो. ते म्हणतात, ‘‘नक्कीच!’’ तरीही आई त्यांच्या मनातली चिंता ओळखून असते. ती म्हणते, ‘‘हे उधार उसनवार नाही. कष्टाचंच आहे, आपल्या घरातलंच आहे. काटकसरीचं, माझं हातचंच आहे!’’ तसं म्हटलं तर, घरातल्या जवळच्या माणसालासुद्धा माहीत नसलेला, पण त्याक्षणी त्याला एकदम चिंतामुक्त करणारा, कर्तव्य करायला ऐनवेळी उपयोगी पडणारा – असा हा ‘हातचा’!

जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या रूपानं वावरणारा आणि ज्याच्यावर कधी फारसा विचारही कुणी करीत नसतं, असा हा ‘हातचा’! कौटुंबिक जबाबदाऱ्यांनी आधीच कधी घर थकलेलं असतं, आधीच्या दोन मुलींच्या लग्नांत ते घाईला आलेलं असतं. तिसरीच्या लग्नाच्या ठरावाच्या आधीच्या रात्रीसुद्धा काहींच्या चेहऱ्यावर दिसत नसली तरी, मनात चिंता पोखरत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी उगवणारी ही मंडळी आपली आता किती फरफट करतील, सुचवण्याच्या नावाखाली काय काय मागतील- या तणावात चहापाणी होऊन बठक मुद्यावर येते. ‘‘बाकी आपल्या सगळ्या गोष्टी जमल्या, फक्त आमच्या मुलाचं मत असं आहे..’, असं म्हणून थांबलेल्या वडिलांच्या वाक्यावर मुलीच्या वडिलांना ब्रह्मांड आठवतं. मुलाचे वडील बोलण्याच्या ओघात म्हणतात, ‘‘.लग्न बिनखर्चात आणि साधं झालं पाहिजे!’’ मुलीच्या वडिलांचा चेहरा एकदम हलका होतो. तिकडच्यांना हे साधं लग्न फारसं पसंत नसलं तरी, मुलानं शेवटपर्यंत मनात ठेवलेला हाही ‘हातचाच!’ आधीपासून त्याच्यावर चर्चा होऊन माणसं दुखावण्यापेक्षा, बाकी सगळं ठरेपर्यंत गुप्त ठेवावा लागणारा हा ‘हातचाच!’

पूर्ण तयारीनिशी शत्रूच्या समोरून येणाऱ्या फलटणीला, सरळ समोरासमोर युद्ध करण्याचा दिलेला आदेश, हा आपल्या स्वाभिमानी सन्याच्या तुकडीला एका बाजूला आव्हान देणारा असला तरी, कुठंतरी आपण तयारीत असलेल्या शत्रूला सामोरं जातो आहोत म्हणजे, थेट मृत्यूला सामोरं जाण्यासारखं आहे, हे काहींच्या मनात चमकून जातं. ते निकरानं चढाई करतातही. दुसऱ्या क्षणी इतका वेळ ‘हातचा’ ठेवलेला आदेश एकदम समोर येतो. ‘कुणालाही कचरण्याचं काही कारण नाही. समोर आलेल्या शत्रूच्या फलटणीवर मागून हल्ला करण्याची व्यवस्था आधीच झालेली आहे!’ तोवर शत्रूची झालेली कोंडी आणि त्यांचा होत असलेला पराभव समोर दिसतो. पण आपल्या सन्याच्या मनोधर्याची परीक्षा घेऊन, त्यात पास झाल्यावर मग हातात पडणारा हाही ‘हातचाच!’

असंही समजायचं कारण नाही की, असा हा ‘हातचा’ माणसाला फक्त हलकं करतो, सुखी करतो, दिलासा देतो. ‘‘आता काय, तुला चांगला अनुभव आहे, येणं-जाणं, प-पाहुणे, देणं-घेणं सगळं तू छान सांभाळू शकशील’’ असं म्हणून, महिनाभर एकटय़ा बहिणीच्या सोबतीला राहण्याच्या, सात्त्विक वाटणाऱ्या इराद्यानं, पहाटेच्या गाडीनं निरोप घेणाऱ्या सासूबाईंना हात करून आत आल्यावर थोडावेळ झोप लागते. नंतर उठून आता जबाबदारी आपल्यावर आहे, म्हणून चहा करायला जावं तर लक्षात येतं, पातेलीतल्या दुधात फार तर एखाद्याचा चहा होईल. मग, फ्रीझ उघडून दुधाची पिशवी काढायला गेलं, की दूधच काय, आत दुधापासून भाजीपर्यंत काहीही नसलेला रिकामा फ्रीझ सासूबाईंचा ‘हातचा’ दाखवतो. क्षणभर कळत नाहीसं होतं, पण नंतर संपलेलं तेल, पिठाचे रिकामे डबे – एकेक हाताशी आलं की, हाच ‘हातचा’ काय हात दाखवतो आणि रडकुंडीला आणू शकतो ते कळतं.

हा ‘हातचा’ कुठंपर्यंत काम करीत असतो हे सांगता येणंही कठीण आहे. साध्या पत्त्यांच्या खेळातसुद्धा एक खास हुकमाचं पान बाजूला ठेवलेलं असतं. तेच ‘हातचं’ पान सारी बाजू पलटवू शकतं. क्षेत्र कुठलंही असो – संगीत, पलवानकी, खेळ.. अनेकदा शिकवणारे त्यांच्या तोडीचा शिष्य तयार करतात. पण तो कधी वरचढ होऊ नये, म्हणून एखादी बंदिश, काही डावपेच, खेळी – अशी कुठंतरी ‘हातची’ ठेवलेली असते. आपण अनेकदा पाहिलं असेल की, राज्याचं, देशाचं लक्ष लागलेल्या आणि एखादी बाजू हमखास जिंकणार असं सर्वत्र वातावरण असताना, दुसऱ्या दिवशी अनपेक्षितपणे ती बाजू पडते, दुसराच निवडून येतो. तेव्हा काम करतो तो असाच कुठला तरी मुठीत ठेवलेला ‘हातचाच!’

माणसांचे अनेक पातळ्यांवर वेगवेगळ्या प्रकारे समाजात संबंध येत असतात. आपल्याला असं आढळेल की, त्यात कितीही मनमोकळेपणा असला, जवळीक असली तरी, कळतनकळत प्रत्येकाचं काहीतरी ‘हातचं’ ठेवलेलं असतं. काही वेळा असंही होतं की, तसं काही नसलं तरी जवळच्याला वाटतं की, यांनी काहीतरी ‘हातचं’ ठेवलेलं असलं पाहिजे. कारण या हातच्याचंच स्वरूप असं आहे की, ते आहे याला एकवेळ पुरावा मिळेल पण, ते नाही हे सिद्ध करणं अवघड असतं.

असं हे ‘हातचं’ सकारात्मकही आहे, नकारात्मकही. ते तसं का आणि कसं असावं याचा थोडक्यात विचार करू. प्राण्याला पाठीचा कणा आणि प्रगल्भ मेंदू प्रदान करून माणूस म्हणून उभा केला, तेव्हा खरा त्याचा हा ‘हात’ मोकळा झाला. म्हणताना आपण ‘हातचं’ म्हणत असू, तरी त्याच्या मेंदूतला आणि मनातला तो एक कप्पा आहे. अनेकदा बरोबरची माणसं उधळपट्टी करणारी असतील, भविष्यातल्या अडीनडींची जाणीव नसणारी असतील, विश्वासार्ह नसतील, कुवतीची नसतील- तर अशा अनेक कारणांसाठी त्या कप्प्याची जरूर असते. तसं पाहिलं तर, ईश्वरालाही सर्वसामान्यांच्या कुवतीची अजून खात्री नाही. म्हणून ती प्रगती होईपर्यंत, विश्वाची अनेक रहस्यं त्यानं आपल्या ‘हातात’ ठेवली आहेत!

जसं आपण व्यवहारांतल्या बाबतीत, युद्धातल्या यशासाठी गुप्ततेची जरूर आहे हे पाहिलं, ते काम करण्यासाठी हा कप्पा त्याला मदत करतो, वापरता येतो. पण याचं नीट आकलन झालं नसेल, उपयोग कळला नसेल, त्यानं स्वत:चं- दुसऱ्याचं हित साधता येतं हे कळलं नसेल, तर याच कप्प्याचा असंख्य वेळेला दुरुपयोग होताना आढळेल. त्याचं कारण, या कप्प्याचा ताबा आता अशा सद्बुद्धीकडं, विवेकाकडं न राहता अहंकाराकडं जातो. मग माणूस त्याचा उपयोग दुसऱ्यावर स्वामित्व गाजवण्यासाठी, दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी, आपलं महत्त्व वाढवण्यासाठी करू लागतो.

आपण अनेकदा पाहिलं असेल की, आपण वेगवेगळ्या प्रकारची नवनवीन यंत्रं घेतो, संगणक घेतो. त्याची प्राथमिक माहिती मिळते, पण मुद्याची एखादी पायरी, सांकेतिक शब्द, कळ – कंपनीच्या कप्प्यांत असते. पण तेवढंच नेमकं आपल्याला सांगितलेलं नसतं. मग फोनाफोनी, खेपा, खर्च, वेळेचा अपव्यय- सारं अपरिहार्य असतं. कारण ती छोटीशी गोष्ट त्या कंपनीच्या, माणसाच्या- मेंदूतल्या ‘हातच्या’ कप्प्यात ठेवलेली असते. हे जेव्हा फार मोठय़ा प्रमाणावर आणि खूप माणसं करतात, त्यावेळी त्यांच्याकडून इतरांना किती आणि कोणकोणत्या प्रकारचा त्रास होऊ शकेल, याची कल्पना करावी.

‘हातचा’ असणं ही जन्मत: मिळालेली विद्या आहे. नकारात्मक आणि बेसावधपणे वापरली तर व्यक्तिमाहात्म्य, पसा, सत्ता, अडवणूक – असं त्यानं काहीही घडेल. पण तसं करणं टाळणं आणि त्याच ‘हातच्यानं’ लोकांना माहिती, मदत, अनेक प्रकारचे आनंदाचे अनपेक्षित क्षण देणंही शक्य आहे. तेच मोठय़ा मनाचं आणि माणुसकीचं काम आहे!

सुहास पेठे

drsspethe@gmail.com